खर्‍या गाढवांना वाचवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2021   
Total Views |

ddd _1  H x W:



‘गाढव आहेस का रे?’ किंवा ‘तुझा बाप गाढव...’ वगैरे शब्द एखाद्याला हिणवण्यासाठी सर्रास वापरले जातात. गाढवही माणसाला खूप मदत करते. कष्टाच्या कामासाठी माणूस गाढव प्राण्यालाच निवडतो. पण कधी कोणी ऐकले आहे का, कोणी म्हटले आहे का की, ‘माझे गाढव खूप छान आहे’ किंवा ‘गाढवाशिवाय मला करमत नाही’, असे कुणीही म्हणत नाही. ही अशी ‘गाढव’ प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एका अहवालानुसार, आपल्या देशात गाढव प्रजाती आता नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. कारण, मोठ्या प्रमाणावर त्यांना मारले जात आहे. गाढव मानवी दृष्टिकोनाच्या चौकटीतून सुंदर, गोजिरवाणे वगैरे नाही. त्याचा आवाजही मधुर नाही. गाढव तसे माणसाला लळा लावत नाही. मग गाढवांना का मारले जाते? तर घरात जर छोटे बाळ असेल, बारीक असेल रडारड करत असेल आणि नसेल तरी घरातल्या आयाबाया गाढविणीचे दूध बाळाला प्यायला देतात. याच्या मागचे कारण की, लोकांचे म्हणणे आहे गाढविणीचे दूध प्यायले की अक्कल येते. आता त्या दुधात अशी शक्ती आहे, याबाबत काय खरे, काय खोटे, माहिती नाही. पण गाढवाचे मांस खाल्ले की, शरीरात ताकद येते. लैंगिक शक्ती वाढते. माणूस कितीही जोरात पळू शकतो, चपळ होऊ शकतो, असा काही लोकांचा समज आहे. त्यामुळे ६०० रुपये किलोने काही लोक हे मांस खरेदी करतात. आंध्र प्रदेशमध्ये तर या मांसाचा विशेष बाजार भरतो. महाराष्ट्र आणि इतर आजूबाजूच्या राज्यातून गाढवे आणली जातात. शक्ती वाढवणारे गाढवाचे मांस खाण्यासाठी लोक तुटून पडतात. त्यांच्या खाण्यासाठी मग गाढवांची कत्तल होत गेली. परिणामी गाढव प्रजाती नामशेष होऊ लागली. पण यावर काही लोकांचे म्हणणे की, गाढव शरीराने नामशेष झाले, पण मनाने ते काही विशिष्ट लोकांमध्ये आहेत. जे सोडलेल्या सांडासारखे केंद्रात सत्ता येण्यासाठी हपापले आहे, त्यासाठी वाट्टेल ते चाळे करत आहे, त्यांना पाहून वाटत नाही की, गाढव प्राणी नामशेष होत आहे. पण असेही वाटते की, या सत्तापिपासूंची तुलना गाढवांशी का करावी? गाढव कसेही असले तरी सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ती भकास तडजोड करत नाही. त्यामुळे खर्‍या गाढव प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवले पाहिजे.
 
 


नीलम, विद्या आणि रुपाली

 
 
आहेत बरं नीलम गोर्‍हे, सुप्रिया सुळे, विद्या चव्हाण आणि रुपाली चाकणकर बाईही आहेत. तुम्हाला काय वाटलं, त्यांनी राजकारण सोडलं? नाही... नाही... त्या आहेत बरं. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. त्यांच्या पक्षाच्या धनाभाऊंनी ‘तिहेरी’ गोंधळ केला आणि हाऽऽ गदारोळ माजला. सगळेच संविधानातील कायद्याच्या बाहेरचेच. दोन पत्नी, दोनपेक्षा जास्त अपत्ये, त्यात बलात्कार आणि धमकावण्याचा आरोप. पण त्यावेळी यांची जीभही गप्प होती. सामान्य लोक नेत्याचे अनुकरण करतात. इथे तीन-तीन प्रकरणं राजमान्य होतात, तर आपल्याला काय दोन प्रकरणं करता येणार नाहीत. असा भाव युवकांच्या मनात येतो. पण या अशा प्रकरणामुळे समाजासमोर काय आदर्श ठेवला जातो, याबाबतही या नेत्या मूग गिळून गप्प होत्या. तेव्हा महिला नेत्या म्हणून महिलांविषयीची कळवळ वगैरे वगैरे सगळेच त्या विसरल्या. दुसरे वनमंत्री संजय राठोड. त्यांच्या बाबतीत तर यांनी ‘ब्र’ही काढला नाही. एक युवती जीवानिशी गेली. मृत्यूनंतरही तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले. पण तिच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, असे यांना वाटले नाही. त्यावेळी कुंभकर्णाची झोप त्यांना आली होती. आता लोकांचे राज्यातील गंभीर परिस्थितीकडून लक्ष कसे हटवायचे हा विचार समस्त राज्य सरकारला पडला. मग यापैकी एक असलेल्या रूपालीबाईंनी ट्विट केले की, पेट्रोलपंपावर मोदींचा बॅनार किंवा जाहिरात आहे त्या बॅनर किंवा फलकांखाली दगडाची किंवा विटांची चूल मांडून गॅसच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ प्रतीकात्मक आंदोलन केले जाईल. असे थातूरमातूर आंदोलन त्यांनी केलेही. पण, गॅस किंवा पेट्रोलच्या किमती का वाढतात, यावर चाकणकरांना माहिती असण्याचे कारण नाही. त्यांना कोण समजावणार की, महाराष्ट्रातल्या श्रीमंत असू दे की, गरिबातला गरीब असू दे, त्याला भाकरीपेक्षा इज्जत प्यारी आहे. त्यामुळे इथे मुलीबाळींच्या इज्जतीसोबत त्यांचा जीवही जात असेल तर तो रुपाली चाकणकरबाई तुमचे चूलबिल मांडणे बघणार नाही. लोकांना माहिती आहे की, पद टिकवण्यासाठी तुम्हाला असे करावे लागते. पण महाराष्ट्रात मुलीबाळी जगाव्यात, यासाठी आंदोलन करा. पण रुपाली, विद्या, नीलम की सुप्रिया असू देत; त्यांना आता असे आंदोलन करता येणार नाही. कारण, राज्यातल्या मुलीबाळींच्या जीवापेक्षा त्यांना सत्ता महत्त्वाची आहे.
@@AUTHORINFO_V1@@