चिरफाळलेल्या लेबेनॉनच्या दुर्दैवाचे दशावतार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

MMM_1  H x W: 0
२०२० ऑगस्टच्या स्फोटाची चौकशी करण्यासाठी लेबेनॉन सरकारने तारीक बितार नावाच्या न्यायाधीशाची नेमणूक केली. त्यावरून ‘हेझबोल्ला’, ‘अमल मूव्हमेंट’ आणि ‘लेबॅनीज फोर्सेस’ या तिन्ही गटांत आपसात सशस्त्र दंगल होऊन अनेक लोक ठार झालेत. ही घटना अगदी नुकतीच म्हणजे दि. १४ ऑक्टोबर रोजी घडलीय.
 
 
ते पाहा शहर बैरुत. भूमध्य सागराच्या किनार्‍यावरचं एक अत्यंत सुंदर शहर. खुद्द फे्रेंच राज्यकर्त्यांनाच हे शहर इतकं आवडलं की, त्यांनी स्वत:च त्या शहराचं नामकरण करुन टाकलं - मध्यपूर्वेतलं पॅरिस! इजिप्तमध्ये उत्खननात काही मातीच्या भाजक्या विटा सापडल्या आहेत. ख्रिस्तपूर्व १५व्या शतकातल्या इजिप्तमधल्या राजांची ती पत्रं आहेत. त्यांना म्हणतात, ‘अमार्ना लेटर्स.’ त्यात बैरुत या भरभराटलेल्या संपन्न शहराचा उल्लेख आहे. आजचा लेबेनॉन आणि सीरियाचा काही भाग या प्रदेशात त्या काळी ‘फिनिशियन’ नावाच्या संस्कृतीचे लोक नांदत होते, या ‘फिनिशियन’ लोकांच बैरुत हे अतिशय समृद्ध असं व्यापारी बंदर होतं.
 
 
आता ख्रिस्तोत्तर २१वं शतक सुरू आहे आणि ख्रिस्तपूर्व १५वं शतक म्हणजे आजपासून सुमारे ३५०० ते ३६०० वर्षांपूर्वीपासून बैरुत हे शहर नांदतं आणि वाजतगाजत आहे. परंतु, बैरुत हे राजधानीचं शहर आणि त्रिपोली हे आणखी एक महत्त्वाचं बंदर शहर हे जमेस धरूनसुद्धा अख्खा लेबेनॉन देश अगदीच छोटा आहे. सगळं मिळून क्षेत्रफळ फक्त १०,४५२ चौ.किमी आणि लोकसंख्या अवघी ६८ लाख.
 
 
आपल्याला नीट कल्पना यावी म्हणून थोडी तुलनात्मक आकडेवारी मांडतो. आपल्या भारत देशात एकंदर २९ प्रांतं आहेत. गोवा हा त्यापैकी सर्वात छोटा गोवा प्रांत. क्षेत्रफळ ३,७०२ चौ. किमी आणि लोकसंख्या सुमारे १४ लाख. गोवा प्रांताला लागून आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्याचं क्षेत्रफळ ५,२०७ चौ.किमी आणि लोकसंख्या सुमारे ८४ लाख. आता गोवा आणि सिंधुदुर्गाला तिथेच सोडून आपण पश्चिम दिशेकडे पाहू या. पश्चिम समुद्र किंवा अरबी समुद्र या नावाने ओळखला जाणारा हिंदी महासागराचा विस्तीर्ण जलाशय ओलांडला की दिसतं, अरेबियन द्वीपकल्प. दिवाळीच्या फटाक्यातल्या ‘अनारा’ची आठवण करून देणार्‍या आकाराच्या या द्वीपकल्पाचं बूड म्हणजे यमन (येमेन) आणि उमान (ओमान) हे देश. मग दिसतो, अरबस्तान किंवा सौदी अरेबिया हा अफाट देश. मग इराक मग सीरिया आणि जॉर्डन. मग त्यांच्याही पुढे भूमध्य सागराच्या अगदी कडेवर एक चिरफळी एवढा लेबेनॉन देश आणि साधारण खंजिराच्या पात्यासारखा इस्रायल देश. या दोघांची किनारपट्टी म्हणजेच आशिया खंडाची सरहद्द. भूमध्य सागराच्या पलीकडे युरोप आणि खालच्या बाजूला आफ्रिका.
 
 
 
इस्रायल अत्यंत छोटा देश आहे, असं आपण ऐकत-वाचत असतो. लेबेनॉन त्याच्याही पेक्षा छोटा आहे. इस्रायलचं क्षेत्रफळ २२,७७२ चौ.किमी आणि लोकसंख्या ९४ लाख, ३० हजार. म्हणजे लेबेनॉन हा इस्रायलच्याही निम्मा आहे, पण अरेबियन द्वीपकल्पातल्या इतर देशांप्रमाणेच तोही अरब मुसलमानी देश आहे. त्यांच अधिकृत नाव आहे - अल् जम्हूरिया अल् लब्नानिया म्हणजेच ‘लेबेनॉन प्रजासत्ताक.’ परंतु, एक वांधा आहे. यमन, उमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि इराक या अन्य अरबी देशांमध्ये जसे बहुसंख्य लोक मुसलमान-अरब आहेत, तशी स्थिती इथे नाही. लेबेनॉनमधले ९५ टक्के लोक वंशाने अरब आहेत, पण त्यातले २८ टक्के सुन्नी मुसलमान, २८ टक्के शिया मुसलमान आणि ३९ टक्के अरब हे ख्रिश्चन आहेत. उरलेले चार टक्के आर्मेनियन वंशाचे ख्रिश्चन आणि एक टक्का अन्य सांप्रदायिक आहेत.
 
 
आता या ३९+४=४३ टक्के अरब ख्रिश्चन आणि आर्मेनियन ख्रिश्चनांमध्ये मॅरोनाईट, कॅथलिक, ग्रीक ऑर्थोडॉक्स वगैरे पंथोपपंथ असले, तरी ख्रिश्चन म्हणून ते साधारणपणे एकजूट असतात. १९४३ मध्ये फे्रंचांनी लेबेनॉनला स्वातंत्र्य दिलं, तेव्हापासूनच राष्ट्राध्यक्ष ख्रिश्चन, तर पंतप्रधान मुसलमान किंवा उलट अशी सत्तेची विभागणी करून मुसलमान आणि ख्रिश्चन गट सलोख्याने नांदत होते. १९४८ साली इस्रायल हे ज्यूराष्ट्र निर्माण झाल्यावर आजूबाजूच्या सर्व अरब देशांनी त्याच्यावर सैनिकी आक्रमण करून त्याला जन्मतःच चेपून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात लेबेनॉनही सहभागी होता.
 
 
अरब देश म्हटलं की, रखरखित वाळवंटी प्रदेश आणि त्या अफाट वाळवंटाखाली अपरंपार तेलसाठा अशी आपली समजूत असते. लेबेनॉन देश त्याला अपवाद आहे. या चिरफळी एवढ्या एक डोंगररांग उत्तरेकडून दक्षिणेकडे उभी धावली आहे. मग मध्ये थोडा भूभाग मोकळा सोडून आणखी एक डोंगररांग किंचित तिरकी अशी ईशान्येकडून नैऋत्येकडे धावली आहे. पहिलीला म्हणतात, ‘लेबेनॉन’ आणि दुसरीला म्हणतात, ‘अ‍ॅण्टिलेबेनॉन.’ या दोन्ही डोंगररांगांच्या माथ्यांवर चक्क बर्फ पडतो. ‘लब्ज’ या अरबी शब्दाचा अर्थ पांढरा-शुभ्र माऊंट लेबेनॉन. या बर्फाच्छादित शिखराच्या परिसरात वसल्यामुळेच भूमध्य सागराच्या काठावर असूनही शहर बैरूतची हवा मोठी सुखदायक, आल्हादायक असते. लेबेनॉन डोंगररांगेतून २२ छोट्या नद्या (खरं म्हणजे नालेच) डोंगररांगेचा बराच भाग सीरिया देशात येतो. त्यातून जॉर्डन ही बर्‍यापैकी मोठी नदी उगम पावते. दक्षिणेकडे थोड्या मोकळ्या प्रदेशात आल्यावर तीच जॉर्डन आणि इस्रायल या नदीतून भरपूर पाण्याचा उपसा करीत असतो. त्या पाण्यावर इस्रायली शेतकरी वाळवंटात नंदनवन फुलवीत असतात आणि ते पाहून जॉर्डेनियन अरब मुसलमान फक्त जळफळत असतात.
 
 
 
असो. तर लेबेनॉन देश जरी चिरफळी एवढा असला, तरी तो अरब देश आहे. त्याच्या भूमीत तेल नसलं, तरी बैरुत आणि त्रिपोली ही अत्यंत मोक्याची व्यापारी लष्करीदृष्ट्या पूर्णपणे स्थिरस्थावर संपन्न अशी बंदरं त्याच्या ताब्यात होती. इतर अरब राष्ट्रप्रमुखांच्या पाठिंब्याने आणि या दोन बंदरांच्या व्यापारी महत्त्वपूर्ण स्थानांचा व्यवस्थित लाभ घेत, स्वत:चा विकास करून घेणं हे ‘लेबॅनीज’ सत्ताधार्‍याचं उद्दिष्ट असायला हवं होतं. १९४३ ते १०७० पर्यंत ते तसं होतंदेखील. पण, १९७० नंतर हळूहळू कटकटी सुरू झाल्या. अरब मुसलमानांना अरब ख्रिश्चनांना सत्तेतला वाटा देणं आवडेनासं झालं. यातून १९७५ साली लेबेनॉनमध्ये मुसलमान विरुद्ध ख्रिश्चन असं यादवी युद्ध पेटलं. आज या घटनेला ४५ वर्षे उलटून गेली आहेत. समझोत्याचे शेकडो प्रयत्न झाले आहेत, होत आहेत. तरीही आतापर्यंत शेकडो ठार झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, १ लाख, २० हजार लोक ठार झाले आणि दहा लाख लोकांनी देशातून अन्यत्र पलायन केलं आहे.
 
 
तसं अधिकृतरित्या यादवी युद्ध १९९० संपल्याचं जाहीर करण्यात आलं. पण, लेबेनॉन देश पूर्वपदाला काही आला नाही. ‘अमल’ या अरबी शब्दाचा अर्थ आशा. ‘अमल मूव्हमेंट’ हा शिया अरबांचा गट १९७४ सालीच स्थापन झाला होता. १९९२ साली ‘हेझबोल्ला’ हा नवा कडवा शिया गट निर्माण झाला. ख्रिश्चनांचा ‘लेबॅनीज फोर्सेस’ हा गट होताच हे सर्व गट आणि लेबेनॉनचं अधिकृत लष्कर हे सगळेच सशस्त्र गट अखंडितपणे एकमेकांशी संघर्ष करीत आहेत.
 
 
२०११ साली इजिप्त, लिबिया आणि सीरिया या अरब देशांमध्ये क्रांती झाली. तिला ‘अरब स्प्रिंग’ असं म्हणतात. इजिप्तचा हुकूमशहा हुस्नी मुबारक पदच्युत झाला. लिबियाचा मोहम्मद गद्दाफी ठार झाला. सीरियाचा बशर असद मात्र भलताच कजाख निघाला. त्याने बंडखोरांवर रणगाडे घालून त्यांना चिरडून टाकलं. आजही सीरियात कत्तली चालूच आहेत. या क्रांतीचा भयंकर चटका बसला आणि बसतो आहे, तो लेबेनॉनला. तो कसा?
 
 
इस्रायल आणि इजिप्तचं सख्य झाल्यामुळे सर्व अरब देश आणि इस्रायलने मिळून सगळ्यांच्याच हिताची एक उत्तम योजना आखली. ती म्हणजे, १२०० किमी लांबीची ‘अरब गॅस पाईपलाईन’ ही योजना आखली. इस्रायल-इजिप्त सीमेलगत सीनाई या प्रसिद्ध ठिकाणाजवळ आरिश या बंदरापूसन ही नळयोजना इस्रायल जॉर्डन, सीरियामार्गे तुर्कस्तानपर्यंत पोहोचली होती. वाटेत तिचा एक फाटा लेबेनॉनकडे वळवण्यात आला होता. २००३ मध्ये कार्यान्वित झालेल्या या नळातून इजिप्तचा मुबलक नैसर्गिक वायू थेट तुर्कस्तानपर्यंत पोहोचत होता. पण, २०११च्या अरबक्रांतीत या नळावर अनेक जागी हल्ले झाले. नळयोजना बंद पडली. इस्रायल आणि अन्य अरब देशांकडे पर्यायी योजना होत्या. लेबेनॉनचे हाल सुरू झाले. स्वस्त नैसर्गिक वायुपुरवठा बंद पडला. चलनवाढ इतकी झाली की, तेल आयात करणं, दिवसेंदिवस अवघ अवघड होत गेलं. २०१९ साली परकीय चलनसाठा ३० कोटी, ८० लक्ष डॉलर्स होता, तो २०२१च्या मे महिन्यात १० कोटी, ५० लक्षांवर घसरला.
 
 
त्याहीपेक्षा एक भयंकर संकट ऑगस्ट २०२० मध्ये गुदरलं. दि. ४ ऑगस्ट, २०२० या दिवशी बैरुत बंदरातल्या एका गोदामातल्या २,७५० टन एवढ्या अमोनियम नायट्रेट या रसायनाच्या साठ्याला आग लागली आणि संपूर्ण बंदर जवळपास उद्ध्वस्त झालं. ‘अमेरिकन जिऑलॉजिकल सर्व्हे’ला या संस्थेच्या अंदाजानुसार हा मानवी इतिहासातला अणुस्फोट वगळता, सर्वात मोठा स्फोट होता. त्यामुळे ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यात नेमके किती लोक ठार झालेत, याचा अजूनही पत्ता नाही. मृतांचा अधिकृत आकडा आहे २८१, ज्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही.
 
 
वर्षभराने म्हणजे १५ ऑगस्ट २०२१ रोजी पेट्रोल वाहून नेणार्‍या एका टँकरचा स्फोट होऊन ३३ लोक ठार झाले. ९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण लेबेनॉन देशांत २४ तासांचा ‘ब्लॅक आऊट’ पाळण्यात आला. कारण, देशाला वीज पुरवणार्‍या दोन पॉवर ग्रीड केंद्रांकडे वीजनिर्मिती करण्यास इंधनाचा थेंबही शिल्लक नव्हता. २०२० ऑगस्टच्या स्फोटाची चौकशी करण्यासाठी सरकारने तारीक बितार नावाच्या न्यायाधीशाची नेमणूक केली. त्यावरून ‘हेझबोल्ला’, ‘अमल मूव्हमेंट’ आणि ‘लेबॅनीज फोर्सेस’ या तिन्ही गटांत आपसात सशस्त्र दंगल होऊन अनेक लोक ठार झालेत. ही घटना अगदी नुकतीच म्हणजे दि. १४ ऑक्टोबर रोजी घडलीय. एकंदरीत ‘अरब गॅस पाईपलाईन’ सुरळीत चालू करण्याचे सगळ्यांनीच मनावर घेतले, तरच लेबेनॉनची धडगत आहे. शिवाय इजिप्त आणि इस्रायलला त्यांच्या समुद्री प्रदेशात नैसर्गिक वायूचे नवे विपुल साठे सापडले आहेत.




@@AUTHORINFO_V1@@