प्रसारणातून अंत्योदय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2021   
Total Views |

ent_1  H x W: 0
आज १२ नोव्हेंबर... सार्वजनिक प्रसारण दिन. १९४७ रोजी महात्मा गांधींनी आकाशवाणीवरून राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यानिमित्ताने आजचा दिवस ‘सार्वजनिक प्रसारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक माध्यमे सध्या उपलब्ध आहेत. परंतु, आकाशवाणी आणि दूरदर्शनने स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनीसुद्धा ती विश्वासार्हता आजही जपली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा भारताच्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणीचा पर्याय निवडला. त्यांनी सत्तेमध्ये येताच दि. ३ नोव्हेंबर, २०१४ रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमामधून जनतेला जोडले. त्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळालादेखील. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाचा आवाज पोहोचण्यासाठी आकाशवाणी ही महत्त्वपूर्ण दुवा ठरली. सरकारी योजना व लोकांचे प्रश्न, सूचना आदींपासून ‘मन की बात’ या कार्यक्रमाने जनतेला शासन कारभारामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभागी करून घेतले. हेच लोकशाही आणि सार्वजनिक प्रसारणाचे अद्भुत यश आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, ‘न्यूज ऑन एआयआर’ या अ‍ॅप्लिकेशनवर ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या थेट प्रसारणामध्ये पाकिस्तानने पहिल्या दहामध्ये प्रवेश केला आहे. म्हणजेच भारतीय प्रसारण सेवा पाकिस्तानामध्येसुद्धा तितक्याच लोकप्रिय आहे. जागतिक पातळीवर आकाशवाणी प्रसारणाच्या सर्वोच्च क्रमवारीमध्ये ‘एआयआर न्यूज २४ X ७’, ‘एफएम रेनबो मुंबई’, ‘अस्मिता मुंबई’ आणि ‘एआयआर पंजाबी’ने ‘सर्वोच्च दहा’मध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. ‘न्यूज ऑन एआयआर’ या अधिकृत अ‍ॅप्लिकेशनवरून ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या २४० पेक्षा अधिक रेडिओ सेवा थेट प्रसारित केल्या जातात. ‘न्यूज ऑन एअर’ अ‍ॅप्लिकेशनवरील ‘ऑल इंडिया रेडिओ’ प्रसारण सेवेचा श्रोतृवर्ग केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात ८५ पेक्षा अधिक देश आणि आठ हजार शहरांमधून मोठ्या संख्येने असलेला दिसून येतो. याचाच अर्थ भारतातील सार्वजनिक प्रसारणाचे माध्यम भारतात अंत्योदयाचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वाचे ठरत असतानाच तेच जागतिक पातळीवरसुद्धा दखलपात्र ठरते आहे. यामुळेच येत्या काळात भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ प्रबळ होताना दिसेल, यात शंका नाही.

मनोरंजनाला नवचैतन्य,पण?

कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना मनोरंजन क्षेत्राला काही अंशी दिलासा मिळाला. ५० टक्के उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, निर्मात्यांनी ५० टक्के उपस्थितीमध्ये प्रतिसादाबाबत साशंकता दर्शविली होती. परंतु, दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित चित्रपटांनी सध्या चित्रपटसृष्टीमध्ये चैतन्याचे वातावरण आले आहे, असे म्हणता येईल. ‘न्यू नॉर्मल’नंतर मनोरंजन क्षेत्राला दिलासा देणारे फार काही घडताना दिसून येत नव्हते. परंतु, ऐन दिवाळीत प्रसिद्ध झालेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने चक्क १०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. यामध्ये हिंदीबरोबरच तामिळ, इंग्रजी चित्रपटांनासुद्धा रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये तामिळ चित्रपट ‘अन्नाइथ्थे’ने १८६.५८ कोटी, तर इंग्रजी चित्रपट ‘द इटर्नल्स’ या चित्रपटाने २२.८० कोटी रुपयांची कमाई केली. महाराष्ट्रामध्ये सध्या ५० टक्के आसनक्षमतेमध्ये थिएटर सुरु आहेत, तरीदेखील ‘सूर्यवंशी’ने पहिल्या दिवशी ४.५७ कोटी रुपयांची कमाई केली. देशभरामध्ये झालेले विक्रमी लसीकरण आणि दोन्ही मात्रा घेतलेल्यांची वाढलेली संख्यादेखील चित्रपटगृहाकडे प्रेक्षक वाढण्यामध्ये महत्त्वाचे कारण ठरली आहे. त्यामुळेच दिवाळीमध्ये रसिकांनी दीड वर्षापासून आलेली मरगळ झिडकारून चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट पाहण्यास पसंती दिलेली दिसते. येत्या काळात मराठीमधील ‘झिम्मा’ आणि हिंदीमधील ‘बंटी और बबली २’, ‘सत्यमेव जयते २’, ‘अंतिम - द फायनल ट्रुथ’ असे मोठे चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मनोरंजन क्षेत्रामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. परंतु, हिंदी चित्रपटांना सध्याच्या काळात देशभरातून मिळणारा प्रतिसाद आणि ५० टक्के आसनव्यवस्थेच्या नियमामुळे मराठी चित्रपट निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचेच दिसून येते. डिसेंबरअखेर हिंदीमध्ये मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नाताळ आदींच्या असणाऱ्या सुट्ट्यांमुळे पुन्हा एकदा ‘बॉक्स ऑफिस’वर हिंदी चित्रपटांचा वरचश्मा पाहायला मिळेल. मात्र, मराठी चित्रपटाला अद्यापतरी ‘ओटीटी’ किंवा १०० टक्के आसनव्यवस्थेची परवानगी मिळण्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे मराठीचा कैवार घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने आगामी काळामध्ये अन्य राज्यांप्रमाणे चित्रपटगृहांतील १०० टक्के आसनव्यवस्थेबाबत निर्णय घेऊन मराठी निर्माते, कलाकारांना दिलासा देणे गरजेचे आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@