जळफळाट तर होणारच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020
Total Views |


Pakistan_1  H x



कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपली नियोजित ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच घेतला. यावेळी परिषदेने या स्पर्धेची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियामधील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आयसीसीने यावेळी स्पष्ट केले. आयसीसीने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक देशांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, आयसीसीचे हे वागणे पाकिस्तानच्या काही पचनी पडले नाही. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने आयसीसीच्या या निर्णयावर कडाडून टीका केली. भारत आजच्या घडीला क्रिकेटचा महासत्ता म्हणून ओळखला जातो. भारताची जगप्रसिद्ध इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा व्हावी, यासाठीच आयसीसीने आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेला बगल दिली, असा आरोप शोएबने केला. आयसीसीसोबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाही यासाठी तितकाच कारणीभूत असल्याचे म्हणत अख्तरने क्रिकेट विश्वात नव्या वादाला तोंड फोडले. मात्र, पाकिस्तानच्या खेळाडूंव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशाच्या खेळाडूंनी आयसीसीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. याउलट अनेक देशांनी आयसीसीच्या या निर्णयाचे स्वागतच केले. त्यामुळे नेमके पाकिस्ताननेच या निर्णयावर आक्षेप घेण्याचे कारण काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. दहशतवादी हल्ले झाल्यापासून पाकिस्तानमध्ये जाऊन कोणतेही देश क्रिकेट खेळण्यास सहजासहजी तयारी दाखवत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानला दुबईमध्ये जाऊन क्रिकेट खेळावे लागते. दुबई हे सध्या पाकिस्तानचे ‘होम ग्राऊंड’ झाले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आयपीएल हे दुबईमध्येच खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीचे मुख्यालयही दुबईमध्येच आहे. त्यामुळे आता भारत आपल्याच धर्तीवर येऊन क्रिकेट खेळणार आणि कोट्यवधींची उलाढाल करणार, हे पाकिस्तानला सहन होत नाही. देश-विदेशातील खेळाडूंना येथे स्थान मिळणार. मात्र, पाकिस्तानच्या खेळाडूंना काही या स्पर्धेत संधी मिळणार नाही. आपल्याच धर्तीवर कोट्यवधींची उलाढाल होऊनही आपण त्यापासून वंचित राहणार, हे पाकिस्तानच्या खेळाडूंना सहन होत नसल्यानेच शोएब अख्तरसारख्या खेळाडूंचा जळफळाट होत आहे, असे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.



...म्हणून भारतविरोधात पोटशूळ!


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्या नियोजित क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून तर याकडे आणखीन गांभीर्याने पाहत आपल्या नियोजित मालिका थेट रद्दच करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ क्रिकेट स्पर्धाच नव्हे, तर अनेक खेळांच्या बाबतीत हीच परिस्थिती असून जगप्रख्यात स्पर्धाही यंदा कोरोनामुळे रद्द कराव्या लागल्या आहेत. दर चार वर्षांनी होणारी ऑलिम्पिक स्पर्धाही यंदाच्या ऐवजी पुढील वर्षी घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. वर्षानुवर्षे ज्या स्पर्धेची अनेक अ‍ॅथलिट्स आतुरतेने वाट पाहतात, ती स्पर्धा रद्द झाल्याने अनेकांची निराशा झाली. या स्पर्धेचे आयोजन टोकियो शहरात होणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धाच होऊ न शकल्याने आयोजनकर्त्या जपानलाही कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. केवळ ऑलिम्पिकच नव्हे तर फुटबॉल, हॉकी, टेनिस, हॉलीबॉल, पोलो, रग्बी आदी खेळांच्याही महत्त्वाच्या स्पर्धा रद्द झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या स्पर्धा रद्द झाल्यानंतर पाकिस्तानने आपल्या तोंडातून एक अवाक्षरही काढला नाही. परंतु, आयसीसीने ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धा रद्द केल्यानंतर पाकिस्तानने याविरोधात उघडपणे आवाज उठविण्याची भूमिका घेतली आहे. आपल्या खेळाडूंना मानधन देण्यासाठी पैसे नसल्याने पाकिस्तानचे क्रीडा मंत्रालय विविध प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना यश येताना दिसत नाही. क्रिकेट बोर्डाकडे पैसे यावेत यासाठी भारत-पाक मालिका सुरु करण्यासाठी पाकिस्तानचे अनेक खेळाडू प्रयत्नशील होते. मात्र, ते प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ स्पर्धा खेळून तरी काही कमाई करता येईल, अशी आशा क्रिकेट बोर्डाला होती. मात्र, ही स्पर्धाच रद्द झाल्यानंतर आता पैसे कमावण्यासाठी काय करायचे, असा प्रश्न आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर उभा आहे. इंग्लंडने आधी दुबईमध्ये पाकिस्तानसोबत मालिका खेळविण्याची तयारी दाखवली होती. मात्र, आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इंग्लंडनेही ही मालिका खेळण्यासाठी चालढकल करण्यास सुरुवात केल्याने पाकिस्तानच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळेच संघाचे माजी खेळाडू आयपीएल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबाबत (आयपीएल) आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@