कॅबिनेटने मंजूर केलेल्या 'बीच शॅक्स'मुळे गुहागर-दिवेआगर किनाऱ्यावरील कासव विणीला धोका !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020
Total Views |
beach shacks _1 &nbs
 
छायाचित्र - सागर पाटणकर 

कासव संवर्धनाच्या दृष्टीकोनातून 'बीच शॅक्स'चे धोरण आवश्यक

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मंजुरी देण्यात आलेल्या 'बीच शॅक्स' प्रकल्पामुळे गुहागर आणि दिवेआगर येथील समुद्री कासवांच्या विणीला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील समुद्री कासवांची सर्वात जास्त घरटी गुहागर किनाऱ्यावर होतात. अशा परिस्थितीत या किनाऱ्यावर 'बीच शॅक्स' उभारल्यास त्याचा विपरीत परिणाम कासवांच्या विणीच्या प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे कासव विणीचे किनारे वगळून किंवा कासव विणीच्या हंगामात योग्य त्या उपाययोजना राबवून 'बीच शॅक्स'चे धोरण ठरविणे आवश्यक आहे.
 
 
 
 
 
राज्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी 'बीच शॅक्स' उभारण्यास परवानगी देण्यात आली. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ किनाऱ्यांवर हे 'बीच शॅक्स' उभारण्यात येणार आहेत. या आठ किनाऱ्यांपैकी गुहागर आणि दिवेआगर किनाऱ्यांवर दरवर्षी 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या समु्द्री कासवाची विण होते. साधारण नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ही कासवे या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येतात. महाराष्ट्रातील २७ किनाऱ्यांवर कासवांची घरटी आढळतात. त्यापैकी सर्वात जास्त घरटी ही गुहागर किनाऱ्यावर सापडतात. या किनाऱ्यावर २०१८ मध्ये ३४, २०१९ मध्ये २३ आणि यंदा २०२० मध्ये २७ घरटी आढळली. यंदा या किनाऱ्याहून १ हजार १३१ कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. तर दिवेआगरच्या किनाऱ्यावर यंदा ४ घरटी सापडली होती. त्यामुळे अशा परिस्थितीत किनाऱ्यावर 'बीच शॅक्स' उभारल्यास त्याचा अडथळा कासव विणीच्या प्रक्रियेवर होण्याची दाट शक्यता आहे.
 
 
 
राज्यातील कासव विणीसारख्या संवेदनशील किनाऱ्यांवर 'बीच शॅक्स' उभारू नये, असे मत ज्येष्ठ सागरी संशोधक डाॅ. दिपक आपटे यांनी मांडले. नाहीतर अविचारीपणे घेतलेल्या या निर्णयाचे कासव संवर्धनाच्या अनुषंगाने आपल्याला दूरगामी परिणाम भोगावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. गोव्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने 'बीच शॅक्स' प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, गोव्यातील कासव विणीच्या चार किनाऱ्यांपैकी २ किनाऱ्यांवर शॅक्स आहेत आणि तेथील शॅक्स धारक कासव संवर्धनासाठी तयार केलेले धोरण पाळत नसल्याची माहिती गोव्यातील 'सीआरझेड' विषयक अभ्यासक सरिता फर्नांडिस यांनी दिली. कासव विणीच्या हंगामात या दोन किनाऱ्यांवर सायंकाळी सहा वाजता 'बीच शॅक्स' बंद करणे अपेक्षित असते. मात्र, शॅक्स धारक रात्री नऊ वाजेपर्यंत शॅक्स सुरू ठेवत असल्याचे त्यांनी सांंगितले. सर्वप्रथम कासव विणीच्या किनाऱ्यांवर शॅक्स उभारले जाऊ नयेत आणि उभारल्यास विणीच्या हंगामात त्यासंबंधी धोरण ठरविणे आवश्यक असल्याचे, देशातील आघाडीचे समुद्री कासव संशोधक एम.मुरलीधरण यांनी सांगितले. धोरणात्मक पातळीवर विणीच्या हंगामामधील किनाऱ्यावरची प्रकाशयोजना, पर्यटकांच्या वावराची वेळ, शॅक्स बंद करण्याची वेळ यासंबंधी काटेकोर नियम तयार करुन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे, ते म्हणाले.
 
 
सागरी जैवविविधतेच्या संदर्भात पर्यावरण विभागाशी सल्लामसलत करुन बीज शेक्ससाठी किनाऱ्यांवर जागा ठरवण्यात येतील. कासव विणीच्या धोरणाच्या संदर्भातही काम करण्यात येईल. - दिलीप गावडे, संचालक, पर्यटन संचालनालय 
 
 
काय उपाययोजना करता येतील ?
 
 
१) कासव विणीच्या किनाऱ्यावर शॅक्स उभारणे टाळावे. पर्यायी किनाऱ्यांचा विचार करावा.
२) शॅक्स उभारल्यास कासव विणीच्या हंगामात पर्यटकांच्या वावरावर मर्यादा घालाव्या.
३) विणीच्या हंगामात 'बीच शॅक्स' सुरू ठेवण्याची वेळ मर्यादित ठेवावी. (साधारण सायंकाळी सात नंतर शॅक्स बंद करावी)
४) रात्री किनाऱ्यावरील प्रकाशयोजना बंद असावी. कारण, विणीसाठी आलेल्या मादीला कृत्रिम प्रकाशाचा त्रास होतो.
५) मादी घरटे तयार करताना शॅक्सचा अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी. बऱ्याचदा मादी अडथळा जाणवल्यास त्या किनाऱ्यावर अंडी घालत नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@