चीनला जशास तसा धडा शिकवण्याचे लष्कर प्रमुखांना आदेश!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |

Meeting_1  H x


चीनने आगळीक केल्यास लष्कराला कारवाईचे स्वातंत्र्य

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत चीनला सडेतोड उत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीला संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग आणि हवाईदलप्रमुख आरकेएस भदौरिया उपस्थित होते.

या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना चीनच्या सीमेलगतच्या, हवाईहद्दीलगतच्या आणि मोक्याच्या सागरी मार्गावरील चिनी लष्कराच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रशियाच्या जर्मनीवरील विजयास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने मॉस्कोत होणाऱ्या भव्य लष्करी कवायतींना उपस्थित राहण्यासाठी रशियाला रवाना होण्यापूर्वी संरक्षणमंत्र्यांनी लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला.

सीमेचे रक्षण करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली असून सशस्त्र दलांना संपूर्ण सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनने कोणतीही आगळीक केल्यास कशाचाही विचार न करता जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सशस्त्र दलांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१५ जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. कोणत्याही क्षणी समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.
@@AUTHORINFO_V1@@