"आपली रोजीरोटी महत्त्वाची आहेच, पण..."; लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना चित्रा वाघ यांचा मोलाचा सल्ला
09-Jun-2025
Total Views |
मुंबई : मुंब्रा स्थानकदरम्यान घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर सर्वाच स्तरांतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईकरांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. आपली रोजीरोटी ही महत्त्वाची आहेच. पण, त्याचवेळी आपल्या घरातील मंडळी आपली वाट पाहत असते हेसुद्धा महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
आपल्या 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, "मुंबईत मुंब्रा स्टेशनजवळ घडलेली लोकल दुर्घटना अत्यंत दुःखदायक आहे. गर्दीच्या वेळी लोकलमधून खाली पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी पाच-सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई हे अतिशय गजबजलेले शहर आहेच. पण, प्रवाशांनीसुद्धा आपल्या जीवाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करणारे हे दुर्दैवी जीव होते आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे."
"लोकलने प्रवास करताना सर्वांनी एक लक्षात घ्यावे की, आपली रोजीरोटी ही महत्त्वाची आहेच. पण, त्याचवेळी आपल्या घरात आई, वडील आणि बायको, मुले हेदेखील फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत. ते तुमची वाट पाहत असतात. जे प्रवासी मृत्युमुखी पडले, त्यांचे कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त झाले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मुंबईमध्ये प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असतेच. प्रवाशांनीसुद्धा आपली काळजी घेत सरकारला सहकार्य करायला हवे. सुरक्षित प्रवास करा, नेहमी सुरक्षित राहा," असे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले आहे.