संगीत मन को पंख लगाए...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
VV_1  H x W: 0


प्लेटोच्या लेखनावर संशोधन करणारे ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातील एक संशोधक जे. केनेडी यांनी नुकतेच पायथागोरसच्या बारा सुरांच्या ‘नोटेशन’चा उपयोग करून प्लेटोच्या लेखनातील गूढ संकेत उलगडले आहेत.



पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या ‘कट्यार काळजात घुसली’मध्ये एक छोटासा प्रसंग आहे. खाँसाहेबांचे पुतणे आणि शिष्य असणारे चाँद व उस्मान आपसात बोलत असतात. एकजण म्हणतो, “मी बाहेरून येत होतो आणि खाँसाहेबांची तान माझ्या कानावर पडली. बारा सुरांची दाणेदार तान!” सात शुद्ध स्वर, चार कोमल स्वर आणि एक तीव्र स्वर मिळून होणारी ही बारा सुरांची तान अत्यंत अवघड असते. ती गळ्यातून निघण्यासाठी गळ्यावर कमालीचं नियंत्रण लागतं. ही तान कोणत्याही स्वररचनेत म्हणजे बंदिशीत, रागामध्ये ऐकायला मिळत नाही. गळ्यावर ताबा मिळवण्यासाठी, रियाझासाठीच ती वापरली जाते.

भारतीय संगीत हे ‘मेलडी’वर आधारित आहे. त्यामुळे बारा सुरांची तान प्रत्यक्ष रागरचनेत येत नाही. परंतु, पाश्चिमात्त्य संगीत हे ‘हार्मनी’वर आधारित आहे. त्यामुळे तिथे हे शक्य आहे. पाश्चिमात्त्यांचे सर्वच क्षेत्रांमधील ज्ञान हे ग्रीकांपासून सुरू होतं. प्राचीन ग्रीक संगीतामध्ये बारा सुरांचं एक ‘नोटेशन’ प्रसिद्ध आहे नि ही स्वररचना पायथागोरसची असावी, असा अंदाज आहे.

पायथागोरस हे नाव आलं की, आपल्याला शाळेतल्या भूमितीतला ‘काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग हा त्याच्या इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बरोबर असतो’ हा पाठ केलेला सिद्धांत आठवतो. हिंदू ऐतिहासिक परंपरेनुसार हा सिद्धांत बोधायन ऋषींनी मांडलेला आहे. प्लेटोच्या लेखनावर संशोधन करणारे ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातील एक संशोधक जे. केनेडी यांनी नुकतेच पायथागोरसच्या बारा सुरांच्या ‘नोटेशन’चा उपयोग करून प्लेटोच्या लेखनातील गूढ संकेत उलगडले आहेत.


तुम्ही म्हणाल, काय चालतंय हे सगळं? बारा सुरांची तान काय, मेलडी काय, हार्मनी काय, गणितज्ज्ञ पायथागोरसची संगीतरचना काय आणि आता हा प्लेटो कुठून आला? हे सगळं एखाद्या हिंदी डेली सोप मालिकेसारखं होतंय!

थांबा, थांबा! असे उतावीळ होऊ नका. आपण संमतवार सगळं पाहूया. पायथोगोरस हा प्राचीन ग्रीक गणितज्ज्ञ होता. इसवी सन पूर्व ५८४ ते ५१० हा त्याचा काळ समजला जातो. त्याच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. परंतु, त्याने पुष्कळ प्रवास केला होता आणि अनेक देशांमधून ज्ञान मिळवलं होतं, एवढं नक्की. दक्षिण इटलीतल्या क्रोटोना या ग्रीक शहरात तो स्थायिक झाला. तिथे त्याने स्वतःची एक संस्था काढली. या संस्थेतल्या लोकांनी गणित व भूमिती या ज्ञानक्षेत्रांमध्ये फार मूलभूत असं काम केलं. सामाजिक जीवनातही पायथागोरस नि त्याचे शिष्य हे साधेपणा, संयम, मिताहार आणि आज्ञापालन या गुणांसाठी प्रसिद्ध होते.

पण कोणत्यातरी अज्ञात कारणाने पायथागोरसच्या संस्थेवर राजसत्तेची गैरमर्जी झाली. सत्ताधारी सैन्याने पायथागोरसच्या संस्थेवर हल्ला चढवून त्याच्यासकट त्याच्या अनेक शिष्यांना ठार केलं. एका दंतकथेनुसार स्वतः पायथागोरस या कत्तलीतून बचावून क्रोटोनामधून पळून जाण्यात यशस्वी झाला. पण, या घटनेमुळे ‘पायथागोरियन स्कूल’बद्दल लोकांच्या मनात धास्ती निर्माण झाली. गणित व भूमिती वगळता त्याचे तत्वज्ञानात्मक सिद्धांत स्वीकारायची हिंमत कुणाला होईना.

यानंतर सुमारे २०० वर्षांनी सॉक्रेटिस होऊन गेला. इसवी सन पूर्व ४६९ ते ३९९ हा त्याचा काळ. प्रसिद्ध ग्रीक गणराज्य अथेन्स ही त्याची जन्मभूमी. सुरुवातीची कित्येक वर्षे सॉक्रेटिस हा सैनिकी पेशात होता. मग तो ज्ञानाच्या क्षेत्रात शिरला. प्रत्येक गोष्टीवर, ‘हे असं का?’ म्हणून प्रश्न करायचा आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी शक्य तितक्या खोल खोल जायचं, हे सॉक्रेटिसचं वैशिष्ट्य. त्याने आयुष्यात एकही ग्रंथ लिहिला नाही किंवा स्वतःचं असं कोणतंही ‘स्कूल’ उभं केलं नाही. किंबहुना, ज्ञानाचं असं पठडीबंद ‘स्कूल’ बनवणंच त्याला अमान्य होतं. त्याची वैचारिक मांडणी आज आपल्याला कळते ती त्याच्या दोघा शिष्यांच्या पुस्तकांमधून. एक पुस्तक झेनोफोन याचं ‘मेमोरेबिलिया’ आणि दुसरं प्लेटोचं ‘डायलॉग्ज.’

सॉक्रेटिसच्या अनेक शिष्यांपैकी सर्वात नामवंत शिष्य म्हणजे प्लेटो. हा अथेन्सच्या राजघराण्यातला होता. आदर्श राज्यव्यवस्था कशी असावी, याचं वर्णन करणारं प्लेटोचं ‘रिपब्लिक’ हे पुस्तक आजही अभ्यासलं जातं. इसनी सन पूर्व ४१7 ते ३४7 हा प्लेटोचा काळ. प्लेटोच्या ‘डायलॉग्ज’मधलं बरंच लेखन म्हणजे सॉक्रेटिसचं बौद्धिक वर्गच आहेत.

प्लेटोचा शिष्य अॅरिस्टॉटल. इसवी सन पूर्व ६८४ ते ३२२ हा त्याचा कालखंड. सॉक्रेटिस आणि प्लेटो यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाची पुंजी आणि स्वतःची बुद्धिमत्ता यांच्या मिलाफातून अॅरिस्टॉटलने लॉजिक, र्हेटोरिक, पोएटिक्स, फिजिक्स, मेटॅफिनिक्स, एथिक्स, सायकोलॉजी, पॉलिटिक्स, हिस्ट्री ऑफ अॅनिमल्स आणि मिटिऑरॉलॉजी एवढ्या विषयांवर ग्रंथरचना केली. अॅरिस्टॉटलचं तत्त्वज्ञान वाचून रॉवर बेकन, इमॅन्युएल कांट, स्पिनोझा, देस्कार्ते इत्यादी आधुनिक विचारवंत प्रभावित झाले.

त्यामुळे सॉक्रेटिस, प्लेटो आणि अॅरिस्टॉटल या ग्रीक विद्वान त्रयीकडे आधुनिक विज्ञानाचे मूळ प्रेरक म्हणून पाहिलं जातं. गेली दोन हजार वर्षे हजारो विद्वान या तिघांच्या तत्त्वज्ञानाचा पुन्हा पुन्हा अभ्यास करत आले आहेत. अॅरिस्टॉटलच्या लेखनात कठीण, न समजणारं असं काही नाही. सॉक्रेटिसचं स्वतःचं असं काही लेखनच नाही. प्लेटो हे मात्र थोडं गूढ प्रकरण आहे. त्याच्या लेखनातल्या काही गोष्टी कळायला सोप्या, साध्या, सरळ पद्धतीने मांडलेल्या अशा आहेत. काही गोष्टी मात्र अजिबात समजत नाहीत. पुनःपुन्हा वाचून, विचार करूनही त्या मांडणीतून प्लेटोला नक्की काय म्हणायचं आहे, हे अजिबात समजत नाही. त्यामुळे या लेखनात काहीतरी गूढ, रहस्यमय, सांकेतिक आहे, असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे.

सांकेतिक भाषा म्हणजे काय, याचं एक अगदी साधं उदाहरण पाहा. आपल्याकडच्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये एक शब्दप्रयोग आढळतो- ‘आम्ही तर कानधरली शेळी आहोत!’ म्हणजे नेमकं काय? लांडगा जेव्हा कळपातून शेळी पळवतो तेव्हा तो वाघाप्रमाणे तिचं नरडं धरून तिला उचलत नाही. तर फक्त तिचा कान धरून ओढतो नि ती शेळी मुकाट्याने, स्वतःच्या पायांनी चालत त्याच्या मागोमाग जाते. मग स्वतःला सोईस्कर ठिकाणी नेऊन लांडगा तिचा फडशा पाडतो. लांडग्याची ही कार्यपद्धती ज्यांना माहीत आहे, त्यांनाच फक्त वरील शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ कळेल.


प्लेटोच्या लेखनातील अशा सांकेतिक भाषेचा, गूढ, कूट शब्दप्रयोगांचा अर्थ उकलण्याचं काम मँचेस्टर विद्यापीठातील संशोधक जे. केनेडी हे करत होतं. केनेडींचं असं म्हणणं आहे की, मला ती सांकेतिक भाषा उलगडली आहे नि ती उलगडण्याची किल्ली मला कुठे गवसली, तर पायथागोरसच्या त्या बारा सुरांच्या नोटेशनमध्ये. केनेडी म्हणतात, याचा अर्थ असा तर नव्हे की, प्लेटो स्वतःच पायथागोरसच्या त्या बंदी आलेल्या संस्थेचा सभासद होता?

यातून अनेक तर्क निघतात. राजसत्तेची खप्पा मर्जी झाल्यामुळे कत्तल करण्यात आलेल्या ‘पायथागोरियन स्कूल’मधले काही लोक निश्चितच बचावले असावते. त्यांनी आपली संस्था गुप्तपणे चालू ठेवली असावी आणि २०० वर्षांनंतर झालेल्या प्लेटोवर प्रभाव टाकण्याइतपत ती गुप्तसंस्था प्रभावी असावी.


यातून सॉक्रेटिसच्या देहांत शिक्षेबद्दलही प्रश्न निर्माण होतात. सॉक्रेटिसने समाजातल्या तरुणांना प्रत्येक गोष्टीवर शंका घेण्यास शिकवलं म्हणजेच पाखंड फैलावलं, अशा आरोपाखाली त्याला विष पिऊन मरण्याची शिक्षा ठोठावण्यात आली, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. ‘पाखंड फैलावणं’ इत्यादी शब्दप्रयोग हे खास ख्रिश्चन शब्दप्रयोग आहेत. ख्रिश्चन धर्माला, बायबलला आव्हान देणार्या असंख्य स्त्री-पुरुषांना चर्चने ‘पाखंडी’ ठरवून ठार मारलं. पण, हे नंतरच्या काळात. कुणीतरी प्रश्न विचारतो म्हणून बुडण्याइतका तत्कालीन ग्रीकांचा धर्म लेचापेचा होता का? आणि खरंच तेवढ्याच कारणासाठी सॉक्रेटिसला मृत्युदंड देण्यात आला की, त्यामागे दुसरंच काही कारण होतं? म्हणजेच, तो पायथागोरसच्या सिद्धांतांचाच तर पुन्हा एकदा प्रचार करत नव्हता ना? पण, मग पायथागोरस असं काय भयंकर मांडत होता की, राजसत्तेने त्याच्या संस्थेची साफ वाताहात करावी? अशी प्रश्नमालिकाच यातून उभी राहते.


केनेडी यांनी प्लेटोची सांकेतिक भाषा उलगडली आहे, असं ते म्हणतायत. आता स्वतः केनेडी आणि इतरही संशोधक त्या भाषिक संकेतांचा वापर करून प्लेटोच्या लिखाणातली गूढं शोधून ती सगळ्यांना समजावून सांगतीलच. पण, एकंदरीत या सगळ्या वृत्तांतावरून असं वाटत राहतं की, पश्चिमेकडे ज्ञानाचे उपासक आणि राजसत्ता यांचे संबंध सतत संघर्षाचेच असेल पाहिजेत. पायथागोरसच्या संस्थेवर राजसत्तेने हल्ला केला. सॉक्रेटिसला राजसत्तेने विष प्यायला लावलं, तर पुढे अॅरिस्टॉटलाही अथेन्समधून पळून जावं लागलं. अॅरिस्टॉटलने अलेक्झांडरचं राजगुरुपद स्वीकारलं. अलेक्झांडर स्वतःला ‘ग्रीक’ म्हणवत असला तरी अथेन्सच्या ग्रीकांच्या मते, तो मॅसिडोनियन होता. त्यामुळे अथेन्सवाले अॅरिस्टॉटलवर भडकले. परिणामी, अॅरिस्टॉटल अथेन्समधून पळून गेला. पुढील काळात चर्चच्या हाती राजसत्ता आल्यावर त्यांनी तर ज्ञानोपासकांचा अतोनात छळ केला. सध्या राजसत्ता व्यापार्यांच्या हातात आहे नि त्यांनी संपत्तीच्या आमिषाने ज्ञानोपासकांना मिंधे करून ठेवले आहे.


आज भारतातही हीच स्थिती आहे. पण, प्राचीन भारतात मात्र राजसत्ता सदैव ज्ञानोपासक ऋषिमुनींच्या चरणी नम्र होती. किंबहुना, जे एकाच वेळी राजाही होते नि ऋषीही होते. अशा राजर्षी जनकासारख्यांच्या मालिकाच्या मालिका या देशात होऊन गेल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@