नवी दिल्ली : कोरोनाची वाढवणाऱ्या कालावधीत एक सुखद बातमी आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका डॉक्टरच्या पत्नीने एका बाळाला शुक्रवारी जन्म दिला. डॉक्टर आणि त्याची पत्नी दोघेही कोरोनाग्रस्त आहेत. यामुळे प्रसुतीत कुठला अडथळा येणार नाही ना, अशी सर्वांना शंका होती. मात्र, बाळाची प्रकृतीही एकदम ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या आई आणि बाळाला क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दिल्लीत कोरोनाग्रस्त आईचे जन्मलेले मुल सुखरुप असण्याची ही पहिलीच वेळ आहे. शरीर क्रिया विज्ञान विभागात काही डॉक्टरांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले होते. काही काळानंतर त्यापैकी एकाच्या गर्भवती पत्नीलाही कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यामुळे या डॉक्टर दाम्पत्याची चिंता वाढली होती.
एम्सचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. के. शर्मा यांच्या मते महिलेची प्रसुती सिझेरियनद्वारे करण्यात आली. डॉ. नीरजा बैटला यांच्या टीने ही शस्त्रक्रीया पार पाडली. या दरम्यान सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घेतली होती. बाळाची कोरोना चाचणी करावी की नाही याबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. स्तनपान केल्याने कोरोना पसरत नाही, त्यामुळे बाळाला तसा धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.