नसते सल्ले नको!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2020   
Total Views |
Suresh Tiwari _1 &nb
 
 
 
 
देशामध्ये आधीच कोरोनाचे संकट गडद होत असताना, धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी देशविघातक शक्ती टपून बसल्या आहेतच. या परिस्थितीचा फायदा घेऊन देशात अशांतता पसरावी, म्हणून देशात आणि देशाबाहेरील भारतद्वेष्टे आयत्या संधीच्या शोधात आहेत. तेव्हा, या बिकट परिस्थितीत धार्मिक सलोख्याला धक्का देणारी विधाने करुन सर्वांनीच संयम बाळगण्याची आज नितांत गरज आहे. हे सांगायचे कारण म्हणजे, उत्तर प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश तिवारी यांचे असेच एक वादाच्या भोवर्‍यात सापडलेले विधान. बरहाज विधानसभेतील या तिवारी महाशयांकडे काही स्थानिक नागरिक ‘तबलिगी’ जमातवाल्यांची तक्रार घेऊन आले. या स्थानिक नागरिकांना शंका होती की, ‘तबलिगी’ जमातीचे काही लोक त्यांच्या भाज्यांमध्ये थुंकून कोरोनाचा मुद्दाम फैलाव करत आहेत. यावर आमदार महाशयांनी या स्थानिकांना त्या नागरिकांशी न भांडता सरसकट मुस्लीम बांधवांकडून भाजीपाला खरेदी न करण्याचा सल्लाच देऊन टाकला. आता आमदार महाशयांचा उद्देश वाद वाढू नये आणि लोकांनाही दिलासा मिळेल, असाच असला तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे आधीच धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशात वातावरण अधिक तंग झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तिवारींना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावली. पण, आपल्या या एका विधानामुळे उत्तर प्रदेशात जातीय दंगे भडकू शकतात, ते भडकावले जाऊ शकतात, याचे राजकीय, सामाजिक भान ठेवणे तरी निदान सत्ताधारी आमदारांकडून तरी अपेक्षित आहे. असले सल्ले लोकांना त्यांच्याच भाषेत ‘ओपनली’ देताना त्याची ‘ओपन रिअ‍ॅक्शन’ काय होईल, याचा अंदाजही या तिवारी महोदयांनी आला नाही, हे दुर्दैवी. तिवारी आणि इतर सर्व आमदार, खासदार मंडळींनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नुकत्याच झालेल्या संबोधनातील विचारपांथेयाचे चिंतन करावे. राजकारण, समाजकारण करताना आपली नीती, वाणी कशी असावी, याचे मोहनजींनी उत्तम मार्गदर्शन केलेच. पण, शिवाय काही लोकांच्या दुष्कृत्याचा ठपका अख्ख्या समाजावरही ठेवून चालणार नाही, ही बाब प्रकर्षाने अधोरेखित केली. तेव्हा, नसते सल्ले देऊ नका, तर दिलेले सल्लेही जरा नीट ऐका!
 
 

स्क्रीनपेक्षा आपला फळाच बरा!

 
 
 
‘लॉकडाऊन’मुळे सर्वच क्षेत्रांबरोबर शिक्षणक्षेत्रातही अधिक जोमाने डिजिटायझेशनचे वारे वाहू लागले. बर्‍याच शाळा, महाविद्यालयांनी विविध ‘ऑनलाईन अ‍ॅप्स’च्या माध्यमातून डिजिटल वर्गही सुरु केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी असा ‘ऑनलाईन संवाद’साधून रखडलेला अभ्यासक्रमही काहीसा पुढे रेटला. सध्याच्या संकटसमयी हा पर्याय योग्य वाटत असला तरी हीच डिजिटल शिक्षण पद्धती सरसकट अंमलात आणावी, असाही मानणारा विद्यार्थ्यांसह, पालकांचा, शिक्षकांचा एक वर्गही आहे. परंतु, तसे करणे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या हिताचे नाही, हे समजून घ्यायला हवे. हल्ली कित्येक शिक्षकांना ‘झूम’ किंवा तत्सम अ‍ॅप्सच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन वर्ग घ्यावे लागतात. पण, बर्‍याच शिक्षकांशी याविषयी संवाद साधल्यावर जाणवले की, सर्वप्रथम तर ही शिकवण्याची नैसर्गिक पद्धत नाही. कारण, बराच वेळ शिक्षकांना स्क्रीन आणि वेबकॅमसमोर बसून शिकवावे लागते. त्यामुळे आपला चेहरा, एकूणच हावभाव आणि शारीरिक हालचालीही आपसुकच नैसर्गिक न राहता, त्यामध्ये एकप्रकारचा कृत्रिमपणा जाणवतो. शिवाय, समोर छोट्या-छोट्या विंडोमध्ये दिसणारे विद्यार्थी, त्यांची सतत सुरू असलेली चुळबूळ आणि तांत्रिक समस्यांमुळे हे ऑनलाईन वर्ग घेणे म्हणजे समाधानकारक अनुभव नक्कीच नाही. त्यातच विद्यार्थ्यांचे लक्ष स्क्रीनकडे असले तरी ते खरंच शिक्षकांचे ऐकत आहेत की त्यांचा ‘ऑनलाईन टाईमपास’ चाललाय, हे शिक्षकांना कळणार तरी कसे? वर्गात ज्या सहजतेेने विद्यार्थ्यांकडे शिक्षकांना लक्ष देता येते, चार प्रश्न विचारता येतात, फळ्याचा, शैक्षणिक साहित्याचा वापर करुन शिकवण्यात जो एक जीवंतपणा जाणवतो, तो या डिजिटल वर्गांत शोधनूही सापडणार नाही. इथे जाणवते ती नुसतीच शैक्षणिक कर्तव्याची कृत्रिमता. त्याचबरोबर बरेच शिक्षक तंत्रकुशल नाहीत. बर्‍याच जणांकडे संगणक, लॅपटॉप नाहीत आणि मग अशा पद्धतीने स्मार्टफोनच्या स्क्रिनमध्ये डोकं खुपसून, कमीत कमी शारीरिक हालचालींमुळे एक प्रकारचा मानसिक थकवा जाणवत असल्याचीही तक्रार शिक्षक करतात. अशावेळी इतर शिक्षकमित्रांशी कमी झालेला संवाद, शाळा-महाविद्यालयातील त्या गंभीर शैक्षणिक वातावरणाचा अभाव हा डिजिटल वर्गांचा अनुभव रटाळ आणि कंटाळवाणा ठरतो. म्हणून बरेच शिक्षकच म्हणताहेत, ‘स्क्रीनपेक्षा आपला फळाच बरा!’


@@AUTHORINFO_V1@@