जग एक कर्मभूमी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020
Total Views |


jag ek karmabhumi _1 


प्रापंचिक लोक व्यावहारिक स्वार्थबुद्धीने वागत असल्याने त्यांच्या ठिकाणी सारासार विचार, विवेक कमी होताना दिसत आहे, अशा स्थितीत परमार्थ डावलून फक्त प्रपंचाकडे बघितल्याने कोणाचेही हित साधणार नाही.


समर्थांनी तत्कालीन समाजाची मानसिकता विचारात घेऊन दासबोधात प्रपंच विज्ञानाची महती सांगितली. ’आधी प्रपंच करावा नेटका’ असे समर्थ म्हणाले, हे जरी खरे असले तरी ‘प्रपंच’ व ‘परमार्थ’ दोन्ही चालवाल तर तुम्ही विवेकी व त्यामुळे सुखी व्हाल, असे समर्थांनी दासबोधात स्पष्ट केले आहे. हे आपण मागील लेखात पाहिले. स्वामींनी प्रपंच विज्ञानाची महती सांगून लोकांना नैराश्यातून बाहेर काढले व प्रपंचाची अवहेलना थांबवली, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. आजकाल प्रपंच परमार्थ नव्हे, तर सर्व क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन व जीवनविषयक गणिते बदलली आहेत. प्रापंचिक लोक व्यावहारिक स्वार्थबुद्धीने वागत असल्याने त्यांच्या ठिकाणी सारासार विचार, विवेक कमी होताना दिसत आहे, अशा स्थितीत परमार्थ डावलून फक्त प्रपंचाकडे बघितल्याने कोणाचेही हित साधणार नाही.



विवेकशून्य प्रपंचाला नेटका प्रपंच म्हणता येत नाही आणि समर्थांनी तर
’प्रपंच करावा नेटका’, असे सांगितले आहे. आजकाल आम्हाला ‘माझा प्रपंच’, ‘माझे कुटुंब’, ‘माझा पैसा’, ‘माझ्या सुखसोयी’ या कल्पनांचे आकर्षण आहे. आहे ते सर्व माझ्यासाठी, असे वाटू लागले आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत, ज्यांना केवळ आपल्या प्रपंचाची आस्था असते, त्यांना परमार्थ शिकवण व्यर्थ वाटते. त्यांना वाटते की, परमार्थ विचार हा अडाणीपणा आहे, ती ढोंगबाजी आहे. समाजाने असा विचार करावा, ही चिंतेची बाब आहे. स्वामींनी दासबोधात स्पष्ट केले आहे की, प्रपंच-परमार्थ विवेक सांभाळला तर जीवन सुखी व यशस्वी करता येते. याला समर्थ ’शहाणपण’ म्हणतात. हे शहाणपण आपल्याला दासबोधातून शिकायचे आहे. समर्थांचे या संबंधीचे विचार कालबाह्य झालेले नाहीत आणि यापुढेही होणार नाहीत.



स्वामींनी दासबोधाच्या ११-३ या
‘शिकवण निरुपण’ नावाच्या समासात प्रथम मानवी देहाचे, मानवी जन्माचे महत्त्व सांगून त्यात नीती, न्यायाने व निर्मळपणाने वागले तरच जीवनाचे सार्थक होणार आहे, हे स्पष्ट केले आहे.

बहुता जन्मांचा शेवट ।

नरदेह सापडे अवचट ।

तेथे वर्तावे चोखट । नीतिन्याये॥

शेवटी मानवी जीवन मिळाले, पण सामान्य माणूस आपले जीवन कसे व्यतीत करतो, हे पुढे सांगितले आहे.

शत वरुषे वय नेमिले ।

त्यात बाळपण नेणता गेले

तारुण्य अवघे वेचिले । विषयांकडे ॥

वृद्धपणी नाना रोग ।

भोगणे लागे कर्मभोग ।

आता भगवंताचा योग। कोणे वेळे ॥ (११.३.३ व ४)



माणसाचे आयुष्य शंभर वर्षांचे मानले तरी बालपणाचा काळ खेळण्या
-बागडण्यात अर्थात अज्ञानात जातो. नंतर तारुण्यकाळ येतो. त्या काळात विषयसुख व इंद्रियभोग या पलीकडे विचार करण्याची तयारी नसते. पुढे म्हातारपणी सर्व शक्ती क्षीण होऊ लागतात. शरीराला रोग सतावतात. तसेच कर्मसिद्धांतानुसार कर्मभोगही भोगावे लागतात. त्यामुळे जीवाला स्वस्थता मिळत नाही. मग या शंभर वर्षांच्या आयुष्यात भगवंताचा विचार केव्हा करणार? सर्व भोग, उपभोग, कर्मभोग झाले, पण ज्या भगवंताने जन्माला घातले, त्या भगवंताचा योग येणार केव्हा? असे स्वामी विचारतात. बरं, हे आयुष्य तरी सुखाने जगता येते का? त्यात अनंत अडचणी, त्रास आहेतच. अनेक तापदायक घटना घडतात. राज्यकर्त्यांनी केलेला छळ आहे. समर्थांच्या काळी सर्व हिंदुस्थानात म्लेंच्छांची सत्ता होती. राज्यकर्ते अनेक प्रकारे लोकांचा छळ करीत. त्या छळांचे प्रकार दासबोधात सांगितले आहेत.


नाना प्रकारीचे मार ।

दुर्जन मारिती अपार ।

प्राणी राजदंड पावत ।

जेरबंद चाबुकवेत ।

दरेमार तळवेमार होत ।

मोघरीमार बुधलेमार ।

बुक्या गचांड्या गुडघेमार ।

हस्तीपुढे बांधेन घालिती।

कडेलोट करणे ।

का भांड्यामुखे उडवणे।

 

या शिक्षांच्या प्रकारात चाबकाचे फटके मारण्यापासून तोफेच्या तोंडी देणे इ. अनेक प्रकारच्या छळांचे वर्णन दासबोधात दिले आहे. तसेच अनेक शारीरिक व मानवनिर्मित आपत्तींचे वर्णन दासबोधातून येते. सर्व आपत्ती मानवनिर्मित असत नाहीत. काही वेळा दैवी आपत्ती व संंकटांना सामोरे जावे लागते. अतिवृष्टी, महापूर, वादळे, दुष्काळ, अन्नधान्याचे दुर्भिक्ष, साथीचे रोग, रोगांमुळे अनेकांचे मृत्यू, अपघात, नैसर्गिक आपत्ती, त्यात कुटुंबाची वाताहत अशा अनेक संकटांना तोंड देता देता आयुष्याचा शेवट जवळ येतो. काहींना मानसिक समस्या सतावतात, नैराश्य, विफलता, प्रेमभंग, प्रिय व्यक्तींचा वियोग अशा समस्यांमुळे माणसाला जीवन नकोसे होते, जीवन खडतर असले तरी त्या जीवनात माणसाने नीती, न्यायाने वागावे, असे समर्थ सांगतात. तथापि काही माणसे अविचाराने, असत्याने, अनीतीने वागून आपल्या पदरी पाप जमा करीत असतात, पुण्यकर्मांकडे ते कानाडोळा करतात, त्यामुळे त्यांचा पुण्यमार्ग बुडालेला असतो. असे झाले तरी, समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात की, शहाण्या माणसाने असे करू नये.



आता तरी ऐसे न करावे।

बहुत विवेक वर्तावे ।

इह लोक परम साधावे । दोन्हींकडे॥ (११.३.९)



समर्थांनी इतके कळकळीने सांगूनही काही लोक आपल्या घमेंडीत असतात
. त्यांना हे समजत नाही. त्यांना असे वाटत असते की, वाट्टेल त्या मार्गाने पैसा मिळवून आपण चैन करायला हरकत नाही. कसले पाप अन् कसले पुण्य? हा सारा कल्पनांचा खेळ आहे. या घमेंडखोरांचे एक तत्त्वज्ञान असते. ते म्हणजे, ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये!’ त्यामुळे आपल्या दांडगाईच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर स्वैरपणे वागून ते अन्यायाने, अनीतीने हवा तसा पैसा जमवतात व चैन करतात. व्यवहारात आपण अशी अनेक उदाहरणे पाहतो. ते पापाने पैसा मिळवून चैन करतात, पण त्यांना या जन्मात त्यांच्या पापाचे फळ मिळताना दिसत नाही. ते चैनीत राहतात, असे का व्हावे? याचे उत्तर असे की, कर्मसिद्धातांनुसार मनुष्य जे कर्म करतो, ते वाया जात नाही. हे जग ही कर्मभूमी आहे. जसे कर्म करावे तसे त्याचे फळ भोगावे लागते, हा जगाचा नियम आहे. मग ते फळ या जन्मात नाही, तर मेल्यावर मिळते. हा फळभोग अतींद्रिय असल्याने शास्त्रात सांगितलेल्या सिद्धांतावर विश्वास ठेवावा लागतो. मृत्यूनंतर सोसाव्या लागणार्‍या यमयातनांचा हिसका मोठा असतो. मृत्यूनंतरच्या अवस्थांची शास्त्रातील वर्णने काल्पनिक आहेत, असे समजू नये. केलेल्या कर्माचा जाब केव्हा ना केव्हा तरी द्यावा लागतो. आपण केलेली दुष्कृत्ये सूक्ष्म जीवनात साठवली जातात. त्यामुळे ती वाया जात नाहीत.



नाना दोषे यातना कर्कश ।

शास्त्री बोलिले, अविश्वास ।

मानूच नये॥(३.८.१७)


समर्थ सांगतात की
, मानवी व्यवहारात एक शिस्त लावून दिलेली आहे.


मर्यादा सांडूनि चालती ।

ग्रामा दंडी ग्रामाधिपती

देशा दंडी देशाधिपती ।

नीतिन्याय सांडिता ॥

देशाधिपतीस दंडिता रावो ।

रायास दंडिता देवो।

राजा न करिता नीतिन्यावो ।

म्हणौन यमयातना ॥


चुकीचे
वागले तर, गावचा अधिकारी शिक्षा करतो. तो चुकीचे वागला तर देशाचा अधिकारी त्याला शिक्षा करतो. हा अधिकारी चुकीचे वागला तर राजा त्याला शिक्षा करतो आणि राजाच चुकीचे वागला तर यमयातना आहेतच. यासाठी प्रत्येकाने नीतीन्यायाने वागावे. यमयातना भोगणे अत्यंत कठीण आहे. पृथ्वीवर जे शिक्षेचे प्रकार आहेत, त्यापेक्षा यमयातना सोसायला कठीण आहेत. मेल्यावर पापी माणसाला ‘यातनादेह’ दिला जातो.त्यामुळे तेथील मार थांबतच नाहीत.

उठवेना बैसवेना । रडवेना पडवेना।

यातनेवरी यातना । भीमरूप दारुण ॥

यासाठी माणसाने नीतीन्यायाने, निर्मळपणे वागून प्रपंच व परमार्थ दोन्ही साधावे. आपण सुखी व्हावे व सर्वांना सुखी करावे.

- सुरेश जाखडी 
@@AUTHORINFO_V1@@