यापुढेही समाजासाठी काम करतच राहणार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

sandip patel_1  


कोरोनाचे संकट हे अगदीच अचानक आले. कोणाच्या ध्यानीमनी नसलेल्या या संकटामुळे सुरुवातीच्या काळात सर्वच अगदी भयभीत झाले होते. त्यात हातावर पोट असलेल्या मजुरांची, फेरीवाल्यांची स्थिती सर्वाधिक गंभीर होती. मात्र, तरीदेखील गोरेगाव येथील भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या प्रभागात मदतकार्य सुरू केले, ते आजही सुरूच आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...


संदीप दिलीप पटेल
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक
प्रभाग क्र. : ५८, गोरेगाव(प.)
संपर्क क्र. : ९८३३९७५३९३

कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावरच अचानक आले, त्यामुळे भारतासह संपूर्ण जगामध्ये सुरुवातीला मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर देशात २३ मार्चपासून संपूर्ण ‘टाळेबंदी’ लागू करण्यात आली. जनतेच्या भल्यासाठीच हा निर्णय घेणे सरकारला भाग पडले होते. मात्र, त्याचे काही प्रतिकूल परिणामही पाहावयास मिळाले; अर्थात जनतेच्या भल्यासाठीच ही ‘टाळेबंदी’ लागू करण्यात आली होती. मात्र, जनतेची ‘टाळेबंदी’च्या काळात होणारी गैरसोय आणि अडचणी दूर करण्यासाठी राजकीय पक्ष प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली. मुंबईतल्या गोरेगाव येथील भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनीही अगदी पहिल्या दिवसापासूनच मदतीला सुरुवात केली. एकीकडे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी ‘कोविड योद्ध्या’च्या रूपात रुग्णसेवा करीतच होते. मात्र, त्यांच्या मदतीला गोरेगावमध्ये संदीप पटेलही भक्कमपणे उभे होते. त्यामुळे आपल्या प्रभागातील सुमारे साडेचार हजार गरजूंना संदीप पटेल यांनी ‘टाळेबंदी’च्या काळात आधार दिला. त्यामुळे अगदी आपल्या फ्रंटलाईन ‘कोविड योद्ध्यां’प्रमाणेच संदीप पटेलही एका अर्थाने ‘कोविड योद्धा’च ठरले आहेत. पटेल यांची ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय सेवाभावी ट्रस्ट’ही यामध्ये सहभागी होती.

पटेल यांनी आपल्या प्रभागातील जवळपास साडेचार हजार कुटुंबांसाठी मोदी किटचे यशस्वी वाटप आपल्या यंत्रणेमार्फत केले. त्यामध्ये डाळ, तांदूळ, तेल, पीठ, साखर, चहा पावडर याचा समावेश होता. यामध्ये संदीप पटेल हे अगदी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचले हे विशेष. या किट्चे वाटप करताना गरजू व्यक्ती हाच निकष पाळण्यात आला, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचविणे संदीप पटेल यांना शक्य झाले. त्याचप्रमाणे रास्त दरात भाजीपाला आणि फळेविक्री केंद्रेही पटेल यांनी अगदी यशस्वीपणे चालविली. त्यासोबतच आपल्या प्रभागात वेळोवेळी ‘डोअर टू डोअर’ सॅनिटायझेशनही केले जाते. या किट्सचे वाटप झोपडपट्टी भाग, एसआरएच्या इमारतींमधील रहिवासी, जवाहरनगरची झोपडपट्टी, मोतीलालनगर, सिद्धार्थनगर, राम मंदिर परिसर या त्यांच्या प्रभागातील लोकांना करण्यात आले. त्यांच्या प्रभागात चाळींची संख्याही लक्षणीय प्रमाणात आहे. या चाळीत राहणार्‍यांना तर पटेल यांचा मोठाच आधार आहे. चाळीत राहणार्‍या प्रत्येक घरामध्ये संदीप पटेल यांनी मोदी किट आणि फूड पॅकेट्स पोहोचविले.



sandip patel_1  


लोकप्रतिनिधी म्हणून समाजाच्या समस्या दूर करणे, याची प्रेरणा माझे वडील दिलीप पटेल यांच्याकडून मिळाली आहे. ते मुंबई शहराचे उपमहापौर होते आणि २५ वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागातील जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे केवळ ‘टाळेबंदी’च्या काळातच नव्हे तर नेहमीच माझे काम सुरू असते आणि प्रभागातील जनतेची काळजी घेण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो.
फूड पॅकेट्चे वाटप साधारणपणे दोन ते अडीच महिने सलग गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आले. यामध्ये पटेल यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मोलाची मदत केली. सोबतच पटेल यांची स्वतःची यंत्रणाही कार्यरत होती. त्यामुळे रा. स्व. संघ, विहिंप आणि पटेल यांचे कार्यकर्ते यांनी अतिशय प्रभावीपणे प्रभागातील जनतेच्या अडचणी दूर करण्याचे काम केले. एका दिवसात सुमारे ५०० ते ६०० अन्नधान्य किट्स आणि फूड पॅकेट्सचे वाटप सुरू होते. यामध्ये फूड पॅकेट्स प्रामुख्याने सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनाही देण्यात आले. कारण या मंडळींनाच सर्वाधिक जोखीम पत्करून काम करावे लागत होते.पटेल यांनी स्थलांतरित मजुरांनाही मोठ्या प्रमाणावर दिलासा द्यायचे काम केले. कारण हातावर पोट असणार्‍या स्थलांतरित मजुरांपुढे ‘टाळेबंदी’मुळे मोठा प्रश्न उभा राहिला होता. यामध्ये फेरीवाले, बांधकाम कामगार आणि अन्य लोकांचा समावेश होता. ‘टाळेबंदी’मुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांना अन्नधान्य किट आणि फूड पॅकेट्समुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला.

हे सर्व सेवाकार्य करताना ५०० पॅकेट्सपासून पटेल यांनी सुरुवात केली, त्यासाठी प्रभागातील दुकानदारांची त्यांनी मदत घेतली. त्यानंतर जसजसे गांभीर्य वाढले, त्यानंतर मग प्रभागातील जैन संघटना (जितो), दिगंबर जैन समाज, स्वामी नारायण संप्रदाय आदी व्यक्ती पटेल यांच्यासोबत जोडल्या गेल्या आणि सेवाकार्यामध्ये त्यांनीही मोठ्या प्रमाणावर मदत करण्यास सुरुवात केली. अनेक उद्योजक, मोठे व्यावसायिक यांनीदेखील आपापल्या यथाशक्तीप्रमाणे मदत केली. अनेकांनी रोख स्वरूपात अथवा धनादेशाच्या स्वरूपात मदत करण्याची तयारी दाखविली. मात्र, रोख रक्कम घेण्यापेक्षा वेळोवेळी लागणारी अन्नधान्य किट्स आणि फूड पॅकेट्सच्या रूपात त्यांना मदत करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे एकाचवेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचणे पटेल आणि त्यांच्या सहकार्‍यांना शक्य झाले.पटेल यांच्या सेवाकार्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांना अतिशय खंबीर पाठिंबा होता. सुरुवातीच्या काळात सर्वच लोक घाबरले होते, त्यात साहजिकच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश होता. मात्र, मी संपूर्ण काळजी घेऊनच काम करीत आहे, हे पटेल यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पटवून दिले आणि त्यानंतर कुटुंबीयदेखील त्यांना अगदी समर्थपणे मदत करू लागले.
मात्र, यादरम्यान राज्य सरकारच्या यंत्रणेचा फार वाईट अनुभव पटेल यांना आला. महानगरपालिका आणि राज्य सरकार प्रशासन याकाळात अगदीच उदासीन होते. पटेल यांना कोणत्याही प्रकारची मदत दोन्ही प्रशासनाने केली नाही. कारण त्यांची कोणत्याही प्रकारची तयारी नव्हती. मात्र, त्याचवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पटेल यांना भरघोस मदत मिळाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, विद्या ठाकूर आदी नेत्यांनी पटेल यांना सर्वतोपरी साहाय्य केले. त्यामुळे सर्वांच्या सहयोगातून पटेल यांनी आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडले.

@@AUTHORINFO_V1@@