देश हमे देता हैं सब कुछ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2020   
Total Views |

Gita Moghe _1  
 
देश आणि समाजाने आपल्याला सर्वच दिले आहे. त्यांचे ऋण फेडायलाच हवे. या विचारांनी संपर्कात येणार्‍या प्रत्येक समाजघटकाच्या उत्कर्षासाठी कार्य करणार्‍या गीता मोघे. त्यांच्या जीवनपटाचा घेतलेला आढावा.
 
 
साधारण आणीबाणीनंतरचा तो काळ. आताच्या प्रमाणेच त्यावेळीही अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम जोमाने सुरू होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना निरोप देऊनही ते कार्यक्रमाला आले नाहीत, म्हणून अभाविपच्या कार्यकर्तीने सरांना तक्रार केली. सर डोळे मिटून सगळे ऐकत होते. गीता निराशा, हतबलता, कंटाळा वगैरे वगैरे सगळ्या भावना व्यक्त करत होत्या. यावर सर म्हणाले, “गीताबाई, तुम्ही केवळ तुमच्या कार्यक्रमाचा निरोप द्यायला गेलात म्हणून समोरच्या व्यक्तीने त्या कार्यक्रमाला आले पाहिजे का? काय केले म्हणजे ती व्यक्ती तुमच्या सांगण्यानुसार कार्यक्रमाला येईल गीताबाई.”
 
 
यावर गीता म्हणाल्या, “मी, फक्त कार्यक्रमाचा निरोप सांगायलाच जाते. जर मी इतर वेळीही त्यांच्याशी संपर्क ठेवला, संवाद साधला तर त्यातून अभाविपच्या कार्यक्रमाची माहिती आणि महत्त्व सांगितले, तर ती व्यक्ती अभाविपच्या कार्यक्रमाचा निरोप सांगितल्यावर येईल नक्कीच.” यावर सर म्हणाले, “म्हणजे गीताबाई, तुम्हाला माहिती आहे की, संपर्क, संवाद आणि समोरच्याच्या सुख-दुःखाशी समरस होणे गरजेचे आहे. त्यातूनच संघटन होऊ शकते. तुम्हाला याचे उत्तर माहिती आहे.” तर ही विद्यार्थिनी गीता म्हणजे, आताच्या डॉ. गीता किशोर मोघे. तर सर म्हणजे, अभाविपचे सर्वार्थाने पालकच असलेले यशवंतराव केळकर सर.
 
यशंतवराव केळकर, डॉ. अशोकराव मोडक, बाळ आपटे यांसारख्या विद्वान, संघटन कुशल समाजशील व्यक्ती गुरुजी म्हणून लाभलेल्या गीता पराडकर आताच्या गीता मोघे. गीता या सध्या मुंबईतील भांडूपच्या मेनन महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘मार्केटिंग मॅनेजमेंट’ विषयावर ‘पीएच.डी’ केली आहे. या विषयाच्या त्या ‘रिसर्च गाईड’ म्हणूनही कार्यरत आहेत. आजपर्यंत अक्षरशः लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी शिकविले. मुंबई विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत.
 
याचबरोबर त्या ‘सेवा सहयोग’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबई, ठाणे, बोईसर वगैरे भागात सुरू असलेल्या 80 अभ्यासिकांसाठीही त्या कार्यरत आहेत. या अभ्यासिकांमध्ये दररोज अडीच ते तीन हजार विद्यार्थी दाखल होतात. या अभ्यासिका सेवावस्ती किंवा जिथे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचण आहे, अशाच परिसरात सुरू आहेत. या अभ्यासिका म्हणजे, काही खासगी शिकवणी नाही, तर मुलांचा शैक्षणिक आणि इतर सर्वांगीण विकास होण्यासाठी इथे प्रयत्न केले जातात. मुलांना इथे येऊन शिक्षणाची गोडी लागावी, त्यांच्यात आयुष्याबाबत सकारात्मकता निर्माण व्हावी, स्वतःचे भवितव्य घडविण्यासाठी प्रेरणा आणि आंतरिक बळ मिळावे म्हणून या अभ्यासिकांमध्ये विशेष कार्यक्रम राबविले जातात. गेल्या काही वर्षांत सेवावस्तीमधील या अभ्यासिकेत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र सकारात्मक बदल झालेला आहे. या अभ्यासिकेची जबाबदारी गीता यांच्यावरच आहे.
 
गीता जेव्हा महाविद्यालयात होत्या, त्यावेळी दर बुधवारी किंवा मंगळवारी अभाविपची बैठक व्हायची, त्यावेळी यशवंतराव केळकर किंवा डॉ. अशोकराव मोडक त्या बैठकीला उपस्थित असायचे. त्यांची विद्वता किंवा सामाजिक जीवनातले महत्त्वाचे कार्य वगैरे वगैरे काहीही मध्ये न आणता, ते या सगळ्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या स्तरावर येऊन मार्गदर्शन करायचे. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचना ऐकून घेऊन त्यावर कार्यवाही करायचे. या सगळ्या घडामोडींचे संस्कार गीता यांच्यावर होत होते. त्या संस्कारची शिदोरी पुढे त्यांना आयुष्यात मोलाचे मार्गदर्शन देत राहिली.
 
गीता यांच्या आयुष्यपटाकडे पाहताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते. ती म्हणजे, आजपर्यंत त्यांनी जे काही केले, ते समाजातील विद्यार्थी योग्य नागरिक म्हणून घडावेत म्हणूनच; अर्थात यासाठी त्यांचे पती किशोर मोघे यांची त्यांना मोलाची साथ आहेच म्हणा. पण, तरीही पती कर्तृत्ववान आहे म्हणून त्याच्या सावलीत निवांत राहायचे, अशा विचारांच्या गीता कधीच नव्हत्या. गीता यांचे वडील रमाकांत पराडकर हे मूळचे मालवणचे, तर आई जयश्री गोव्याची.
 
पराडकर दाम्पत्याच्या मात्र गेल्या काही पिढ्या या मुंबईत ग्रँट रोडला स्थायिक झालेल्या. रमाकांत यांचे दादरला चष्म्याचे दुकान. रमाकांत हे संघ स्वयंसेवक. पाच वर्षे ते प्रचारकही राहिलेले. संघ स्वयंसेवक आणि प्रचारकांचे हक्काचे घर म्हणजे पराडकरांचे घर. त्या काळी नाना पालकर कित्येकदा पराडकरांच्या घरी यायचे. कित्येक प्रचारक स्वयंसेवक रमाकांत यांना भेटायला यायचे. त्यांच्या बोलण्यातून समाजहित आणि देशनिष्ठा यांची आपसूकच ओळख गीता यांना झाली. गीता सांगतात की, परमपूज्य गोळवलकर गुरुजींचे चष्मे त्यांच्याच दुकानातले असायचे.
 
असो, गीता यांना डॉक्टर व्हायचे होते. पण, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा लागला. पुढे त्यांना अभाविप प्रचारक म्हणून जायचे होते. पण, घरच्या परिस्थितीमुळे आणि त्यातही बँकेत नोकरी लागल्यामुळे प्रचारक म्हणून जाता आले नाही. त्यावेळी त्या खूप हिरमुसल्या. त्याचवेळी त्यांनी ठरवले की, प्रचारक म्हणून समाजाची सेवा करता आली नाही, तरी पुढेमागे प्रत्येक क्षणी समाजाच्या हिताचेच कार्य करायचे.
 
 
त्यातूनच मग विवाह झाल्यावर त्यांनी बँकेतली नोकरी सोडली. पुढे प्राध्यापिका म्हणून त्या महाविद्यालयात रुजू झाल्या. ऐंशीचे दशक असावे, तेव्हापासून ते आजतागायत त्या शिक्षणक्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. गीता म्हणतात, येणार्‍या कालावधीत पूर्णतः शैक्षणिक क्षेत्रात कार्य करायचे आहे. वस्तीपातळीवरील खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अमृत सहज मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कार्य करणार आहे. कारण, ‘देश हमे देता हैं सबकुछ, हम भी तो कुछ देना सिखे।’




@@AUTHORINFO_V1@@