संविधान सन्मान, संविधान जागृती

    01-Dec-2020   
Total Views | 271

Sanvidhan_1  H
 



 ‘संविधान खतरें मैं हैं...’ वगैरे वगैरे सांगून संविधानाचे महत्त्व कमी करणे आणि भोळ्या-भाबड्या समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचे काम काही देशविघातक शक्ती करत आहेत. त्यामुळे संविधानाचे मूळ कल्याणकारी स्वरूप वस्तीपातळीवर मांडणे गरजेचे होते. यासाठीच स्वयम् महिला मंडळाने विविध महिला मंडळ आणि फाऊंडेशनच्या सहकार्याने त्या त्या वस्तीमध्ये २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान आणि जागरण कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने आलेले अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
 
 
”अच्छा, म्हणजे संविधानामध्ये आमचा पण विचार केला आहे? आजपर्यंत तर वाटत होते की, संविधानामध्ये फक्त मागासवर्गीयांना आरक्षण दिलं आहे. होय की नाही गं?” तिने तिच्या मैत्रिणीला विचारले. तर मैत्रिणीचे उत्तर, “हो ! खरंच जेव्हा तुम्ही संविधान जागरणचा कार्यक्रम घेणार म्हटला तेव्हा आम्हाला वाटले की, तुम्ही आरक्षणाबद्दल बोलणार. बौद्ध धर्माबद्दलच बोलणार. पण संविधानामध्ये तर सगळ्याच धर्माचा जातीच्या लोकांच्या हक्काचा विचार केला आहे. अधिकार दिले आहेत. थँक्यू ताई.” मुलींच्या बोलण्यातून युवा पिढी संविधानाबद्दल काय विचार करते आणि त्यांना आजपर्यंत संविधानाबद्दल काय सांगितले गेले, याची थोडी झलक मिळाली.
 
 
 
 
दि. २५ नोव्हेंबर, रात्रीचे १० वाजले होते. टागोरनगर ग्रुप क्र. ६ मध्ये ‘प्रणिती महिला मंडळा’सोबत संविधानपूजन आणि जागरण कार्यक्रम सुरू होता. सोसायटीतील महिला, बालक आणि युवती जमल्या होत्या. त्यांच्यासमोर ‘प्रणिती महिला मंडळा’च्या अध्यक्षा निकिता घायतडके यांनी उद्देशिकेचे वाचन केले. स्थानिक समाजसेवक मदनमोहन कुशवाहा, भाजप वॉर्ड अध्यक्ष देवेंद्र डोके यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर संविधानामधील भारतीय महिलांचे हक्क आणि अधिकार याबद्दल आम्ही चर्चा केली. त्यातून संविधानाने महिलांना दिलेला लिंगभेदापलीकडे जाऊन दिलेला जगण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, पैतृक संपत्तीमधला अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, मूल दत्तक घेण्याचा अधिकार आपल्या मनाप्रमाणे जगणं, जगण्याचा अधिकार यावर मुद्दे मांडले गेले. या सर्व चर्चेमध्ये सहभागी झाल्यानंतर तिथे उपस्थित युवतीने वरील उद्गार काढले होते की, “अच्छा म्हणजे संविधानामध्ये आमचा पण विचार केला आहे?”
 
 
 
 
वस्तीपातळीवर संविधान जागरणाचा कार्यक्रम घेतल्यानंतर समाजाचे विविध पदर उलगडले गेले होते. आजही २०१८ सालची गोष्ट आठवते. त्यावेळी संविधान जागरणाचा कार्यक्रम स्वयम् महिला मंडळाने घेतला होता. या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी एका सेवावस्तीमध्ये गेले होते. वस्तीमध्ये जे दृश्य असते तेच दृश्य. बहुतेक महिला विधवा, घरकाम किंवा तत्सम काम करून त्या घर चालवतात. इज्जतीने, अब्रूने आपल्या मुलाबाळांच्या मुखात घास भरवतात, तर मी अशाच एका महिलेच्या घरी गेले. तिला आमंत्रण दिले. तिने विचारले, “संविधान जागरण करणार आहात? पण कोणते संविधान पूजणार आहात? मोदी, आरएसएसने तर बाबासाहेबांचे संविधान काढून टाकले. आता देशात आरएसएसच्या साहेबाने आणि मोदीने लिहिलेले संविधान आहे. त्या संविधानाचे पूजन करणार असाल, तर आताच सांंग. मी येणार नाही.”
 
 
 
 
तिचे म्हणणे ऐकून मी आणि सोबतचे लोक अवाक झालो. तिला विचारले, तुला कोणी हे सांगितले? तिचे म्हणणे, “भीम आर्मीचे लोक आमचे क्लास घेतात. त्यामुळेच तर कळलं.” या वस्तीत आयाबायांना भेटायला कबिरांचे नाव घेणारे आणि मंच चालवणारेही येऊन गेले आहेत. तिचे म्हणणे ऐकून वाईट वाटत होते. गरीब आणि भोळ्या लोकांच्या वस्तीत खोटेनाटे सांगून, त्यांच्या मनात द्वेष कालवला जात होता, तेही संविधानाच्या नावाने. शेवटी दोन-अडीच तास चर्चा करून तिला पटवून दिले की, या देशात बाबासाहेबांचेच संविधान आहे आणि राहणार. त्यानंतर ती कार्यक्रमाला आली. संविधानाची प्रत डोळे भरून पाहिली.
 
 
 
 
खुदकन हसून म्हणाली, “हां, ना संविधान तेच आहे. मग ते लोक आम्हाला खोटं का सांगून गेले?” ही सत्यघटना सांगण्याचे कारण की, समाजविघातक शक्ती समाजातील भोळ्याभाबड्या गटाला आपलं लक्ष्य बनवत आहे. त्यांना सांगत आहेत की, संविधानामध्ये तुम्हाला आरक्षण आहे. त्यामुळेच तुम्ही जगू शकता, प्रगती करू शकता. आरक्षण हटवून, त्यांना संविधान बदलायचे आहे. हे समाजविघातक लोक संविधानाचे सर्वव्यापी कल्याणकारी स्वरूप, सर्वसमावेशकता समाजाला सांगत नाहीत. उलट संविधानामधल्या हक्क आणि कायद्यांचे विकृत अर्थ लावत समाजाला भडकवत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाचे महत्त्व समाजासमोर येणे गरजेचे आहे.
 
 
 
असो, पुढे रात्री ११.१५ वाजता संस्कृती बेरोजगार सेवा संस्थेसोबत संविधान पूजन आणि जागरण कार्यक्रम घेतला. हरियाली व्हिलेज इथली वस्ती. परिसर रोशणाईंने झगमगून निघाला होता. लाऊडस्पीकरवर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणारी गाणी लावली होती. १५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुण उत्साहाने उभे. समोरच्या टेबलावर संविधानाची प्रत बाबासाहेबांची प्रतिमा, हार-फुले, मेणबत्ती. इथे एक दृश्य पाहिले की, एक तरुण सहा-सात वर्षाच्या मुलाला घेऊन आला. भक्तिभावाने त्याने संविधान पूजन केले. मुलाला म्हणाला, “अरे पूजा कर. हे आपले देव आहे.” मुलगा म्हणाला, “बाबासाहेब देव आहेत पप्पा. पण या पुस्तकाची पूजा करायची?” त्यावर तो तरुण म्हणाला, “या संविधानामुळे आपण सुखाने जगतो. जो जगायला शिकवतो, संरक्षण करतो, काळजी घेतो. प्रत्येक वाटेवर आपल्याला हक्क देतो तो देवच असतो.
 
 
 
 
बाबासाहेब आणि संविधानाने आपल्याला हे सगळे दिले, म्हणून त्यांची पूजा करायची.” आजूबाजूच्या आयाबाया आपल्या मुलांना घेऊन येत होत्या. नमस्कार करत होत्या. या मंडळाचे अध्यक्ष संदीप खरात हा युवक आणि त्यांच्या सोबतच्या सर्वच युवकांच्या चेहर्‍यावरची श्रद्धा होती. या भोळ्या आणि सश्रद्ध समाजाला अश्रद्ध बनवणारे आपण कोण? विद्वता आणि बुद्घिमत्ता कितीही मोठी असली तरी माणसाच्या नि:स्वार्थी भावापुढे त्यांची महती नाहीच. इथेही संविधान उद्देशिकेचे वाचन झाले. संविधान स्वत:च इतके शक्तिशाली आहे की, कुणीही पूर्णत: संविधान एकाच झटक्यात बदलू शकत नाही. तसेच संविधान कधीही ‘खतरे मैं’ नसते तर संविधानाच्या नावावर राजकारण करणारे लोक तरुणांचा वापर करतात.
 
 
 
 
स्वत: नेते होतात आणि समाजाची पोरं तुरूंगात जातात. या विषयांवर चर्चा झाली. ‘संविधान खतरे मैं हैं’ असे सांगून आंदोलने, मोर्चे काढले गेले. तेव्हा या वस्तीतल्या तरुणांचीही माथी भडकवण्याचे काम झालेच होते. या चर्चेनंतर वस्तीतील एक ज्येष्ठ आले आणि म्हणू लागले, “बघा, मी सांगायचो की बाबासाहेबांचे संविधान लेचेपेचे नाही. ते का कुणी बदलेल ? आता तरी कळलं ना!” असे म्हणून ते धम्मवंदना गाऊ लागले. त्यांच्यासोबत मग सारेच ‘बुद्धं शरणं गच्छामि’ म्हणू लागले. हे सगळे तरुण सुशिक्षित आणि परिसरामध्ये चांगला वचक असलेले. बाबासाहेबांच्या नावाखातर जीवही देणारे असे. या तरूणाईची निष्ठा, श्रद्धा, देश आणि समाजाची ताकद बनायलाच हवी.
 
 
 
 
दुसर्‍या दिवशी २६ नोव्हेंबर रोजी अण्णा भाऊ साठे मानखुर्द येथे ‘दिव्यज्योती फाऊंडेशन’ येथे संविधानपूजन आणि जागरण कार्यक्रम होता. फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती साठे या ‘टिस’च्या विद्यार्थिनी. ही वस्ती ज्योती यांच्या आजोबांनी, काकांनी वसवलेली. इथे ‘जय लहुजी’नेच दिवस उगवतो आणि ‘जय लहुजी’नेच दिवस मावळतो. वस्तीतील मातंग ऋषी मंदिरामध्ये संविधान कार्यक्रम होता. वय वर्षे ९ ते १५ पर्यंतची ६० मुले यात सहभागी झाले. घाटकोपर विभागाचे रा.स्व.संघाचे प्रचारक रवी नलोडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी गोष्टीरूपी संविधान मांडले. या बालकांसमोर विषय मांडला. सगळे ऐकून बालिकांमध्ये कुजबूज सुरू झाली. काय झाले, विचारल्यावर त्यातील एक धीटपणे म्हणाली, “बाबासाहेब माहिती होते, पण संविधानामध्ये काय आहे माहिती नव्हते. जर कायद्याने आम्हाला शिकण्याचा अधिकार दिला नसता तर आम्हाला कुणी शाळेत पाठवले असते? लग्नाचं वय १८ वर्षं असा कायदा आहे म्हणून... नाहीतर आमची आतापर्यंत लग्नपण झाली असती. संविधानाच्या कायद्यामुळे आम्ही वाचलो. ” या बालिकांचे म्हणणे ऐकून आम्ही उपस्थित स्तब्ध झालो.
 
 
 
 
पुढे दुपारी नसिबुल्लाह रेहमतउल्लाह ट्रस्ट पार्कसाईट येथे संविधान सन्मान आणि जागरण कार्यक्रम आयोजित केला होता. मुस्लीम समाजासाठी काम करणार्‍या आसिफ कुरेशी या युवकाने हा कार्यक्रम आयोजित करण्यास मदत केली. या कार्यक्रमामध्ये मुस्लीम समाजातील समाजसेवक, शिक्षक उपस्थित होते. हा गट संविधानाबाबत काय विचार करतो, हे ऐकणे आणि समजून घेणे गरजेचे होते. इथेही संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन झाले. नियाज शेख यांनी प्रास्ताविक आणि मोहम्मद उमर शेख यांनी संविधानाबाबत विचार मांडले. मी इतर देशातील मुस्लीम आणि आपल्या देशातील मुस्लीम यांचे संविधानाने दिलेले हक्क यावर विचार मांडले.
 
 
 
 
प्रत्येकाला संविधानावर आपले मत मांडायला लावले. या सगळ्यांच्या म्हणण्याचा सारांश होता की, आम्ही अल्पसंख्याक असूनही आज इथल्या बहुसंख्याक समाजाच्या बरोबरीने जगत आहोत. सगळे हक्क, सुविधा उपभोगत आहोत, याचे श्रेय संविधानाला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये समता-स्वातंत्र्य-बंधुता आणि धर्मविषयक केलेले कायदे कानूनला आहे. संविधान नसते तर आमचे जगणे खूप वेगळे असते. जगभरात बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यात नेहमी दरी असते. पण संविधानामुळे आम्हाला धार्मिक आणि सगळ्याच बाबातीतले स्वातंत्र्य मिळत आहे. संविधान के वजहसें हम सेफ हैं। थोडक्यात मुस्लीम समाजातील या सुशिक्षित गटाने संविधानाचे महत्त्व जाणून घेतले होते.
 
 
 
 
रात्री विश्वशांती बुद्धविहार ट्रस्ट, मालवणी मालाड येथे संविधान जागरण कार्यक्रम होता. संविधानाने समाजाला काय दिले? याचे दृश्य स्वरूप म्हणजे इथे उपस्थित जनता होती. ट्रस्टचे अध्यक्ष संतोष गरूड, सचिव मनोज जगताप आणि सहकार्‍यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्कृष्ट केेले होते. उपस्थित लोक अतिशय सुस्थितीतील. कमालीचे शिस्तप्रिय. बुद्धविहार ऐसपैस आणि स्वच्छ. त्यांच्यासमोर ‘संविधानाचे महत्त्व’ या विषयावर बोलले. पण,खरे तर माझे बोलणे उगीच औपचारिकता होती. मुळात इथल्या जनतेने संविधानाचे महत्त्व जाणले होते. शिकून सवरून,संघटित होऊन ते सुसंपन्न आणि सुस्थिर आयुष्य जगत होते. देश आणि समाजावरच डॉ. बाबासाहेबांची निष्ठा त्यांच्यातही जाणवत होती. संविधानाने आम्हाला काय दिले? गतीने का होईना पण समाजाला माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले, असे इथला उपस्थित समाजगट सांगत होता.



खरेतर समाजातील विविध गटांपर्यंत पोहोचून हा विषय मांडणे सोपे नव्हते. कारण, आधीच तिथे संविधानाचा गैरअर्थ सांगणारे बसलेले आहेतच. पण या सगळ्यांना पुरून उरत समाजापर्यंत हा विषय घेऊन पोहोचायला मला अनेकांनी स्वत:हून सहकार्य केले. विशेषत: सर्व कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये  विशेष सहकार्य केले ते, सुरेश गंगादयाल यादव यांनी. या सर्वांचे धन्यवाद.


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121