२२/११/६३ आणि हादरलेली अमेरिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

221166 in usa _1 &nb
 
 
 
 
रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक राष्ट्राध्यक्षांना अभिवादन करीत होते. राष्ट्राध्यक्ष हसून हात हलवून त्या अभिवादनाचा स्वीकारत करीत होते. अब्राहमचा कॅमेरा चालू होता. कॅमेर्‍याच्या व्ह्यू फाईंडरमधून तो हे सर्व पाहत होता.
 
 
अब्राहम झाप्रूडर. एक छोटा व्यावसायिक. लहान मुलांचे आणि महिलांचे कपडे तयार करण्याचा त्याचा छोटासा व्यवसाय. ठिकाण डलास किंवा अमेरिकन बोलीभाषेत डॅलस. अमेरिकेच्या दक्षिणेकडचं एक मोठं आणि महत्त्वाचं राज्य टेक्सस, त्यातलं एक मोठं शहर.
 
 
दि. २२ नोव्हेंबर, १९६३ या दिवशी या डलास शहरात एक भीषण रक्तरंजित नाट्य घडलं, ज्यामुळे फक्त डलास शहर आणि टेक्सस राज्यच नव्हे, तर संपूर्ण अमेरिका हादरली. संपूर्ण जग विस्मयचकित झालं, हे नाट्य अवघ्या २६ सेकंदांमध्ये घडलं. अब्राहम झापू्रडर हा छोटा व्यापारी अकस्मात त्यांच्या किंवा अन्य कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, त्या भीषण नाट्याचा साक्षीदार आणि छायचित्रकार ठरला. ते नाट्य होतं राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्या खुनाचं.
 
 
जानेवारी १९३० मध्ये जॉन फित्झगेराल्ड केनेडी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले, मुळात ते लोकप्रिय होतेच. त्यातच त्यांच्या विविध राजकीय धोरणांनी त्यांची लोकप्रियता सतत वाढतच गेली. ऑक्टोबर १९६२ मध्ये अमेरिकेच्या दक्षिणेला कॅरेबियन समुद्रात असलेल्या क्युबा या देशात पेचप्रसंग निर्माण झाला. क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो या साम्यवादी हुकूमशहाची राजवट होती. सोव्हिएत रशियाने क्युबाच्या भूमीवर आण्विक क्षेपणास्त्र बसवण्याचा घाट घातला.
 
 
वातावरण एकदम गरम झालं रशिया आणि अमेरिका यांच्यात युद्ध जुंपणार म्हणजेच तिसरं जागतिक महायुद्ध जुंपणार, असा रंग दिसू लागला. दुसरं महायुद्ध १९४५ साली संपलं. त्याला अजून पूर्ण २० वर्षेदेखील झाली नव्हती. त्यामुळे युद्ध कुणालाच नको होतं. हा पेचप्रसंग जॉन केनेडींनी फार कुशलतेने हाताळला आणि युद्ध टाळलं. त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढली.
 
 
अगदी त्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर १९६२ मध्ये चीनने भारतावर आकस्मिकपणे आक्रमण केलं. भारताच्या स्वप्नाळू नेत्यांची पार फेंऽफेंऽ उडाली. ज्या सोव्हिएत रशियाला भारताने मित्र म्हणून झोंबाळून ठेवला होता, तो काही मदतीला आला नाही आणि ज्या अमेरिकेची भारतीय नेत्यांनी कायम भांडवलदार देश म्हणून हेटाळणी केली होती, ती अमेरिका म्हणजे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी भारताच्या मदतीला धावून आले.
 
 
अन्नधान्यापासून शस्त्रास्त्रापर्यंत अनेक प्रकारच्या मालाचा पुरवठा अमेरिकेने भारताला केला. यामुळे भारतातही जॉन केनेडी फार लोकप्रिय झाले. मला आठवतंय की, पूर्वी आपल्याकडे लोकांच्या घरात, भिंतीवर देवादिकांच्या तसबिरींसोबत मध्ये गांधीजी एका बाजूला नेहरू आणि एका बाजूला पटेल, असं चित्र अगदी हमखास असायचंच. आता त्यात केनेडी आणि नेहरु एकमेकांशी सुहास्य मुद्रेने बोलतायत, या नव्या चित्राची भर पडली.
 
 
याचा अर्थ केनेडी आणि अमेरिका हे साधु-संत होते, असा कुणी काढू नये, अमेरिका कधीही कुणालाही फुकट मदत करीत नाही, या मदतीचा हेतू हा होता की, भारताचा पूर्ण पराभव होऊ नये आणि त्यामुळे चीन वाजवीपेक्षा जास्त बलवान होता नये, कोंबडी झुंजत राहिली पाहिजेत, कोणतंही कोंबडं पूर्ण मरता नये. पण असो, उद्देश काहीही असला तरी त्या संकटकाळी अमेरिका धावून आली आणि तीसुद्धा अशा स्थितीत की, कदाचित तिला स्वत:लाच युद्धाचा सामना करावा लागेल.
 
 
अशा सर्व कारणांनी राष्ट्राध्यक्ष केनेडींची लोकप्रियता इतकी कळसाला जाऊन पोहोचली की, ते आपल्या हयातीतच चालती-बोलती दंतकथा बनले. अमेरिकन राष्ट्राच्या इतिहासात तोपर्यंत तीन राष्ट्राध्यक्ष हे ‘ऑल टाईम ग्रेट’ मानले गेले होते. जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन आणि फर्डिनंड रुझवेल्ट हे ते तीन राष्ट्राध्यक्ष होत. जॉन केनेडी आपल्या हयातीतच त्यांच्या मालिकेत जाऊन बसले. आजही (सन २०२०) या चौघांइतकी लोकप्रियता त्यांच्यानंतरचा कुणीही राष्ट्राध्यक्ष मिळवू शकलेला नाही.
 
 
अशा घालमेलींमध्ये आणखी एक वर्ष बघता-बघता सरलं. १९६३चा नोव्हेंबर उजाडला म्हणजेच केनेडींच्या १९६० ते १९६४ या कार्यकाळातलं फक्त एक वर्ष बाकी राहिलं. १९६४च्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक. हा हिशेब ध्यानी घेऊन केनेडी दौर्‍यावर निघाले. टेक्सस प्रांतात डलासला पोहोचले. आपल्या शासन व्यवस्थेत प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचं जे स्थान असतं, ते अमेरिकन राज्यपद्धतीत प्रांताच्या राज्यपालांचं असतं. त्यामुळे डलास विमानतळावर राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी जॅकेलिन यांचं स्वागत करायला टेक्सस प्रांताचे राज्यपाल जॉन कॉनली आणि त्यांच्या पत्नी नेली कॉनली हजर होते.
 
 
आपल्या पुढील वर्षीच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा प्रारंभ टेक्सस प्रांतापासून करण्यात केनेडींचे काही हेतू होते. टेक्ससमधल्या त्यांच्या डेमोक्रेटिक पक्षातल्या लोकांमध्ये काही गंभीर मतभेद होते. ते दूर करायला हवे होते. कारण, गेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला टेक्ससमध्ये (टेक्सासमध्ये) जेमतेम बहुमत मिळालं होतं आणि खुद्द डलास मतदारसंघात तर त्यांचा पराभवच झाला होता. दि. २२ नोव्हेंबर, १९६३ या दिवशी सकाळी ठीक ११.३० वाजता जॉन आणि जॅकेलिन हे केनेडी दाम्पत्य, उपराष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि त्यांच्या पत्नी क्लॉडिया यांच्यासह डलास विमानतळावर उतरलं. विमानतळापासून साधारण १६ किमी अंतरावर डलास ट्रेड मार्ट या ठिकाणी जायला राष्ट्राध्यक्षांच्या मोटारींचा ताफा निघाला.
 
या मार्गात ठिकठिकाणी डलासचे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गोळा होतील आणि राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करतील हे उघडच होतं. त्यामुळे गाड्या सावकाश चालवण्याच्या सूचना होत्या. डिली प्लाझा नावाच्या एका चौकाजवळच अब्राहम झाप्रूडरचं कार्यालय होतं. थोड्या अंतरावर घरही होतं. अब्राहम हौशी छायाचित्रकार होता. राष्ट्राध्यक्षांच्या मोटार ताफा डिली प्लाझामधूनच पुढे जाणार होता. अब्राहमची महिला चिटणीस त्याला म्हणाली, “तू फिल्मच का घेत नाहीस?”
 
 
अब्राहमला ही कल्पना एकदम पसंत पडली. तो अक्षरशः धावत घरी आला ‘बेल अ‍ॅण्ड हॉवेल’ कंपनीचा आठ मिमीचा मूव्ही कॅमेरा त्याने घाईघाईने लोड केला आणि तो घेऊन तो पुन्हा आपल्या कार्यालयात आला. मग तो आणि त्याची महिला चिटणीस डिली प्लाझाच्या परिसरात कॅमेरा ठेवायला योग्य जागा शोधू लागले. डिली प्लाझाकडून पुढे टेक्सस ट्रेड मार्टकडे जाणारा तो रस्ता छोट्या छोट्या चढ-उताराचा होता. रस्त्याच्या एका उंचवट्यावर एका कडेला एक सुमारे साडेचार-पाच फूट उंचीचा सिमेंटचा चौथरा होता. अब्राहमला कॅमेरा बसवायला तो चौथरा अगदी आदर्श वाटला. कारण, स्वतः अब्राहम उंचीने खूपच ठेंगणा होता.
 
 
समोरच टेक्सास स्कूल बुक डिपॉझिटरीची इमारत होती. तिच्यावर एक इलेक्ट्रिक घड्याळ होतं. त्या घड्याळ्यात ठीक १२.२९ झाले आणि राष्ट्राध्यक्षांचा मोटार ताफा अवतीर्ण झाला. सर्वात पुढे एक पांढरी फोर्ड गाडी होती. तिच्या पाठोपाठ एक लांबलचक लिंकन कॉन्टिनेंटल गाडी होती. तिचा टप उघडा होता. तिला तीन खाने होते. पुढच्या खान्यात ड्रायव्हर आणि एक इसम होता. ते दोघेही गुप्तचर खात्याचे लोक होते. मधल्या खान्यात टेक्सास प्रांत राज्यपाल जॉन कॉनली आणि त्यांच्या पत्नी नेली कॉनली बसलेले होते. तिसर्‍या खान्यात राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी आणि त्यांच्या पत्नी जॅकेनिल उभे होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक राष्ट्राध्यक्षांना अभिवादन करीत होते. राष्ट्राध्यक्ष हसून हात हलवून त्या अभिवादनाचा स्वीकारत करीत होते.
 
 
अब्राहमचा कॅमेरा चालू होता. कॅमेर्‍याच्या व्ह्यू फाईंडरमधून तो हे सर्व पाहत होता. अब्राहम सांगतो, “मी उभा होतो. त्या उंचवट्याकडेच मोटारींचा ताफा संथपणे सरकत होता आणि अचानक एका गोळीचा आवाज दणाणला. राष्ट्राध्यक्ष आपल्या मानेवर हात धरून जॅकेलिनच्या दिशेला झुकले. तेवढ्यात दुसरी गोळी दणाणली आणि तिने राष्ट्राध्यक्षांचं डोकं एखाद्या स्फोटाने फुटावं तसं फुटलं. माझा कॅमेरा चालूच होता.” अवघ्या २६ सेकंदात अब्राहम झाप्रूडरनं विसाव्या शतकातलं सगळ्यात मोठं गुन्हेगारी कृत्य आपल्या कॅमेर्‍यात पकडलं होतं, हे काम जणू विधात्यानेच त्याच्यावर सोपवलं होतं. कारण, मेरी मचमोर आणि ऑर्व्हिल निक्स हे दोन त्याच्याचसारखे हौशी छायाचित्रकारदेखील या घटनेचं चित्रण करीत होते, पण अब्राहमला जो अँगल मिळाला, तो त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या फिल्मसचा पुढच्या संशोधनात फारसा उपयोग झाला नाही.
 
 
आज या घटनेला ५७ वर्षं पूर्ण होत आहेत. पण, अमेरिकन जनमानसातलं त्यांच्याबद्दलचं कुतूहल जराही कमी झालेलं नाही. असंख्य चौकशी समित्या आणि त्यांचे असंख्य अहवाल यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकलेला नाही. म्हणजे या खुनामागे कोणतंही व्यापक कारस्थान नसून ली हार्वे ओस्वाल्ड या माजी नौदल सैनिकाने आपल्या स्वतःच्या मनाने हा खून केला, हा निष्कर्ष कुणाही सुबुद्ध अमेरिकन नागरिकाला पटलेला नाही. ली हार्वे ओस्वाल्डला गुप्तचर खात्याचे लोक एका तुरूंगातून दुसर्‍या मोठ्या तुरूंगाकडे नेत असताना जॅक रूबी नावाच्या नाईट क्लब मालकाने अगदी जवळून गोळी झाडून त्याला मारलं आणि पुढे जॅक रूबी स्वतःही पोलीस कोठडीत मरण पावला. ‘न रहेगा बांस न बजेगी बांसुरी.’
 
 
अशा रीतीने अमेरिकेचं ‘कॅमेलॉट’ युग संपलं. पश्चिमेत राजा आर्थर आणि त्याच्या राजधानीचा किल्ला ‘कॅमेलॉट’ म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू अशी दंतकथा आहे. जॉन केनेडींच्या काळातलं व्हाईट हाऊस म्हणजे आधुनिक काळातलं कॅमेलॉट होता, असं राष्ट्राध्यक्ष पत्नी जॅकेलिन यांचं मत होतं अणि ते अख्या अमेरिकेला मान्य होतं.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@