शास्त्रीय संगीतातील ‘टॉप’ गायिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020   
Total Views |

mansaa_1  H x W


भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच विविध संगीत प्रकारात मुशाफिरी करून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍या गायिका शुभा मुद्गल यांच्याविषयी...


मान्सून दाखल झाल्यावर रेडिओ किंवा टीव्हीवर हमखास वाजवले जाणारे एक गाणे म्हणजे ‘अब के सावन ऐसे बरसे...’ या गाण्यातील पहाडी आवाज आहे, शुभा मुद्गल यांचा. ‘ख्याल’, ‘ठुमरी’, ‘दादरा’ आणि ‘भारतीय पॉप’ अशा शैलींच्या गायकीसाठी त्या ओळखळ्या जातात. पॉप संगीताच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीताला लोकमनात उतरविण्याचे काम त्यांनी मोठ्या खुबीने केले. भारत सरकारने स्थापन केलेल्या केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळाच्या त्या सदस्य राहिल्या असून, शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कला शिक्षणाच्या समावेशामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


शुभा यांचा जन्म दि. १ जानेवारी, १९५९ साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांचे पालक स्कंद आणि जया गुप्ता हे दोघेही अलाहाबाद विद्यापीठात इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. या दोघांनाही ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ आणि ‘कथ्थक’ नृत्याची आवड होती. त्यामुळे शुभा यांनी एखाद्या कलेचे शिक्षण घ्यावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यादृष्टीने त्यांनी शुभा यांना पाठिंबाही दिला. आपल्या बहिणीबरोबर शुभा यांनी ‘कथ्थक’ नृत्य शिक्षणास सुरुवात केली. मात्र, नृत्यामध्ये त्यांचे मन काही रमत नव्हते. एकदा नृत्याची परीक्षा घेण्यासाठी आलेल्या परीक्षकाने त्यांना विचारले, “तुम्ही ‘कथ्थक’ची कोणत्या घराण्याची नृत्यशैली जाणता?” यावर शुभा यांनी, “मी, माझ्याच घराण्याचे ‘कथ्थक’ नृत्य नाचते,” असे उत्तर दिले. ‘कथ्थक’मध्ये मन न रमल्याने त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली. अलाहाबादमधील पं. रामाश्रय झा हे त्यांचे पहिले संगीत गुरू.


आंतरमहाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर शुभा यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्ली गाठली. दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. दिल्लीत त्यांनी विनयचंद्र मौदगल्या यांच्याकडे संगीत शिक्षणास सुरुवात केली. मौदगल्याच्या निवासस्थानी गंधर्व महाविद्यालयात त्यांचे संगीत शिक्षण सुरू झाले. दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त झाल्यानंतर शुभा यांनी आपले प्रशिक्षण वसंत ठाकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत सुरू केले. त्यानंतर प्रख्यात गायक आणि संगीतकार जितेंद्र अभिषेकी आणि पंडित कुमार गंधर्व यांच्याकडून संगीतामधील बारकाव्यांचे प्रशिक्षण घेतले. सोबतच ‘ठुमरी’ गायकीचे शिक्षण नैना देवी यांच्याकडून मिळवले. १९८० सालच्या सुमारास शुभा यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका म्हणून सादरीकरण करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांनी ‘प्रतिभावान गायिका’ म्हणून ओळख मिळवली. १९९० सालच्या सुमारास त्यांनी आपला मोर्चा ‘पॉप’ आणि ‘फ्यूजन’ संगीत प्रकारांकडे वळवला. त्यामध्ये नानाविध प्रयोग केले. त्याकाळात ‘पॉप’ संगीत प्रकाराला लोकांची बरीच पसंती मिळत होती. ते लक्षात घेऊन त्यांनी शास्त्रीय पारंपरिक बंदिशी ‘पॉप’ संगीत प्रकारात मोठ्या सफाईने गायल्या. त्या लोकांच्या मनाला अगदी भिडल्या. त्या म्हणतात, “मला संगीतावर विश्वास आहे. ‘ख्याल’ आणि ‘ठुमरी’ हे प्रकार माझे आवडते. परंतु, याचा अर्थ असा नाही की, मी इतर प्रयोग करू नये. मी माझ्या संगीताच्या इच्छेला का कमी करावे?” याच दशकात त्यांनी केलेल्या अल्बमना बरीच प्रसिद्धी मिळाली. ‘अली मोरे अंगना’, ‘क्लासिकल युअर’, ‘प्यार के गीत’, ‘मन की मांजरी’, ‘किसन की चादर’, ‘शुभ दीपावली’, ‘आनंद मंगल’, ‘प्रबोधन’, ‘जहा-एं-खुसरौ’ या अल्बमबरोबरच ‘अब के सावन’ या अल्बममधील ‘अब के सावन ऐसे बरसे...’ या गाण्यामुळे त्या बर्‍याच प्रकाशझोतात आल्या. १९९७ ते २००९ सालच्या दरम्यान शुभा यांनी तामिळ चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केले. रेकॉर्डिंग आणि मैफिलीव्यतिरिक्त भारतीय शास्त्रीय संगीतावरील प्रेमाच्या उद्देशाने त्यांनी ‘रागसंगीत’ नावाचे संकेतस्थळही चालवले.


भारतातील संगीतविषयक शिक्षणाशी संबंधित असलेल्या अनेक प्रकल्पांमध्येही शुभा यांनी सहभाग नोंदवला आहे. भारत सरकारने स्थापन केलेल्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या त्या सदस्या होत्या. त्यांनी ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क २००५’ मुख्य प्रवाहातील शालेय शिक्षणात कला शिक्षण कार्यक्रम सुरू करण्याच्या गरजांवर चर्चा करणार्‍या गटाचे अध्यक्षपदही भूषविले होते. गोवा विद्यापीठात पारंपरिक संगीत विभागात त्यांनी संशोधन प्राध्यापिका म्हणूनही काम केले. शुभा यांनी डॉ. अनीश प्रधान यांच्यासमवेत भारतीय संगीतामधील विविध प्रकारातील तज्ज्ञ असलेल्या संगीतकारांसाठी एक ऑनलाईन वितरण मंच स्थापित केला आहे. त्याचे नाव ‘अंडर स्कॉर रेकॉर्ड’ असे आहे. भारताच्या समृद्ध संगीताचा वारसा जपण्याच्या प्रयत्नात त्यांनी सुरू केलेल्या बर्‍याच प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘संगीतकोष’ हा ऑनलाईन भारतीय संगीत विश्वकोष. गायिकीबरोबच शुभा यांनी संगीतकार म्हणूनही मान्यता मिळविली. सन २०००मध्ये त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३४ व्या शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना ‘गोल्ड प्लेक पुरस्कार’ मिळाला आहे, तर १९९८ साली उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना ‘यश भारती’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@