अभ्यासू पर्यावरणवादी हरपला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2020   
Total Views |

Ulhas Rane_1  H
 
 
पर्यावरणवाद्यांच्या पोकळ प्रतिमेला छेद देऊन सुसंवादी आणि ‘अभ्यासू पर्यावरणवादी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या उल्हास राणे यांच्याविषयी...
 
 
विकास प्रकल्पांना सातत्याने विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या प्रतिमेला छेद देणारा शांत, संयमी पर्यावरणवादी आपण गमवला. कोरोनाने त्यांच्यावरही घाव घातला. गेल्या पाच दशकांपासून पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असणारे उल्हास राणे मंगळवारी कोरोनामुळे निर्वतले. वास्तुविशारद असूनही जंगलात रमणारा हा माणूस. आपल्या वास्तुविशारदच्या व्यावसायिक अनुभवाचा त्यांनी खुबीने वापर पर्यावरण संवर्धनात केला. विकासप्रकल्प हे पर्यावरणस्नेही होऊ शकतात, हे त्यांनी आपल्या अनेक रचनांमधून पटवून दिले. पक्ष्यांची आवड म्हणून महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेची उभारणी केली. त्यांच्यामुळेच आज आपण नाशिकचे नांदूरमध्मेश्वर आणि पुण्यातील भीमाशंकर अभयारण्य पाहू शकतो.
 
 
 
राणे यांचा जन्म दि. ३० सप्टेंबर, १९४७ रोजी मुंबईत झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी सर जे. जे. महाविद्यालयामधून वास्तुविशारद शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९८० साली समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण त्यांनी घेतले. पर्यावरणाची आवड लक्षात आल्यानंतर दिल्ली विद्यापीठामधून पर्यावरण आणि परिस्थितीकी विज्ञानमध्ये पदव्युत्तर पदविका मिळवली. वास्तुविशारद असल्याने सिमेंटप्रमाणेच त्यांचे मन जंगलातल्या मातीतही रमत होते. ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या सान्निध्यात राहून त्यांना निसर्गाचे खास करुन पक्ष्यांचे वेड लागले. अलींच्या मार्गदर्शनामध्ये राणेंची पर्यावरणाची आवड बहरत गेली. ऐन ऐंशीच्या दशकात ज्यावेळी पर्यावरण चळवळी सुरू झाल्या होत्या, तेव्हा त्यांचा या क्षेत्रात प्रवेश झाला. अशावेळी आपली वास्तुविशारदाची व्यावसायिक बाजू सांभाळून त्यांनी आपला निसर्गाचा व्यासंग सुरू केला.
१९८७च्या देशव्यापी ‘पश्चिम घाट बचाव’ आंदोलन मोहिमेचे ते सहसमन्वयक होते. भीमाशंकरच्या जंगलास अभयारण्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी सर्व पातळ्यांवर संघर्ष केला. त्यासाठी चळवळ उभी केली. लोकसहभागाला केंद्रस्थानी ठेवून चळवळ पुढे नेणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. अभयारण्यासोबत येणाऱ्या बंधनांबाबत भीमाशंकर जंगलातील गावकर्‍यांच्या मनातील आकस त्यांनी प्रत्यक्ष संवादातून शांतपणे दूर केला. डॉ. अलींमुळे त्यांना लागलेले पक्षीनिरीक्षणाचे वेड काही शांत बसू देत नव्हते. म्हणूनच त्यांनी ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने’च्या उभारणीमध्ये सहभाग घेतला. ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना’चे ते दोन वेळा अध्यक्ष होते. १९७५ सालच्या दरम्यान त्यांनी गोदावरी नदी परिसरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण केले. त्यानंतर १९८० ते ८५ या कालावधीत गोदा-कादवा नदीच्या संगमावर वसलेल्या नांदूरमध्यमेश्वर पाणथळ जागेला भेट देणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांचा अभ्यास केला. त्यांच्या याच अभ्यासामुळे नांदूरमध्यमेश्वर पाणथळ जागेवर स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे वैविध्य जगासमोर उलगडले. त्यामुळेच आज ‘जागतिक रामसर स्थळा’चा दर्जा मिळालेले नाशिकचे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य निर्माण होऊ शकले.
देशातील अग्रगण्य अशा ‘सलीम अली पक्षीविज्ञान आणि प्राकृती केंद्र’ (सलीम अली सेंटर ऑफ ऑर्नोथोलॉजी अ‍ॅण्ड नॅचरल हिस्ट्री-सॅकॉन), कोईम्बतूर या संस्थेचे राणे हे संस्थापक सदस्य होते. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे मानद सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे (तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम) राणे काही काळ विश्वस्त होते. मराठी विज्ञान परिषदेतदेखील राणे कार्यरत होते. ‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेचे ते प्रणेते राहिले. केवळ चळवळ उभे करुन ते थांबले नाहीत, तर सह्याद्रीच्या दऱ्याखोर्‍यांमध्ये भटकून त्यांनी तेथील सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थितीचा शास्त्रीय अभ्यास केला. मुंबईच्या विविध पर्यावरणीय अधिवासांवर काम केलेले ते संशोधक होते. १९७६-७७च्या काळात बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर अभ्यास करण्याचे काम त्यांनी केले. १९७८ साली येथील प्रसिद्ध पोंगम व्हॅलीच्या जैवविविधतेच्या सर्वेक्षणाचे काम त्यांनी पूर्ण केले. १९८५ साली मिठी नदीमधील कांदळवनांवर प्रदूषणाचा होणारा परिणाम अभ्यासला आणि १९९० साली बोरिवली राष्ट्रीय उद्यानातील प्राणी-वृक्ष यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास केला.
महत्त्वाचे म्हणजे, राणे यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्याचा वापर पर्यावरण संवर्धनाच्या कामात केला. धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या जडणघडणीत १९८२ पासून त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. या उद्यानाच्या वास्तुरचनेचे काम त्यांनी पार पाडले. आजही ही वास्तू दिमाखात उभी आहे. याशिवाय आसाममधील देशातले पहिले फुलपाखरू उद्यानही त्यांनी उभारले. गेल्या पाच दशकांमध्ये त्यांनी असे कैक उपक्रम हाताळले. चटई क्षेत्र निर्देशांकाबरोबरच मोकळ्या जागा, निसर्ग संवेदनाक्षम परिसर यांचादेखील निर्देशांक असावा आणि दोहोंचा समतोल साधला गेल्यास विकास प्रकल्प हे पर्यावरणस्नेही नियोजन करतील, ही त्यांची भूमिका राहिली. मुंबई आणि बंगळुरु येथील ‘एन्व्हायरोडिझायनर्स’ या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील अनेक वारसा वास्तू, पर्यटनस्थळे यांच्या डिझाईनची कामे केली. ईशान्येकडील अनेक राज्यांच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी त्यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत योजना तयार केल्या. त्यांच्या निधनामुळे पर्यावरण क्षेत्राचे नुकसान झाले असून एक शांत, मृदूभाषी आणि सुसंवादी पर्यावरणीप्रेमी आपल्यातून हिरावला आहे.
@@AUTHORINFO_V1@@