मुंबई, हॉटेल, उपाहारगृह, स्ट्रीट फूड सेंटर असो वा पंचतारांकित रेस्टॉरंट, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र शिजवल्यास किंवा असे पदार्थ एकत्र ठेवल्यास आता थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शिवाय नियमोल्लंघन करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्यासह मोठा दंड देखील आकारला जाईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) दिला आहे.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार, जेवण बनवताना शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा संपर्क टाळणे बंधनकारक आहे. "हा विषय फक्त धार्मिक भावना दुखावणारा नाही, तर ग्राहकांच्या आरोग्याशी जोडलेला आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल. परवाना रद्द करण्यापासून ते आर्थिक दंड आणि न्यायालयीन प्रक्रिया यांचाही सामना करावा लागू शकतो," असे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
अन्न तयार करणाऱ्यांनी ग्राहकांच्या आरोग्याची जबाबदारी अंगावर घेतली पाहिजे. केवळ कायद्याच्या भीतीपोटी नव्हे, तर व्यावसायिक नैतिकतेच्या आधारावरच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्र हाताळले जावेत. एफडीए आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा एक लाख अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असून, मागील वर्षी ३० हजार व्यक्तींना हे प्रशिक्षण देण्यात आले होते, असे प्रशासकडून सांगण्यात आले.
तपासणीसाठी अधिकाऱ्यांची फौज
दि. ७ जूनपासून राज्यभरात १८९ नवीन अन्न सुरक्षा अधिकारी रुजू झाले असून, त्यामुळे स्थानिक पातळीवर तपासण्यांचे जाळे अधिक व्यापक होणार आहे. संशयास्पद आस्थापनांमध्ये अचानक तपासणी केली जाईल. नियम मोडल्याचे आढळल्यास थेट नोटीस, दंड आणि बंदीची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. केवळ प्रशासन नव्हे, तर ग्राहकही या मोहिमेचा भाग व्हावेत, अशी अपेक्षा एफडीएने व्यक्त केली आहे.
नियम काय?
• स्वयंपाकघरात शाकाहारी आणि मांसाहारी विभाग पूर्णतः वेगळे असावेत
• स्वयंपाकासाठी वापरणारी भांडी, उपकरणे आणि साहित्य देखील स्वतंत्र असावे
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.