सृष्टीनियमांचा अंगीकार करूया!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |
ACHARYA ARTICLE _1 &
 
 
 
असंख्य सत्यप्रिय संतजण व महापुरुषांनी प्रखर सत्यवादिता, प्रामाणिकपणे सेवा, परोपकार व राष्ट्रीय-सामाजिक कार्य यांद्वारे आपल्या कुळांच्या कीर्तीचा कळस उंचावला आहे. इतकेच नव्हे, तर यांसारख्या सत्यवादी सत्पुरुषांनी शाश्वत सत्यवाणी (ऋत) व सद्व्यवहाराने आपली इहलोकांची जीवनयात्रा यशस्वी करून परलोकाचाही (पुढील जन्मात) मार्ग सुकर केल्याचे निदर्शनास येते. असा हा सत्याचा प्रताप मानवी जीवनाचे सर्वांगीण कल्याण साधणारा आहे.
 
 
 
ऋतस्य जिह्वा पवते मधुप्रियं, वक्ता पतिर्धियो अस्या अदाभ्य:।
दधाति पुत्र पित्रोरपीच्यां नाम, तृतीयमधिरोचनं दिव:॥
(ऋग्वेद ९.७५.२, साम. ७०१)
 
 
अन्वयार्थ
(ऋतस्य) सृष्टीनियमांना अनुसरून शाश्वत सत्य बोलणार्‍या योगीजनांची, महापुरुषांची (जिह्वा) वाणी (प्रियं) प्रिय आणि (मधु) गोड शब्दांना (पवते) प्रवाहित करते. (अस्या धिय:) अशा या वाणीचे आणि व्यवहार बुद्धीचे (पति) पालन करणारा आणि (वक्ता) सत्य बोलणारा वक्ता या दोघांनाही (अदाभ्य:) कोणीही दाबू किंवा रोखू शकत नाही. त्यांचा (पुत्र:) सत्यवादी मुलगा (पित्रो) आपल्या आई-वडिलांच्या (अपीच्याम्) अज्ञात, गुप्त (नाम) कीर्ती व यशाला (दधाति) धारण करतो, प्रकाशित करतो. असा हा सत्यवादी पुत्र (तृतीयाम्) तिसर्‍या उत्कृष्ट अशा (दीव:) द्युलोकातदेखील (अधिरोचनम्) आपल्या माता-पित्याचे नाव उज्ज्वल करतो.
 
विवेचन
 
या जगात सत्यवादी व प्रामाणिकपणे जीवन जगणार्‍या सत्पुरुषांची ओळख कोणती? ते जगतात कसे आणि ते आपल्या आई-वडिलांकरिता व गुरुजनांकरिता कसे उपयुक्त ठरतात? यासंदर्भात वरील मंत्रात प्रकाश टाकला आहे. सामान्यत: ‘ऋत’ आणि ‘सत्य’ हे दोन शब्द एक दुसर्‍यांचे पर्यायीवाची मानले जातात. पण, आध्यात्मिकदृष्ट्या हे योग्य नाही. ‘ऋत’ व ‘सत्य’ या दोन्हीत फरक आहे. सत्य हे दोन प्रकारचे असते. पहिले म्हणजे सृष्टीनियमांना अनुसरून परिवर्तित न होणारे शाश्वत सत्य! यालाच तर ‘ऋत’ असे म्हणतात.
 
 
उदा. जन्म व मृत्यू यांची प्रक्रिया अनादी काळापासून चालत आलेली आहे. याला कोणीही थांबवू किंवा बदलू शकत नाही. २+३=५ किंवा हायड्रोजन2+ऑक्सिजन= H2O (पाणी)! हेदेखील ऋतनियमच आहे. याबरोबरच गुरुत्वाकर्षण सिद्धांतांसारखी उदाहरणे अगदी पूर्वापार चालत आलेली आहे. हेच तर ऋत आहे. पण, व्यवहारातील आपले जे काही बोलणे असते, ते नेहमी बदलत असते. उदा. अमेरिकेतील घड्याळाची वेळ आणि भारतातील घड्याळाची वेळ ही बदललेली असते, हे सत्य आहे! पण, ते परिवर्तित झालेले आहे. हाच काय तो ऋत आणि सत्य यातील फरक!
 
 
साधारण लोक खरे बोलतात, सत्य गोष्टी कथन करतात, पण ते पूर्णांशाने सत्य (खरे) नसते, पण संत-महात्मे जे काही बोलतात, त्यामागे सृष्टीचे शाश्वत सत्य दडलेले असते. सामान्यत: परिवर्तनीय सत्यापेक्षा अपरिवर्तनीय सत्य महत्त्वाचे असते. नेहमी आत्मा, परमात्मा आणि वेदज्ञान यांना प्रमाण मानून ते बोलत असतात. ‘नरो वा कुंजरो वा’ अशी त्यांची वाणी नसते. त्यांची वाणी नेहमी गोड व प्रिय गोष्टी व्यक्त करणारी असली तरी त्यातून काहीही विशेष निष्पन्न होत नाही.
 
 
ईश्वराने मानवाला दिलेली जिभ दोन कामे करते. एक रसास्वादन तर दुसरे शब्दोच्चारण! म्हणून हिला ‘रसना’ व ‘रदना’ असे म्हणतात. चव घेताना सात्विक व शुद्ध आहाराचे ग्रहण, तर बोलताना पवित्र व गोड शब्दांचे प्रतिपादन! ईश्वराकडून मिळालेले हे मोठे वरदान! म्हणूनच या वागेंद्रियाचा सदुपयोग व्हावयास हवा. आपण सामान्य लोक वाटेल ते व नको ते काहीही बडबडतो. अनेकदा लबाड बोलतो. मात्र, प्रखर सत्यवादी व ऋतानुगामी संत महात्मे नेहमी सर्वांच्या आत्मा व हृदयाला आवडेल, असे प्रिय व गोडच बोलत असतात. रघुवंशातील आदर्श राजे हे सदैव शब्दांना जागणारे होते. संत तुलसीदासांनी त्यांच्याविषयी म्हटले आहे
 
 
‘रघुकुल रीत सदा से चली आयी, प्राण जाये पर वचन न जायी।’ एकदा शब्द दिला की दिला, नंतर त्यात कोणताही बदल नाही. याप्रमाणेच संतांचे शब्द बदलत नसतात. केवळ बोलणेच नव्हे, तर त्यांचे वागणेदेखील सत्य व प्रामाणिकच असते. जीवनरूपी वाणी सतत सद्व्यवहारच करते. काहीही न बोलता किंवा मितभाषी राहून सत्याने वागणे, म्हणजे ते बोलण्याच्या पलीकडचे असते. संत सुधारक व महात्मे असेच असतात. ‘आधी केले, मग सांगितले’ याप्रमाणे त्यांची कृती हीच जगासाठी उक्ती ठरते.
 
 
‘साच को आंच नहीं।’ किंवा ‘खर्‍याला मरण नाही’ या प्रसिद्ध म्हणींनुसार सत्यवादी महापुरुषांना कोणीही रोखू शकत नाही. त्यांना कोणाचीही भीती नसते. सुरुवातीला त्रास होईल, वाईट लोक विघ्ने आणतील, पण नंतर मात्र त्यांचे अनुगामी बनल्याशिवाय राहणार नाहीत. याकरिता सत्यवादींना मोठ्या धैर्याने व संयमाने जगावे लागते. प्रारंभी प्रतिकूल ठरणारे लोक नंतर मात्र संत महात्म्यांचे अनुयायी होतात, हे आपण ऐतिहासिक घटनांतून वाचतो व अनुभवतोच! याकरिता सत्यवादी मंडळींना तितकेच मनसा-वाचा-कर्मणा धैर्यवंत, साहिसी व दृढ राहावे लागते. त्यांच्या वाग्यज्ञातून नेहमी सत्याचा सुगंध दरवळतो. ऋतवाणीला ते स्वत:चा सनातन म्हणजेच प्राचीन धर्म मानतात-
 
 
 
‘सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्, न ब्रूयात् सत्यम् अप्रियम्।
प्रियं च नानृतं ब्रूयात्, एष: धर्म सनातन:।’
 
 
मंत्राच्या तिसर्‍या व चौथ्या चरणात सत्यवादी पुत्र हा आपल्या आई-वडिलांचे, गुरुजनांचे व आपल्या समस्त कुटुंब व गावाचे लौकिक वाढविणारा ठरतो, असे म्हटले आहे! अनेकदा आपल्या अनुभवास येते की, मुले किंवा मुली या आपल्या शाश्वत वाणीने, सत्य व्यवहाराने, पुरुषार्थाने व परिश्रमाने जगात त्यांच्या आई-वडिलांचे व वंशाचे नाव उज्ज्वल करतात.
 
 
सत्यवादी श्रीरामांमुळे पिता दशरथ व माता कौसल्या आणि सारे रघुकुळ आजतागायत कीर्तिवंत ठरले. जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी श्रीरामांबरोबरच त्यांचा वंशदेखील स्मरणी आहे. अयोध्येत राज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरु असतानाच कैकयीने श्रीरामास बोलावून म्हटले की, ‘तुझे वडील तुला १४ वर्षांच्या वनवासाला पाठवू इच्छितात!’ त्यावेळी श्रीरामांनी थोडेही न घाबरता सहजच उद्गार काढले-‘अहं हि वचनात् राज्ञ: पतेयमपि पावके। भक्षयेयं विषं तीक्ष्णं मज्जेयमपि चार्णवे॥’ म्हणजेच ‘मी राजांच्या(पित्यांच्या) आदेश-वचनाने अग्नीतदेखील उडी घेईन, हलाहल विषदेखील प्राशन करेन आणि समुद्रातदेखील उडी घेईल.’
 
 
किती हा महान आज्ञाधारकपणा! केवढे मोठे हे पितृवचनांचे पालन! योगेश्वर श्रीकृष्णांविषयीदेखील म्हटले जाते - ‘गुणा: सर्वत्र पूज्यन्ते पितृवंशो निरर्थक:। वासुदेवं नमस्यन्ति वसुदेवं न मानवा:॥’ अशाच प्रकारे नंतरच्याही असंख्य सत्यप्रिय संतजण व महापुरुषांनी प्रखर सत्यवादिता, प्रामाणिकपणे सेवा, परोपकार व राष्ट्रीय-सामाजिक कार्य यांद्वारे आपल्या कुळांच्या कीर्तीचा कळस उंचावला आहे. इतकेच नव्हे, तर यांसारख्या सत्यवादी सत्पुरुषांनी शाश्वत सत्यवाणी (ऋत) व सद्व्यवहाराने आपली इहलोकांची जीवनयात्रा यशस्वी करून परलोकाचाही (पुढील जन्मात) मार्ग सुकर केल्याचे निदर्शनास येते. असा हा सत्याचा प्रताप मानवी जीवनाचे सर्वांगीण कल्याण साधणारा आहे. आज या वेद प्रतिपादित शाश्वत सत्य नियम पालनांची व सद्विचारांची अत्यंत गरज आहे. समाज, राष्ट्र व विश्वकल्याणासाठी प्रत्येकाने ऋत वाणीचा अंगीकार केल्यास निश्चितच हे सारे जग शांत, सुखी व आनंदी बनेल, यात शंका नाही.
 
 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@