त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2020   
Total Views |

durga puja_1  H

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या देवींच्या नवरूपांचे पूजन म्हणजे नवरात्र. दुर्गामातेचा उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, स्त्री अस्मितेचे पूजन. करुणा, कौशल्य, शौर्य, संवेदना, विद्वता, सर्जनशीलतेला नव्याने जागृत करण्याचे तेज म्हणजे दुर्गापूजन होय. दुर्गामातेच्या शक्तीचे चैतन्य आजही जाणवते. त्या शक्तीचे या लेखात केलेले स्मरण...


महिषासुरमर्दिनीची शौर्यकथा आजही मनात स्त्रीशक्तीबाबत अभिमान निर्माण करते. उन्मत्त महिषासुराने इंद्रपद लुटून इंद्रासह सर्व देवाधिकांना त्राहिमाम केले. त्यानंतर देवगणांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची याचना केली. त्यावेळी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी देवीची प्रार्थना केली, तिचे पूजन केले. त्यावेळी त्राहिमाम झालेल्या या देवगणांच्या सुरक्षेसाठी दुर्गामाता अवतरली आणि तिने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून महिषासुराचा वध केला. पुन्हा देवलोकाला मुक्त केले. ही कथा सांगण्याचे कारण की, भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक इतिहासामध्ये स्त्री कुठे आहे सांगा, असे ओरडणार्‍यांनी कृपया महिषासुरमर्दिनीची आठवण करावी. भारतीय धर्मपरंपरेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे महत्त्व आहे. मात्र, या सगळ्या महान देवतांनाही आपले संरक्षण आपले देवपद अबाधित राखण्यासाठी स्त्रीशक्तीचा जागर करावा लागला. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे सार्वभौम शक्तिरूप सर्वमान्य होते. स्त्री म्हणून ती दुर्बल, अबला आणि परावलंबी आहे, अशी काही तिची ओळख किंवा अस्तित्व नव्हते. प्रत्यक्ष देवगणांना तारणारी आणि मायावी असुराला चितपट करणारी ही महिषासुरमर्दिनी दुर्गामाता म्हणजे स्त्रीच्या आंतरिक शक्तीचे वास्तव रूपच आहे. असो, आज दुर्गामातेचे पूजन, स्मरण आणि जागर होणे गरजेचे आहे, असे वाटत राहते. कारण, लिंगभेद आणि वर्णभेदाचे विषारी जाळे जगभरात पसरले आहे.



स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांची पातळी जगभरात वाढली आहे. हे कधी थांबणार? अशावेळी दुर्गामातेचे ‘दुष्टनाशिनी’ रूप आठवते. आम्ही कधी होणार दुर्गा? दुर्गेची नऊ रूपे आम्ही जगतच असतो. या नवदुर्गेचे अन्यायनिवारक असलेले महिषासुरमर्दिनेचे तेज आम्ही का विसरत चाललो आहोत? दूरचे कशाला, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या जगदंबा तुळजाभवानीची प्रतिमा महिषासुरमर्दिनी या स्वरूपातीलच आहे. सोळाव्या शतकातील सुलतानशाहीने गांजलेल्या अवस्थेत संत एकनाथांनी या महिषासुरमर्दिनीलाच तर आवाहन केले आहे की, ‘दार उघड बया दार उघड, या म्लेच्छांचा संहार कर.’ पुढे सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीदेवीच्या आशीर्वादानेच स्वराज्य स्थापन करून ‘न भूतो ना भविष्य’ असा महाराष्ट्राचा नव्हे, हिंदू पातशाहीचा इतिहास रचला. तसेच तिची नित्य पूजा व्हावी म्हणून प्रतापगडावर भवानीदेवीची प्रतिष्ठापना करून तिचे मंदिरही बांधले. जगदंबेची आराधना करत स्वराज्याचे निर्माण झाले, तर सांगायचा मुद्दा हा की, या दुर्गामातेचा वारसा सांगणार्‍या आपण स्त्रीशक्ती आहोत. आज समाजात होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला आम्ही प्रतिकार करणार आहोत की नाही? अत्याचाराशी दोन हात करणार आहोत की नाही? आज समाजात अनिष्ट रूढी, त्यातही जागतिकीकरणाच्या रेट्यातल्या बेगडी आधुनिकवादाच्या भ्रामक कल्पना, अमली पदार्थांचा विळखा आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाची बजबजपुरी माजली आहे. नेमकी आयुष्याची दिशा कोणती, याबद्दल संभ्रम दाटून येत आहे. अशा काळात नवदुर्गांचे स्वरूप आणि कार्य समाजाला दिशा दिल्याशिवाय राहत नाहीत.
याची एक स्वत: अनुभवलेली घटना सांगते. २०१६-२०१७ साली झारखंड राज्यातील खुटी शहर आणि आजूबाजूच्या ७० गावांमध्ये नक्षल्यांनी डेरा टाकला होता. युसूप पूर्ती, विजय कुंजर, बबिता कच्छप, कृष्णा हसंदा वगैरे डाव्या विचारधारेचा वारसा चालवत माओवादी कृत्य करणार्‍यांनी तिथल्या भोळ्या भाबड्या वनवासींना सांगितलेे की, १०० वर्षांपूर्वी इंग्रजांच्या राणीने हा झारखंड भारताला ९९ वर्षांच्या करारावर दिला होता. आता ९९ वर्षे केव्हाच होऊन गेली. कानून-कायद्यानुसार ही जमीन आता राणी व्हिक्टोरियाची आहे. आता इथे पुन्हा व्हिक्टोरियाचे राज्य आहे. हे ७० खेडे म्हणजे, झारखंडच्या दाट जंगलातले मुंडा समाजाचे पाडे. यातही बहुसंख्य मुंडा समाजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला. इथे नक्षल्यांनी विकासाचे कोणतेही काम होऊ दिले नाही. ना रस्ता, ना पाणी, ना वीज. काही वर्षांपूर्वी इथल्या एका मध्यवर्ती गावात एक थिएटर सुरू झाले होते. पण, मुंडा समाजाच्या परंपरांना सिनेमा बिघडवणार म्हणून नक्षल्यांनी थिएटर जाळून तोडून टाकले. इथल्या दहा-बारा गावांना मिळून एक पोलीसचौकी. त्या पोलीसचौकीलाही सशस्त्र पोलिसांचे संरक्षण. तर मुद्दा असा की, इथे नक्षल्यांनी ‘पत्थलगडी’ या पारंपरिक प्रथेचा गैरवापर करत मुंडा वनवासींना चिथावणी दिली. इथे ‘पत्थलगडी’ म्हणजे इथल्या पारंपरिक मुंडा समाजात कुणी वंशाच्या मूळ पुरुषाच्या नावाने पत्थर गाडला जातो. जर कुणी अकाली वारले, कुणी आत्महत्या केली किंवा कुणी निषिद्ध गोत्रात किंवा अस्वीकृत असलेला विवाह केला, तर त्या व्यक्तीच्या नावाने पत्थर गाडला जातो, तर नक्षल्यांनी संविधानाच्या कलमाचा पत्थर गाडलेला. त्यांनी गावागावांत बैठका घेतल्या आणि सांगितले की, संविधानाच्या कलमानुसार आपण विशेष आहोत.



आपण विशेष असल्यामुळे आपल्याला इतरांना बांधील असलेला कोणताही कायदा बांधील नाही. भारत सरकारच्या कोणत्याही नागरिकत्वाच्या पुराव्याची आपल्याला गरज नाही. कारण, आपण ‘मूळ निवासी’ आहोत. त्यामुळे आपोआपच या देशाचे आपण राजे आहोत, इथली सगळी संपत्ती त्यातही रिझर्व्ह बँकेतले पैसे आपलेच आहेत. तसेच संविधानाच्या कायद्यानुसार वनवासी भागात बाहेरचे लोक जमिनी खरेदी करू शकत नाहीत, याचाच अर्थ संविधानाने आपल्याला सांगितले आहे की, कुणालाही तुम्ही तुमच्या इथे येऊ देऊ नका. तुमचे स्वतंत्र राज्य आहे. तसेच संविधानामध्ये सांगितले आहे की, २०वर्षांपेक्षा जास्त प्रचलित असलेल्या पंरपरेला कायद्याने बंदी आणू शकत नाही. मग मुंडा समाजात तर न्यायनिवाडे गेली कित्येक शतके जातपंचायत करते. आपल्या इथे कुठे नगरसेवक, आमदार, खासदार होते? पोलीस होते? शाळा होत्या? डॉक्टर होते? ही आमची पंरपरा नाही. आमच्या परंपरेत केवळ जातपंचायतच आहे. त्यामुळे आम्ही जातपंचायतीचेच ऐकणार, तिने संमत केले तरच आमच्या इथे शाळा, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन आणि राजकीय निवडणुका होतील, कुणी नगरसेवक, आमदार, खासदार होतील. कमाल अशी की, या नक्षल्यांनी गाववाल्यांचा इतका बुद्धिभेद केला की, ७०गावांनी गावाबाहेर संविधानाचा वरील अर्थ लिहिणारी ‘पत्थलगडी’ गाडली आणि स्वत:ला स्वतंत्र घोषित केले. पत्थलगडी गाडताना नक्षली आणि पादर्‍यांनी मुंडांकडून शपथ घेतली की, जर ही पत्थलगडी काढली तर गावाचा निर्वंश होईल, त्यामुळे जो कोणी ही पत्थलगडी काढेल त्याचा गावच निर्वंश करेल. झाले, या ७० गावांनी पत्थलगडी गाडल्याबरोबर शाळा, दवाखाने बंद पाडले. गावात कुठल्याही सरकारी अधिकार्‍याला, कर्मचार्‍याला अगदी आमदार, खासदारालाही यायला बंदी केली. एका गावात तर शहराच्या पोलीस कमिशनरला तीन दिवस बंधक बनवून ठेवले.

२०१७साल होते ते. काही महिने गेले. तिथल्या लोकांवर कारवाई करावी तरी कशी करणार अख्खे गाव विरोधाला उभे, वर हातात संविधान. याचा फायदा तिथल्या समाजकंटकांनी घेतला. काही गावेच्या गावे ख्रिश्चन झाली; अर्थात हा प्रताप ख्रिश्चन मिशनर्‍यांचा होता आणि तिथल्या नक्षल्यांना हाताशी घेऊन त्यांनी हा खेळ केला होता. पत्थलगडीचे कारस्थान यशस्वी झाल्यावर तिथे ना भारताची पोलीस यंत्रणा काम करू शकत होती ना इतर यंत्रणा. त्यामुळे भोळ्याभाबड्या वनवासींना घाबरवणे फसवणे सुरू झाले. अशातच या गावात मग या तथाकथित पत्थलगडी नेत्यांनी मिटिंग घ्यायला सुरुवात केली. आता ते गाववाल्यांना सांगू लागले. देव मानणे सोडा, पूजा करू नका, तुम्ही हिंदू नाही. तुम्ही मूळनिवासी आहात. तसे पाहायला गेले तर मुंडा हे वृक्षपूजक आहेत, ते निसर्गाची पूजा करतात. तिथे मंदिर वगैरे अपवादाने दिसतात. मात्र, चर्चचे अवडंबर मोठे. असो, तर यापैकी एक गाव होते चित्रामुहव. त्या गावात खूप वर्षांपूर्वी गाववाल्यांनी दुर्गामातेचे मंदिर बांधले होते. या गावातले मुंडा त्या मातेची पूजा करत, देवळाचीही देखभाल करत. एकंदर त्या परिसरात मुंडांचे ते देवीचे एकमेव मंदिर. एकेदिवशी नक्षली नेत्यांनी या गावात मिटिंग बोलावली. त्या नेत्यापैंकी एक कृष्णदा हंसदा त्यांनी सांगितले की, “तुम्ही पत्थलगडी केलीत, तुम्हाला भारत सरकारपासून मुक्तता मिळाली. पण, तुम्हाला अजून एक काम केले पाहिजे. तुमच्या गावात ते मंदिर आहे ना ते तोडा. तसेही दुर्गा ** आहे, *** आहे.” त्यांनी दुर्गामातेला, प्रभू श्री रामचंद्र आणि सीतेला अर्वाच्य शिव्या द्यायला सुरुवात केली. यावर गावातल्या लोकांना कळेना की, आजपर्यंत आपण यांचे सगळे ऐकले. आता या दुर्गामातेच्या मंदिराने यांना काय त्रास होतो? लोक अस्वस्थ झाले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी आपसात बैठक लावली. आयाबाया म्हणू लागल्या, त्या मंदिरातली देवी आमची आई आहे. ऊन-वारा-पावसात तिनं आम्हाला हिंमत दिली. कित्येक वर्षे ती गावाचं रक्षण करते. ती आम्हाला आशीर्वाद देते. तिची मूर्ती कशी तोडायची? ते देऊळ कसे पाडायचे? आम्ही ती दुर्गादेवीची मूर्ती पाडणार नाही. शेवटी गाववाल्यांनी नक्षल्यांना निरोप पाठवला.

‘आम्ही दुर्गामातेची मूर्ती तोडणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा आणि ज्या पत्थलगडीमध्ये आमच्या देवीला तोडावे लागेल, ती पत्थलगडीच आम्हाला नको.’ असा निरोप पाठवून गावातल्या आयाबायांनी आम्ही संविधानाने भारत सरकारपासून स्वतंत्र आहोत, असे लिहिलेली पत्थलगडी उखडून टाकली. यावर कोणीतरी म्हणाले की, “तुम्ही पत्थलगडी गाडताना शपथ घेतली होती की, पत्थलगडी काढली तर गावाचा निर्वंश होईल, का काढता ती?” यावर गावातले लोक न जाणे कोणत्या उत्स्फूर्ततेने म्हणाले, “दुर्गामातेची मूर्ती आणि देऊळ तोडायला सांगणार्‍यांची शपथ आणि शाप लागणार नाही. लागला तरी देवी पाहून घेईल.” पत्थलगडी तोडल्यानंतर त्या गावात भारत सरकारचे प्रशासकीय अधिकारी, सर्व सोयीसुविधा आणि कल्याणकारी उपाययोजनांसह त्या गावात हजर झाले. दोन-तीन महिन्यांत गावाचा निर्वंश तर झाला नाही, उलट गावाची खूपच प्रगती झाली. हे पाहून नक्षली आणि काही पादर्‍यांच्या नादाला लागून पत्थलगडी गाडलेल्या गावांनीही पत्थलगडी पाडली. आपण सार्वभौम भारताचे नागरिक आहोत, आपण भारतीय आहोत, आपण स्वतंत्र नाही, असे पुन्हा त्यांनी घोषित केले. हा चमत्कार होता, त्या दुर्गामातेच्या मूर्तीचा, तिच्या मंदिराचा. तिला तोडण्याची, भग्न करण्याची वार्ता केल्याबरोबर नक्षल्यांचा बालेकिल्ला लोकांनीच उद्ध्वस्त केला. आजच्या काळातली दुर्गामातेची ही आधुनिक राष्ट्रप्रेमी कथाच म्हणावी लागेल. नाहीतरी हे सगळे लिहिताना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम्’मध्ये भारतमातेचा गौरव करताना म्हटलेच आहे की,
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी
नमामि त्वां
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम्॥
@@AUTHORINFO_V1@@