वैफल्यग्रस्त डाव्यांचा 'जेएनयु'मध्ये हैदोस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020   
Total Views |


saf_1  H x W: 0


विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणे शक्य व्हावे यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याने आणि त्यास विद्यार्थी प्रचंड प्रतिसाद देत असल्याचे पाहून डाव्या संघटनांचे नेते बिथरले आणि त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्याचे षड्यंत्र रचले.


नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिक्षणापेक्षा अन्य घटनांमुळे गाजत आहे. याच विद्यापीठात, संसदेवर हल्ला केल्याबद्दल ज्या अफजल गुरूला फाशी देण्यात आले, त्याचे गोडवे गाणारे आणि देशाचे तुकडे तुकडे झाले पाहिजेत, अशी मनीषा बाळगून तसा प्रयत्न करणारे देशद्रोही विद्यार्थी नेते देशाने अनुभवले आहेत. देशाचे ऐक्य, एकात्मता यांना तडे कसे पडतील, याचा विचार आणि त्याला साजेशी कृती या विद्यापीठात कार्यरत असलेल्या पुरोगामी, डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांकडून आणि त्यांच्या कथित नेत्यांकडून होत आहे. देशविरोधी भाषणे करून तरुणांना भडकविण्याचे प्रयत्न, त्या विद्यापीठात शिक्षणाच्या नावाखाली अनेक वर्षे मुक्काम ठोकून असलेल्या डाव्या विचारांच्या विद्यार्थी नेत्यांकडून होत आहेत. मात्र, आता 'जेएनयु' मध्ये 'हम करे सो कायदा' असे समजून चालणाऱ्या डाव्या विद्यार्थी संघटनांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांच्याकडून हिंसाचाराचा मार्ग अवलंबिला जात आहे. रविवारी 'जेएनयु'मधील हिंसाचार डाव्या संघटनांनी याच वैफल्यातून घडविला, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात आल्यानंतर या कायद्याविरुद्ध जामिया मिलिया इस्लामिया, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ याप्रमाणे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विद्यार्थी संघटनांनी हिंसक निदर्शने केली. त्या घटना ताज्या असतानाच रविवारी संध्याकाळी 'जेएनयु'मध्ये हिंसाचार उसळल्याने ते विद्यापीठ पुन्हा चर्चेत आले आहे. डाव्या, पुरोगामी विचारांची सदैव तळी उचलणाऱ्या आणि त्यांच्या पखाली वाहणाऱ्यांनी लगेचच आपल्या बाह्या सरसावून अभाविप, संघ परिवार यांच्यावर या निमित्ताने तोफा डागण्यास प्रारंभ केला. पण 'जेएनयु'मध्ये नेमके काय घडले?

 

गेल्या काही दिवसांपासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शुल्कवाढीवरून आंदोलन सुरू होते. त्यातच या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले, पण शिक्षणाच्या हेतूने विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्या आवाहनास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या डाव्यांनी हिंसाचार घडवून दहशत निर्माण केली. या हिंसाचारामध्ये अनेक जखमी झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यांच्यावर ठरवून हल्ले करण्यात आले, पण डावीकडे झुकलेल्या बहुतांश माध्यमांनी, केवळ डाव्या विद्यार्थी संघटनांचे नेते या हिंसाचारामध्ये जखमी झाल्याचे दाखवून अभाविपला बदनाम करण्याचा आणि डाव्या संघटना किती सोवळ्या आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. 'जेएनयु'मध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर डाव्या विचारांची नेतेमंडळी ज्या वेगाने सक्रिय झाली; तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी ज्या तत्परतेने या हिंसाचाराचे भांडवल करण्यासाठी 'एम्स'मध्ये धावल्या, हे सर्व कशाचे द्योतक आहे? दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर 'एसएफआय'चे बॅनर्स घेऊन झालेली निदर्शने, डी. राजा यांच्यासारख्या साम्यवादी नेत्याने या हिंसाचारास फॅसिस्ट शक्ती जबाबदार असल्याचे नेहमीचे पठडीतील आरोप करणे, हे सर्व लक्षात घेता यामागे काही सूत्रबद्ध योजना तर नाही ना, अशी शंका कोणाच्या मनात आली तर ते चुकीचे मानता येणार नाही. 'जेएनयु'मधील डाव्या संघटनांनी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. पण विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणे शक्य व्हावे यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याने आणि त्यास विद्यार्थी प्रचंड प्रतिसाद देत असल्याचे पाहून डाव्या संघटनांचे नेते बिथरले आणि त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्याचे षड्यंत्र रचले. 'जेएनयु'मधील डाव्या संघटनांनी विद्यापीठात जणू सक्तीची टाळेबंदीच घोषित केली होती. जो कोणी परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्याचा प्रयत्न करीत होता त्याला डाव्या संघटनांकडून लक्ष्य केले जात होते. या डाव्यांनी प्राध्यापक वर्गावर हल्ला करण्यासह कमी केले नाही. 'जेएनयु'मध्ये असलेल्या सर्व्हर रूमचा ताबा डाव्या संघटनांनी आणि बाहेरून आणलेल्या त्यांच्या पित्त्यांनी घेतल्याची माहितीही उजेडात आली आहे. जे विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आले होते, त्यांना या गुंडांनी तेथून पळवून लावले. ज्यांनी विरोध केला, त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. रविवारी संध्याकाळी या डाव्या गुंडांनी भाषा विभागाच्या एका प्राध्यापकावर हल्ला केल्याचे वृत्त आहे.

 

विद्यापीठात दहशतीचे वातावरण निर्माण केल्यानंतर आणखी दहशत निर्माण करण्यासाठी या डाव्यांनी आपला मोर्चा विद्यापीठातील वसतिगृहांकडे वळविला. पेरियार वसतिगृहावर हल्ला करण्यास आलेल्या गुंडांना सुरक्षारक्षकांनी पळवून लावल्यावर त्यांनी आपला मोर्चा साबरमती वसतिगृहाकडे वळविला. त्या वसतिगृहावर दगडफेक करण्यात आली, तावदाने फोडण्यात आली. त्या आधी ३ आणि ४ जानेवारी रोजी घडलेल्या घटना लक्षात घ्यायला पाहिजेत. विद्यापीठाने नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर ती प्रत्यक्षात येऊ नये यासाठी त्या विद्यापीठातील डाव्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी चेहरे झाकून सर्व्हर रूममध्ये प्रवेश करून 'वाय फाय' सेवा बंद पाडली. ४ जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा ही सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षक आणि डाव्या विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांमध्ये चकमक उडाली. नोंदणी प्रक्रिया रोखण्याचा डाव्यांचा प्रयत्न फसल्याने नियोजनबद्ध हल्ले करण्याची योजना त्यांनी आखली आणि मोठ्या संख्येने बाहेरून तेथे आलेल्या जमावाने विद्यापीठामध्ये नंगानाच घातला. ज्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, अशी दमबाजी करण्यात येत होती. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या या गुंडगिरीला तोंड देण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थीही रस्त्यांवर उतरले होते, अशी माहिती ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. 'जेएनयु'चा संशोधक विद्यार्थी शिवम चौरसिया याने दोनच दिवसांपूर्वी नोंदणी केली होती. त्याच्यावर डाव्यांनी जीवघेणा हल्ला केला.

 

'जेएनयु'मध्ये हा जो संघर्ष झाला, तो डावे आणि अभाविप यांच्यामधील नसून ज्यांना परीक्षा झाल्या पाहिजेत, असे वाटत होते आणि ज्यांचा त्यास विरोध होता यांच्यामधील असल्याचे काहींनी स्पष्ट केले आहे. डाव्या संघटनांच्या प्रभावाखाली असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या बहिष्कार आवाहनाला सर्वसामान्य विद्यार्थी वैतागले होते. त्यातून त्याविरुद्ध, सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी पत्रकही काढले होते. 'जेएनयु'मध्ये घडलेल्या हिंसाचाराचा विद्यार्थी परिषदेने निषेध केला आहे. डावे गुंड केवळ भारताच्याच विरुद्ध नाहीत तर ते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरुद्धही आहेत. 'जेएनयु'मधील विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक प्रक्रिया सुरू ठेवायची होती पण डाव्या संघटनांनी आपले 'दंतेवाडा मॉडेल' वापरून तेथील संपर्कसेवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला, असे अभाविपने म्हटले आहे. 'जेएनयु'चे माजी विद्यार्थी असलेले अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही विद्यापीठ परिसरामध्ये घडलेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. या विद्यापीठामध्ये टोकाचे वादविवाद आणि चर्चा आपण अनुभवली पण हिंसाचार कधीच अनुभवला नव्हता, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीही 'जेएनयु'मध्ये झालेल्या हिंसाचाराची दखल घेतली असून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्ली पोलीस आयुक्तांना दिले आहेत. त्या चौकशीतून सत्य बाहेर येईलच. पण रविवारी 'जेएनयु'मध्ये जो हिंसाचार 'घडवून' आणला गेला, ते पाहता 'जेएनयु'मध्ये डाव्या शक्तींच्या पायाखालील वाळू घसरत चालल्याचेच दिसून येत आहे, असे म्हटले तर ते अवास्तव ठरणार नाही!

@@AUTHORINFO_V1@@