पक्षीमित्रांनी रेवदंडा गजबजले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


sdg_1  H x W: 0


रेवदंडा : अलिबागमधील रेवदंड्यात भरणाऱ्या ३३ व्या 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना'च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी किनारी पक्षी कार्यशाळा पार पडली. आक्षी किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या संख्येने आलेले पक्षीमित्र सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी किनाऱ्यावर भ्रमंती करून दीड तासात १८ प्रजातींच्या स्थलांतरित पाणपक्ष्यांची नोंद केली.

 

पक्षीमित्रांकरिता पर्वणी ठरणाऱ्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. संमेलनाचे यंदाचे हे ३३ वे वर्ष आहे. 'महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना', 'अमेझिंग नेचर' आणि 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील रेवदंडा येथे हे संमेलन रंगणार आहे. किनारी पक्षी कार्यशाळेच्या माध्यमातून शुक्रवारी या संमेलनाची एका अर्थाने नांदी झाली. 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट'च्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई, नाशिक, सातारा, सोलापूर, भुसावळ, कोल्हापूरहून हौशी पक्षी निरीक्षक कार्यशाळेला उपस्थित राहिले होते. या कार्यशाळेला 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट'चे विश्वस्त आणि प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक निखिल भोपळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना ओळखण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

 

खासकरून चिखल्या (प्लॉवर) आणि तुतारी (सॅण्डपायपर) या पक्ष्यांमधील प्रजातींना ओळखण्यात पक्षी निरीक्षकांना बरेच कष्ट घ्यावे लागतात. या पक्ष्यांमधील प्रजातींच्या शरीरावरील गुणवैशिष्ट्ये सारखीच असल्यामुळे ओळख पटविण्यामध्ये बऱ्याचदा अडचण निर्माण होते. त्यामुळे भोपळेंनी कार्यशाळेमध्ये या दोन पक्ष्यांंमधील प्रजातींची ओळख शारीरिक गुणवैशिष्ट्यांच्या आधारे कशी करावी, हे सोप्या पद्धतीने सांगितले. कार्यशाळेनंतर आक्षी किनाऱ्यावर पार पडलेल्या पक्षी भ्रमंतीदरम्यान पक्षीप्रेमींना चिखल्या पक्ष्यांमधील तीन प्रजाती, तुतारी आणि सुरया पक्ष्यांच्या सहा प्रजाती दिसल्या. विशेष म्हणजे यावेळी पक्षीप्रेमींना आक्षी किनाऱ्यावर प्रसिद्ध असलेला मोठा जलरंक (ग्रेट नॉट) पक्ष्याचेदेखील दर्शन घडले.

@@AUTHORINFO_V1@@