मुंबई ( अक्षय मांडवकर ) - त्यांचा जन्म दिवाळीत वसू बारसाच्या दिवशी झाला. त्यामुळे निसर्गाच्या मनी देखील या माणसाने प्राण्यांसाठीच काम करावे, अशी इच्छा होती. पशुवैद्यकाचे शिक्षण घेऊन त्यांनी निसर्गाच्या इच्छेची पूर्तताही केली. जुन्नर तालुक्यातील 'माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रा'त काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा कामाला नवीन आयाम मिळाला. केवळ बिबट्यांवर उपचार करण्यापुरते मर्यादित न राहता उसाच्या शेतात नांदणाऱ्या बिबट्यांमुळे होणाऱ्या मानव-बिबट्या संघर्षांच्या कारणांची दुखरी नस त्यांनी अचूक पकडली. या प्राण्याविषयी समाजात असलेल्या गैरसमजूतींना दूर करण्यासाठी प्रबोधनाची चळवळ सुरू केली. वन विभागाच्या पाठिंब्याने बिबट्यांचा वावर असलेल्या गावांमध्ये ग्रामस्थांचे बचाव गट तयार केले. गेल्या दहा वर्षांच्या आपल्या वैद्यकीय कार्यक्षेत्रात त्यांनी २७५ हून अधिक जखमी बिबट्य़ांवर उपचार करुन त्यांना पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन केले आहे. तर मानवी हस्तक्षेपामुळे आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या ७० पिल्लांना त्यांनी पुन्हा मायेच्या कुशीत विसावून दिले आहे. एका अर्थी बिबट्यांचा तारणहार ठरलेला हा माणूस म्हणजे डाॅ. अजय देशमुख
यवतमाळ येथील डोंगरगावमध्ये दि. १२ नोव्हेंबर, १९८२ रोजी देशमुख यांचा जन्म झाला. सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण या खेड्यातच झाले. मात्र, हेच खेडेगाव त्यांच्या मनात निसर्गप्रेमाची आवड अंकुरीत करण्यास कारणीभूत ठरले. पारंब्यावर झुलणे, मधाच्या पोळ्यातून मध काढणे, जांब, चिंचा चोरून खाणे असे त्यांचे बालपणीचे विश्व होते. त्यानंतर वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने देशमुख कुटुंबीय पुसद या तालुक्याच्या ठिकाणी स्थायिक झाले. याठिकाणी देशमुख यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरच्यांच्या प्राण्याविषयी असलेल्या कनवाळू वृत्तीने त्यांना पशुवैद्यकीय शिक्षण घेण्यास भाग पाडले. त्यांचे पदवीचे पाच वर्ष व त्यानंतर एम. व्ही. एससीचे (अॅनिमल रिप्रॉडक्शन) दोन वर्षांचे उच्च शिक्षण नागपुरात झाले. उच्च शिक्षण घेत असताना सहा महिन्यांच्या प्रबंध संशोधनाच्या कामानिमित्ताने देशमुखांना वन्यजीवांच्या वैद्यकीयशास्त्राचा उलगडा झाला. संशोधनाच्या कामासाठी त्यांना हैद्राबाद येथील ’लॅबोटरी फॉर कॉन्झर्वेशनऑफ एनडेन्जर्ड स्पिसीज’ या भारतातील एकमेव वन्यजीवांसंबंधी काम करणार्या प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळाली. ही प्रयोगशाळा हैद्राबाद प्राणिसंग्रहालयाशी संलग्नित होती. त्यामुळे देशमुखांनी वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती व इतर वन्यजीवांसाठी काम केले. २००८ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २००९ मध्ये ’वाईल्डलाईफ एसओएस’ या संस्थेमार्फत ते जुन्नर येथील ’माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रा’त रुजू झाले. या केंद्राने देशमुखांच्या वैद्यकीय कार्यक्षेत्राला कलाटणी दिली. ‘बिबट्या बचाव केंद्रा’त रुजू झाल्यानंतर तेथील व्यवस्थापनासह बिबट्या बचावाच्या प्रसंगाला सामोरे जाणे आव्हानात्मक होते, असे देशमुख सांगतात. केंद्राचे व्यवस्थापन, त्यामधील बिबट्यांची देखभाल, औषधोपचार, त्यांच्या सवयी जाणून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. यामधील सगळ्यात आव्हानात्मक काम म्हणजे मानव-बिबट्या संघर्षादरम्यान अडकलेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्याचे. अशा परिस्थितीत अडकलेल्या बिबट्याची शारीरिक परिस्थितीचा अंदाज बेशुद्धीच्या औषधाचे प्रमाण ठरविणे आणि त्यानंतर बिबट्याचा वेध घेऊन ‘इंजेक्शन मारणे’ ही एक प्रकारची तारेवरची कसरतच आहे. यासंबंधी देशमुख आपल्या पहिल्या बिबट्या बचाव कार्याचा अनुभव सांगतात. २००९ मध्ये संगमनेर येथील एका खेड्यातील ७० फूट कोरड्या विहिरीत बिबट्या १० दिवसांपासून अडकून होता. त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यामुळे बिबट्या अधिकच बिथरला. देशमुखांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर तत्काळ बचावकार्याला सुरुवात केली. लाकडी फळ्यांच्या आधारे पाळणा तयार करून देशमुख विहिरीत उतरले. बेशुद्ध करण्यासाठीची तीन इंजेक्शन्स ‘मारली.’ मात्र, बिबट्या बेशुद्ध होईना. शेवटी डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून बिबट्याला बेशुद्ध केले.
बिबट्या बचावाबरोबरच डॉक्टरांच्या हातून घडलेले महत्त्वपूर्ण काम म्हणजे मादीपासून विलग झालेल्या बिबट्यांच्या पिल्लांना त्यांच्या मातेकडे पुन्हा सुपूर्द करण्याचे. प्राण्यांच्या पिल्लांना माणसाने हात लावल्यास मादी त्यांना स्वीकारत नसल्याचा समज समाजात होता. मात्र, डॉक्टरांच्या एका प्रयोगाने तो पुसून निघाला. पुणे जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीच्या वेळी शेतात बिबट्यांची पिल्लं सापडायची. ही पिल्लं वन विभागाकडे आल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य पिंजराबंद व्हायचे. म्हणून डॉक्टरनी सापडलेली पिल्लं त्याच ठिकाणी ठेवून मादी बिबट्या पुन्हा पिल्लांना घेऊन जाण्याची संधी दिली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातही तो अंमलात आणला. या प्रयोगाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांमध्ये डॉक्टरनी आजवर बिबट्याच्या ७० पिल्लांना त्यांच्या आईच्या कुशीत पुन्हा विसावू दिले आहे.
गेल्या दशकभरात डॉक्टरनी ‘बिबट्या निवारा केंद्रा’च्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत अडकलेले म्हणजे विहिरीत, घरात आणि फासेबंद झालेल्या १५० हून अधिक बिबट्यांचा बचाव करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी बिबट्या वावर क्षेत्रातील शाळा-महाविद्यालये, गावकरी, सरपंच अशा वेगवेगळ्या स्तरांवर प्रबोधन करण्याचे काम ते करत आहेत. अन्नसाखळीत आघाडीवर असलेल्या या प्राण्याला वाचविण्याबरोबरच दुसर्या बाजूला मनुष्याचा जीवदेखील महत्त्वाचा असल्याची जाण ठेवत ’माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रा’चे कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. बिबट्या हा प्राणी अत्यंत चतुर, हुशार व चाणाक्ष असल्यानेच तो आपल्यासोबत तग धरून राहत असल्याचे देशमुख सांगतात. अशा अवलिया माणसाला त्यांच्या पुढील कारकिर्दीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा !
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat