खुशखबर : मुंबई -पुणे रेल्वेसेवा पुन्हा रुळावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : शुक्रवारपासून मुंबई- पुणे रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस आणि मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या शुक्रवारपासून धावणार आहेत. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खबरदारी म्हणून गेले १५ ते २० दिवस ही रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती.

 
 
 

मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी या गाड्या १६ ऑगस्टपर्यंत रद्द केल्या असल्याचे यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. लांब पल्ल्याच्या विविध गाड्याही रद्द करण्यात आल्याने प्रवासी मेटाकुटीला आले होते. रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागासह इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे गाड्या रद्द कराव्या लागत असल्याचे स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आले होते. मात्र, मुंबई-पुणे सेवा पूर्ववत झाल्याने आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

 

मागील महिन्याच्या अखेरीस झालेल्या मोठ्या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरडी कोसळल्या होत्या. त्या दरडी हटविण्यासाठी रेल्वेने २६ जुलै ते ९ ऑगस्ट असा मेगाब्लॉक घेतला होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी रूळ पाण्याखाली गेले. रुळांखालची खडी वाहून गेली. सिग्नल यंत्रणा ठप्प झाली. यामुळे हा पूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तो शुक्रवारपासून पुन्हा खुला करण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@