शहीद जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च लोढा फाउंडेशन करणार
- अभिषेक लोढा यांची घोषणा; प्रत्येक वीर पत्नीला देणार नोकरी
10-May-2025
Total Views |
मुंबई, 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना लोढा फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या मुलांचा शिक्षण खर्च लोढा फाउंडेशन करणार आहे. शिवाय वीर पत्नीला देणार नोकरी देखील दिली जाणार आहे, अशी घोषणा लोढा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक लोढा यांनी शनिवार, दि. १० मे रोजी केली.
मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंजू लोढा, विनती लोढा, मेजर (नि.) मानवेंद्र सिंह, मेजर (नि.) असिफ सैद उपस्थित होते. लोढा म्हणाले, आपले शूर जवान १४० कोटी भारतीयांच्या स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे रक्षण करत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या शौर्य व बलिदानाला अभिवादन म्हणून, लोढा फाउंडेशन ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान शहीद झालेल्या प्रत्येक सैनिकाच्या कुटुंबाला मदत करणार आहे.लोढा फाउंडेशन शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे, जो त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत चालू राहील. यामध्ये शिक्षण शुल्क, पुस्तके आणि वसतिगृहाचा खर्च समाविष्ट असेल. याशिवाय, 'लोढा जीनियस प्रोग्रॅम' अंतर्गत या मुलांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा व मार्गदर्शन (मेंटॉरशिप) दिले जाईल.
शहीद जवानांच्या पत्नींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता सहाय्य दिले जाईल. तसेच, जर त्या इच्छुक असतील, तर लोढा ग्रुप व लोढा फाउंडेशनमध्ये रोजगाराच्या संधींमध्ये त्यांना प्राधान्य दिले जाईल. लोढा फाउंडेशन शहीद जवानांच्या पालकांसाठी पुढील २० वर्षांसाठी आरोग्य विम्याची व्यवस्था करेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, माझी आई आणि पत्नीने ही संकल्पना सुचवली असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष निधीची घोषणा
भारताच्या वीर जवानांना मदतीचा हात देऊ इच्छिणाऱ्या नागरिक आणि कंपन्यांसाठी लोढा फाउंडेशनने ‘ऑपरेशन सिंदूर / देशभक्त निधी’ स्थापन केला आहे. या निधीमध्ये प्राप्त होणाऱ्या सर्व देणग्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान शहीद झालेल्या किंवा कायमस्वरूपी अपंग झालेल्या सैनिकांच्या व नागरिकांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी वापरल्या जातील. याव्यतिरिक्त सरकारने काही मदतीचे आवाहन केले तर प्रत्येक पातळीवर मदत करू, असे अभिषेक लोढा यांनी सांगितले.