एक लाख प्रेक्षक क्षमतेचे मैदान बांधणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘एमसीए’ला प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

    16-May-2025
Total Views | 18
एक लाख प्रेक्षक क्षमतेचे मैदान बांधणार


मुंबई, “वानखेडे मैदानाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे एक ‘आयकॉनिक स्टेडियम’ आहे. मागच्या काळात दिवंगत अध्यक्ष अमोल काळे आणि ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख प्रेक्षक बसू शकतील, असे मैदान उभारण्याबद्दल चर्चा केली होती. ‘एमसीए’ने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र सरकारच्या वतीने उचित जागा देऊ. तेथे किमान एक लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य मैदान उभारू”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. १६ मे रोजी केली.


वानखेडे मैदानावर शुक्रवारी शरद पवार स्टँड, रोहित पवार स्टँड, अजित वाडेकर स्टँड आणि एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एमसीएच्या ऑफिस लाउंजचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. रोहित शर्मा यांच्या क्रिकेटमधील योगदानाचे कौतुक करीत फडणवीस म्हणाले, “रोहित शर्मा एक उत्कृष्ट फलंदाज आहेतच, शिवाय ते एक चांगले कर्णधारही आहेत. लागोपाठ दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकल्या. क्रिकेट चाहत्यांच्या मनातील इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. रोहित शर्मा यांचा एक शॉट कधी त्यांच्या नावाच्या स्टँडला जाऊन लागतो, याची आम्हाला उत्सुकता आहे. या क्षणाची सर्वच क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. एमसीएच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान खेळाडूचे नाव स्टँडला दिले जात आहे. हीदेखील एक दुर्मिळ गोष्ट आहे”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


शरद पवारांचे कौतुक


भारतीय क्रिकेट विकसित करणाऱ्या प्रशासकांमध्ये खा. शरद पवार यांचे नाव अग्रणी असेल. एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम मोठे आहे. आज भारतीय क्रिकेट ज्या स्तरावर आहे, त्याचे श्रेय शरद पवार यांचे आहे. त्यामुळे त्यांचे नाव वानखेडे मैदानावरील स्टँन्डला देणे हा ‘एमसीए’चा योग्य निर्णय आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121