मुंबई : कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असलेले ६ प्रवासी खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
सोमावर, ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा आणि दिव्याच्या दरम्यान प्रवास करत असताना दोन लोकल ट्रेनमधील प्रवाशी एकमेकांना घासल्याने ते खाली पडले आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एक ट्रेन सीएसएमटीकडे जात होती तर दुसरी ट्रेन ही कसाराच्या दिशेने जात होती.
दरम्यान, दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असताना दरवाजात उभे असलेले प्रवासी एकमेकांना घासले गेल्याने ते खाली पडल्याची माहिती पुढे आली आहे. दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, या सर्व प्रवाशांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत ६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. या अपघाताचे काही धक्कादायक व्हिडीओही समोर आले आहेत.