मुंबई : मुंबई महापालिकेतील एकूण २२७ वॉर्डांपैकी अनुसूचित जातींसाठी केवळ १३ वॉर्ड राखीव आहेत. ही संख्या इतर महानगरपालिकांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने, आरक्षणातील तफावत दूर करण्याची गरज समता परिषदेचे संस्थापक आणि माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी अधोरेखित केली आहे.
या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आपल्या शिष्टमंडळासह महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. मा. धम्मपाल मेश्राम यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. त्यामध्ये त्यांनी नागपूर (२४), नाशिक (१८), पुणे (१९), आणि संभाजीनगर (२२) या शहरांतील वॉर्ड आरक्षणाचा तुलनात्मक आढावा दिला आहे.
उपाध्यक्ष मेश्राम यांनी या विषयावर १० जून रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक बोलावून आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
या भेटीवेळी माजी नगरसेविका समिता कांबळे, ॲड. संदीप जाधव, योजना ठोकळे, विनोद कांबळे आणि विजय पवार उपस्थित होते. आरक्षणाच्या फेरआढाव्याची मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.