रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षेसाठी मर्सिडीज-बेंझ सोबत करार

    16-May-2025
Total Views |
रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल

मुंबई, समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकारला सहयोग करत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब असून हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील इतर उच्च-धोकादायक मार्गांवर हे मॉडेल लागू करण्याचा मार्ग खुला झाला असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून सेव्हलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून मर्सिडीज-बेंझ इंडियासोबत झालेल्या सामंजस्य कराराचे (एमओयू) स्वागत करताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, या महामार्गावर दररोज सरसरी १० लाख वाहने प्रवास करतात. त्यादृष्टीने या महामार्गावर रस्ता सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच, ऑटोमोटिव्ह उद्योग आणि सुरक्षिततेमध्ये आघाडीवर असलेली मर्सिडीज-बेंझ इंडिया या प्रयत्नात पुढाकार घेऊन भरीव योगदान देऊ इच्छित आहे, ही बाब आनंदाची आहे. त्याचप्रमाणे रस्ते सुरक्षेवर या भागीदारीचा सकारात्मक असा आमूलाग्र परिणाम होऊ शकतो. जो केवळ समृद्धी महामार्गावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठीचा एक आदर्श निर्माण करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मर्सिडीज-बेंझ इंडियाने सेव्हलाईफ फाउंडेशन (SLF) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या सहकार्याने “समृद्धी महामार्गावरील शून्य मृत्यू महामार्ग” हा रोड सेफ्टी उपक्रम मार्च २०२४मध्ये सुरू केला आहे. हा उपक्रम २०२६पर्यंत राबवला जाणार आहे. नागपूर ते मुंबई अशा ७०१ किमी लांबीच्या मार्गावर “रोड सेफ्टीच्या चार ई” म्हणजेच अभियांत्रिकी (Engineering), अंमलबजावणी (Enforcement), आपत्कालीन सेवा (Emergency Care) आणि जनजागृती (Education) यांच्यावर आधारित उपाययोजना राबवली जात आहेत. यामुळे २९ टक्के अपघाती मृत्यूंमध्ये घट झाली आहे. सुरक्षित प्रवासासाठी मल्टी-एजन्सी समन्वयद्वारे सलग सुरक्षा ऑडिट, उपाययोजना व आपत्कालीन सेवा सुधारणा करण्यात येत असून यामध्ये प्रमुख घटक हा समन्वय व भागीदारी आहे, यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पोलीस, आरोग्य विभाग व इतर संस्थांशी सात सल्लामसलत बैठकीद्वारे सहकार्य घेण्यात येत आहे.