मी शैलेंद्रसिंह प्रकाश राजपूत, एनरिच बायोटेक, कचरा व्यवस्थापन कंपनीमध्ये संचालक पदावर कार्यरत आहे. मी माझी कचरा व्यवस्थापनावर केंद्रित केमिकल इंजिनिअरिंगमधील पीएचडी आयसीटी (पूर्वीची युडीसीटी) मधून पूर्ण केली आहे.
समाजपरिवर्तनाच्या दृष्टिकोनातून, समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी, वंचितांसाठी रोजगाराच्या संधी निर्माणाकरिता मी कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे. उत्तम गुणांसह विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केल्यानंतर, मला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणे शक्य होते, तरीही मी अभियांत्रिकी क्षेत्र निवडण्याचा निर्णय घेतला. पण, हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्याने, मला एमआयटी, पुणे येथे पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीमध्ये माझे शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
याच वेळी माझे गुरू, माझे मोठे भाऊ देवेंद्र यांनी माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले आणि मला वेळोवेळी पाठिंबा दिला. आपल्या शिक्षणावर पाणी सोडत, त्यांनी माझे शिक्षण पूर्ण व्हावे याकरिता एका कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. विशेष प्राविण्यासह अभियांत्रिकी पदवी मिळाल्यानंतर त्यांनी मला ‘मास्टर्स’ पदवी मिळविण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले. मग पुढे पीएचडी केली आणि त्यानंतर लीड्स विद्यापीठ, युकेच्या सहकार्याने ‘पोस्ट डॉक्टरेट’ पूर्ण केले.
आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी, मी माझे हे यश माझ्या भावास, त्याने मला दिलेल्या अविरत सहकार्य आणि मार्गदर्शनासाठी अर्पण करतो. त्याने नेहमीच एक मोठा भाऊ आणि एक मार्गदर्शक पिता अशी दुहेरी भूमिका माझ्या आयुष्यात बजावली. मी योग्य निर्णय घ्यावा, याकरिता त्याने नेहमीच त्याच्या हुशारीचा मला फायदा करून दिला. आजही, मी व्यवसायाशी आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयापूर्वी नेहमी त्यांचा सल्ला घेतो आणि भविष्यातही मी माझ्या सर्व कामांसाठी हेच करत राहीन.
बर्याचवेळा, आपल्याला काय करावे हे माहीत असते, परंतु त्यासाठी लागणारा आत्मविश्वास वाढविण्याकरिता आणि ते काम सुरू करण्यासाठी पाठिंबा म्हणून कोणाच्यातरी सल्ल्याची आवश्यकता असते. माझ्या आयुष्यात ‘तो कोणीतरी’ म्हणजे माझा भाऊ देवेंद्र आहे, जो नेहमीच माझ्यासाठी योग्य निवड करण्यास साहाय्य करतो आणि पुढे जाण्यासाठी पाठिंबारूपी आशीर्वाद देतो.
- शैलेंद्रसिंह राजपूत
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat