बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीत अन्य एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शहीद झालेले जवान हे १९९च्या बटालियनचे होते. बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड परिसरातील केशकुतुल गावाजवळील जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली आहे.
नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफच्या १९९च्या बटालियनचे सहायक उपनिरीक्षक मधू पाटील, सहायक उपनिरीक्षक मदन पाल आणि हवालदार ताजू ओटी अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. अन्य एक जवान जखमी झाल्याची माहीती स्थानिक पोलीसांनी दिली. चकमकीदरम्यान वाहनात बसलेल्या एका महिलेला गोळी लागली, यात तिचा मृत्यू झाला आहे. यात अन्य एकजण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले.
भैरमगड परिसरात सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालत होती. ही तुकडी केशकुतुल गावाजवळील जंगलात आली, त्यानंतर नक्षलवाद्यांनी या जवानांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यानंतर प्रत्युत्तरात जवानानेही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले. त्यानंतर अन्य एका जवान शहीद झाला. जखमींना भैरमगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांकडील एक एके-४७ रायफल, चार मॅग्झीन्स, एक बुलेट प्रूफ जॅकेट आणि एक वायरलेस सेट लुटून नेला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat