चितळे बंधू मिठाईवाले : कौटुंबिक व्यवसायाला कल्पकतेची जोड

    19-Jun-2025
Total Views | 34

कौटुंबिक व्यवसायातील पुण्याईचे संचित कायम ठेवणे आणि ते उत्तरोत्तर वृद्धिंगत करणे, हे तसे आव्हानात्मकच. पण, आपल्या दर्जेदार उत्पादनांतून पारंपरिक चवीची परंपरा राखत, पुण्यापासून ते जगभर भरारी घेणार्या ‘चितळे बंधू मिठाईवालें’ची तिसरी पिढी आज नेटाने कार्यरत आहे. कौटुंबिक व्यवसायाला कल्पकतेची जोड देण्याबरोबरच, व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीनेही चितळेंनी केलेले प्रयोग हे यशस्वी ठरले. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...

पुण्याचा बाजीराव रोड असो वा डेक्कन जिमखाना या प्रतिष्ठेच्या व तेवढ्याच गजबजलेल्या परिसरात असणार्या ‘चितळे बंधू मिठाईवाले’ या व्यवसायाची चवदार आठवण प्रत्येकालाच येते. आज पुणे महानगरातील विविध ‘चितळे बंधूं’च्या चवदार व दर्जेदार कामगिरीचा व्याप विविध विक्री केंद्रांच्या माध्यमातून व खास चितळेंच्या अद्ययावत, उत्पादन कारखान्यातून चितळे उद्योगातील कार्यरत असणार्या तिसर्या पिढीच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्नांद्वारा देश-विदेशात आवजूर्र्न वाखाणली जात असून, अशा या ‘चितळे बंधू मिठाईवालें’ची ही वाचनीय चवदार कथा.

‘चितळे बंधूं’च्या मिठाई व्यवसायाची सूत्र कंपनीच्या नावाप्रमाणेच इंद्रनील चितळे व केदार चितळे हे दोघे भाऊ यशस्वीपणे पाहात आहेत. यापैकी इंद्रनील चितळे यांचा सुरुवातीला आपल्या परंपरागत व्यवसाय करण्याकडे फारसा कल नव्हता. त्यांच्या घरच्यांचा पण तसा आग्रह नव्हता. परिणामी, इंद्रनील चितळे यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

इंजिनिअरिंगची पात्रता पूर्ण केलेल्या इंद्रनील चितळे यांच्या मते, अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यावर आपली व्यावसायिक क्षमता सिद्ध करणे त्यांना तेवढेच महत्त्वाचे वाटले. यामागे केवळ कुटुंबाची प्रस्थापित व प्रतिष्ठित परंपरेवरच अवलंबून न राहता आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा विचार पण इंद्रनील चितळे यांच्या मनात येत असे, असे त्यांनीच एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.

त्याच दरम्यान इंद्रनील चितळे यांना त्यांचे चुलत भाऊ केदार चितळे यांची व्यावसायिक साथ मिळाली. दोघांनीही आपण चितळेंची प्रदीर्घ व्यावसायिक परंपरा लाभलेल्या मिठाई व्यवसायालाच पुढे चालवून आपल्या आजोबांचेच नाव व काम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला व अशा प्रकारे इंद्रनील व केदार या चितळेंच्या तिसर्या पिढीतील भावांनी नव्या अर्थाने ‘चितळे बंधू मिठाईवालें’च्या व्यवसायाला नव्या पदार्थ, चवी व सेवेसह नवीन स्वरूप दिले.
इंद्रनील व केदार चितळेंनी आपल्या परंपरागत व्यवसायाला नवे स्वरूप देताना चितळेंच्या परंपरागत, पण दर्जेदार पदार्थांच्या व्यवसायाला नवे व विविध प्रकारचे पदार्थ, त्यांचे पॅकिंग, प्रासंगिकता याला प्राधान्य दिले. व्यावसायिक व भौगोलिक विस्ताराचे महत्त्वाचे व धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले व त्यांची लगोलग अंमलबजावणीसुद्धा केली. परिणामी, पुण्याच्या पेठांपासून ‘चितळे बंधूं’चा व्यवसाय पुणे महानगराच्या बाहेर व राज्यातच नव्हे, तर सर्वदूर पसरला. यातून चितळेंचे नाव आणि काम मोठ्या प्रमाणावर वाढले.

चितळेंच्या मिठाई व्यवसायाची गौरवशाली परंपरा

१९३९ साली भिल्लवडी गावात चितळे कुटुंबातील भास्कर गणेश चितळे यांनी घरगुती स्वरूपात दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी त्यांचा भर मुख्यतः अधिकाधिक दुग्धोत्पादन करून व्यावसायिक स्वरूपात दुधाची विक्री करण्यावर होता.

अशा प्रकारे सांगली जिल्ह्यातील भिल्लवडी गावात दुग्धोत्पादन व विक्रीला व्यापक व व्यावसायिक स्वरूप देऊन भास्कर गणेश चितळे यांनी भारतातील दुग्धोत्पादन क्षेत्रातील उद्योजकतेची मुहूर्तमेढ रोवली, असे म्हणण्यास हरकत नाही. यातूनच पुढे म्हणजे, १९५० साली भास्कर गणेश चितळे यांना त्यांच्या नरसिंह उपाख्य राजाभाऊ व रघुनाथ उपाख्य भाऊसाहेब या दोन्ही मुलांची संस्थापक म्हणून साथ लाभली. नव्या पिढीतील या भावांनी चितळेंच्या व्यवसायाला नवी गती दिली. यातूनच चितळेंच्या दूध व्यवसायातून दुधावर आधारित असे बर्फी व लाडूसह मिठाई उत्पादनाला सुरुवात झाली व ‘चितळे बंधू मिठाईवालें’च्या व्यवसायाला खर्या अर्थाने सुरुवात झाली.

व्यवसायाच्या पहिल्याच टप्प्यात ‘चितळे बंधू मिठाईवाल्यां’चे पुण्यातील पहिले दुकान सुरू झाले. अशा प्रकारे माफक स्वरूपात दूध व मिठाईच्या व्यवसायाची सुरुवात करणार्या ‘चितळे मिठाईवाले’ उद्योगसमूहाचा गोड व चविष्ट व्यवसाय घरोघरीच नव्हे, तर देश-विदेशात पोहोचला ही चितळेंची सर्वांत मोठी उपलब्धी ठरली.

‘चितळे बंधू मिठाईवाल्यां’च्या व्यावसायिक प्रयत्नांमधील इंद्रनील व केदार या व्यवसायातील सध्याच्या व तिसर्या पिढीतील चितळे बंधूंचे प्रयत्न आणि प्रयोगशील व सातत्यपूर्ण आणि दर्जेदार प्रयत्नांचे मोठे योगदान ठरले आहे. यादरम्यान त्यांना वाढत्या व्यवसाय स्पर्धेपासून अत्याधुनिक तंत्रज्ञान, अद्ययावत प्रक्रिया, ग्राहकांच्या पसंतील सातत्याने उतरणे इत्यादी आव्हांनावर सातत्याने मात करावी लागले.

याशिवाय बदलती पिढी, त्यांची बदलती चव आणि अपेक्षा, महाराष्ट्रातील ग्राहकांशिवाय अन्य प्रांतीयच नव्हे, तर नव्याने व मोठ्या संख्येत विदेशात जाणार्या व तिथे स्थायिक होणार्या मोठ्या संख्येतील युवा पिढीच्या चविष्ट अपेक्षांची उभयतांनी पूर्तता केली, हे विशेष!

तसे पाहता, चितळे समूहातील व्यवस्थापनाची धुरा सांभाळणार्या प्रत्येक पिढीला त्या-त्या परिस्थितीनुरूप व काळानुरूप बदलत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. या आव्हानांमध्ये नवी उत्पादने, उत्पादन प्रक्रिया व अद्ययावत तंत्रज्ञान, नवी विक्री व्यवस्था, ठराविक पद्धतीने व वेळेत करावी लागणारी कच्चा माल ते उत्पादित सामानाची ने-आण व या सार्या व्यवहारांना आर्थिक व व्यवसायिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यामध्ये सातत्य राखणे इत्यादी आव्हाने नित्याची व प्रमुख होती.

चितळेंच्या दूध व मिठाई उत्पादनाला फरसाणसह चविष्ट उत्पादनाची जोड मिळाली ती १९६६ साली. याने चितळेंच्या व्यवसायाला मोठा व वेगळा आयाम मिळाला. मिळणारा प्रतिसादा व वाढता व्यवसाय लक्षात घेता, १९८९ सालापासून त्यांनी यांत्रिक पद्धतीने फरसाण निर्मितीस सुरुवात केली. याच्याच पुढच्या यशस्वी टप्प्यात म्हणजे १९९७ सालापासून ‘चितळे बंधूं’नी आपले सर्वच प्रकारचे उत्पादन अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित सुरू केले.

त्यापाठोपाठ चितळेंच्या विक्री केंद्रांची संख्या ५० हून अधिक झाली. मिठाईचे पदार्थ हे तुलनेने लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे त्यांची चव आणि दर्जा दोन्ही टिकवून ठेवतानाच, त्यांची योग्य प्रकारे हाताळणी व वाहतूक याशिवाय ‘कोविड’सारख्या वैश्विक संकटांवर आम्ही यशस्वीपणे मात करू शकलो, याचा आवर्जून उल्लेख केदार चितळे करतात.

याशिवाय ग्राहकांच्या वाढत्या व बदलत्या चविष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी ‘चितळे मिठाईवाले’ व्यवसायातील कर्मचार्यांच्या सूचना, कल्पनांची सांगड घालतात व त्याद्वारे ‘चितळे बंधू मिठाईवालें’चा व्यवसायाचा व्यापही सतत वाढता राहिला आहे.

दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६



'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121