मुंबई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर गुरुवारी विधानसभेत आणि माध्यमांसमोर हंगामा करणारे भास्कर जाधव अखेर नरमले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. यावर भास्कर जाधव यांनी सभागृहात माफी मागितली.
भास्कर जाधव म्हणाले, “मी सभागृहाला आणि सर्वांना नम्रपणे विनंती करतो. काल उपमुख्यमंत्र्यांचे भाषण मी शांतपणे ऐकत होतो. गेल्या ४-५ वर्षांपासून मी सभागृहात नियमांचा आग्रह धरतो, परंतु आकांडतांडव करत नाही किंवा कोणावर ओरडत नाही. पण माझ्या बोलण्यात सत्ताधारी बाकांकडून जाणीवपूर्वक अडथळे आणले जातात. मला बोलताना अनेक कमेंट्सचा सामना करावा लागतो, याला मर्यादा असायला हवी. मी घरी जाऊन माझे वक्तव्य पाहिले आणि मला खेद वाटला. मी तसे बोलायला नको होते. सभागृह नियमाने चालावे यासाठी मी आग्रही आहे, पण माझ्याकडून अशी चूक होऊ नये, असे मला वाटते. मी सभागृहाची माफी मागतो”, असे जाधव म्हणाले.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “काल सभागृहाबाहेर विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अश्लील हातवारे करत टीका केली. यासंबंधीचे गंभीर व्हिडिओ आम्ही पाहिले. अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यास ती बोकाळेल आणि सभागृहाच्या परंपरा, नियम व आदराला बाधा पोहोचेल. संबंधितांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी.”
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “सभागृहात आणि बाहेर सदस्यांचे आचरण कसे असावे, हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे सभागृहाबरोबरच मतदारसंघाप्रती जबाबदारी लक्षात घेऊन यापुढे वर्तन ठेवावे”, असे आवाहन त्यांनी केले.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.