मुंबई, रायगड किल्ला ज्या ‘निजामपूर ग्रामपंचायती’च्या हद्दीत येतो, त्या ग्रामपंचायतीचे नाव आता ‘रायगडवाडी ग्रामपंचायत’ असे करण्यात आले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराचे निर्देश दिले. या निर्णयास ग्रामपंचायत विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
मंत्री गोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी डोंगरावरील असलेल्या पुरातन किल्ल्याची पुनर्बांधणी करून बळकट रायगड दुर्गाची उभारणी केली, स्वराज्याची राजधानी स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध स्वार्यांचा आणि विजयाचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला, तसेच या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. याच प्रचंड दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे.
तसेच या ठिकाणी सुप्रसिद्ध आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले श्री जगदीश्वराचे मंदिर आहे. हा ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला दुर्दैवाने ‘निजामपूर’ नावाच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पराक्रम या विचाराची सुसंगत असे नाव ग्रामपंचायतचे असणे आवश्यक आहे. त्यानुसार निजामाच्या जुनी राजवटीचा अंत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, या घटनेचा साक्षीदार असलेला रायगड किल्ल्याचा क्षेत्राचा ‘निजामपूर ग्रामपंचायत’ याचे नावांत पालट करून ‘रायगडवाडी ग्रामपंचायत’ असे करण्यात यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल कुल यांनी निवेदनाद्वारे आग्रही लेखी मागणी केलेली होती.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.