...म्हणूनच संघ सदैव वर्धिष्णू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019   
Total Views |



राष्ट्रीय भावना म्हणजे काय? राष्ट्रीय भावनेचा ऱ्हास झाला किंवा ती शिथिल झाली तर काय? ज्या भूमीत आपला जन्म झाला, जिथल्या संस्कृतीच्या वा ऐतिहासिक वारशामध्ये विविधता असली तरी मूळ गाभा एकच आहे, त्या भूमीच्या, तिथल्या नागरिकांच्या सार्वभौमत्वाचे, स्वातंत्र्याचे रक्षण करणे व तसे वाटणे, याला राष्ट्रीय भावना म्हणता येईल अन् याच राष्ट्रीय भावनेचा ऱ्हास झाला, ती शिथिल झाली तर काय होते याचा अनुभव आपण जवळपास बाराशे वर्षे घेतला. जगातली अशी कोणतीही आक्रमक जमात नसेल जिने आपल्या खंडप्राय देशावर हल्ला केला नाही, लूटपाट केली नाही, मंदिरांचा-वास्तूंचा विध्वंस केला नाही, कोट्यवधी स्त्री-पुरुष-बालकांच्या कत्तली केल्या नाही... जो जो कंगाल-कफल्लक असे, तो तो भारतात येई आणि इथून धनसंपत्तीसह मुली-लेकींनाही उचलून नेई! मीर कासिमपासून सुरू झालेल्या इस्लामी घुसखोरांच्या आक्रमणाने तर भारताचे लचकेच तोडले. सोबतच हिंदू धर्म संपविण्याचेही आटोकाट प्रयत्न केले. मूठभर ब्रिटिशांनीही भारतातल्या कोट्यवधी लोकांवर निरंकुश सत्ता गाजवली. परंतु, स्वतःच्या वतनाच्या, जहागिरीच्या तुकड्यासाठी आपापसातच लढून मरण्यात धन्यता मानणाऱ्यांनी एकदिलाने कधीही परकियांचा प्रतिकार केला नाही. हे सर्व राष्ट्रीय भावनेचा लोप झाल्यानेच ना? केवळ स्वतःपुरते पाहिल्यानेच ना? आज या गोष्टींची चर्चा करण्याचे कारण म्हणजे रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची तिथीनुसार जयंती. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या संघाचे ध्येय-राष्ट्रीय भावनेचा हुंकार करत ती प्रत्येकाच्या मनामनात चेतवणे हे होय. इथल्या समाजात राष्ट्रीय भावनेचा अभाव निर्माण झाला आणि राज्यकर्त्यांनीही राष्ट्रीय भावनेकडे गांभीर्याने पाहिले नाही. तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी देशातला हिंदू संघटित झाला पाहिजे, तो शक्तीशाली झाला पाहिजे, हिंदुत्वाच्या एकत्वाची वज्रमूठ झाली पाहिजे, जिच्या नुसत्या अस्तित्वानेच कोणी भारताकडे, या हिंदूराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहणार नाही, याच उद्देशाने डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली. संघाच्या स्थापनेपासूनच शाखेच्या आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी याच राष्ट्रीय भावनेचे सिंचन केले. परिणामी, आज संघाच्या बरोबरीने सुरू झालेल्या अनेक संस्था, संघटना वा पक्ष कालबाह्य झालेले दिसतात तर संघ सदैव वर्धिष्णूच राहिला.

 

सामाजिक समरसतेचा वसा

 

संघावर विरोधकांनी शेकडो आरोप करूनही, सातत्याने टीका होऊनही संघ सदैव वर्धिष्णूच कसा राहिला? तर डॉ. केशव बळीराम हेडगेवार म्हणजेच आद्य सरसंघचालकांनी दिलेल्या विचारमौक्तिकांमुळेच! संघाच्या विचारधारेत राष्ट्रीय भावनेला सर्वोच्चस्थानी मानले जाते व त्यापुढे सर्वच भेदाभेद गळून पडतात. जात-पात, धर्म-पंथ, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा कोणताही फरक न करता आपण सर्व भारतमातेचे पुत्र ‘परम वैभवम् नेतुमेत स्वराष्ट्रम्’च्या उद्देशानेच कार्यरत आहोत, हा विचार प्रत्येक स्वयंसेवक मनी बाळगतो. डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, त्यावेळची आणि आताची परिस्थिती यात बरीच भिन्नता आहे. तेव्हा भारत पारतंत्र्यात होता आणि भारतीय हिंदू समाजात जातीपातीचे प्रस्थ बरेच मोठे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘मला काय त्याचे?’ या लेखनात हिंदू समाजातल्या जातीभेदाचे अतिशय विदारक चित्रण पाहायला मिळते. अशा हिंदू समाजाला एका सूत्रात गुंफणे मोठे जिकिरीचे काम, पण ते डॉक्टरांनी आपल्या हाती घेतले. सामाजिक समरसतेच्या माध्यमातून ‘जो जो हिंदू, तो तो बंधू’ हा भाव प्रत्येकाच्या हृदयात जागवला. म्हणूनच समाजात उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्यांपासून ते गावकुसाबाहेर राहणाऱ्या सर्वांनाच संघात मुक्त प्रवेश होता. संघ स्वयंसेवकांनी आपल्या कार्याच्या, प्रकल्पांच्या माध्यमातून तर आज सामाजिक समरसतेचा वस्तूपाठच निर्माण केल्याचे ठिकठिकाणी दिसते. परंतु, ज्यांना संघावर टीका करून आपण फार मोठा तीर मारल्याचे वाटते, त्यांना हे कधीही दिसत नाही. असे असले तरी सर्वसामान्य जनतेपर्यंत मात्र या गोष्टी पोहोचत असतातच. कोणाचाही द्वेष वा मत्सर न करता आपण सर्व सन्मानाने एकत्र राहू शकतो, हा विश्वास आज संघस्वयंसेवकांनी निर्माण केल्याचे यातून दिसते. संघाच्या वर्धिष्णू असण्यामागे याच सामाजिक समरसतेच्या, एकात्मतेच्या विचारांचे आणि व्यक्तित्वांचे कारण आहे. देशात आजही जातीच्या नावाने आपले हितसंबंध जपणारा एक वर्ग आहे, जो स्वतःला जातीनिर्मूलक म्हणतो. परंतु, प्रत्यक्षातली वर्तणूक नेमकी विरोधीच असते. ‘भारत विखंडन शक्ती’ असेही या लोकांना म्हटले जाते. मात्र, त्यांच्या हेतूंची पूर्तता कधीही होऊ शकत नाही. तसेच या लोकांच्या संघकार्य विरोधालाही कधी फळ मिळू शकत नाही. कारण, संघस्वयंसेवकांनी घेतलेला सामाजिक समरसतेचा वसा. जो की सर्वांना एकत्रही करेल, राष्ट्रीय भावनाही जागवेल आणि सर्व भेदही मिटवेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@