"ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी! राजकारण कराल तर..."; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?
27-Jun-2025
Total Views | 64
मुंबई : ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी आहेत. राज्यात मराठी ही अनिवार्य असून हिंदी भाषेची सक्ती नाही. त्यामुळे जो कुणी यावर राजकारण करेल त्याला आम्ही राजकीय उत्तर देऊ, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. येत्या ५ जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एकत्रित मोर्चा काढणार आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "हा त्यांचा प्रश्न आहे. मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. या राज्यात फक्त मराठीचीच सक्ती आहे. भारतीय जनता पक्ष मराठीसाठी कट्टर आहे. मराठीची आग्रही आहे. भाजप आणि केंद्र सरकारमुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शैक्षणिक व्यवस्थेत त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थांचे हित आहे. त्यामुळे हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे किंवा अजून कुणी हे गैरसमजाचे बळी आहेत. गैरसमजाला बळी पडून अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक गैरसमज पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावे. मराठी ही अनिवार्य असून हिंदी भाषेची सक्ती नाही. तर हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे. आम्ही मराठी भाषेचे समर्थक आहोत पण हिंदुस्थानी भाषांचे खूनी नाहीत," असे ते म्हणाले.
"२०२२ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे त्रिभाषा सूत्रीचा स्विकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेली आहे. त्या त्रिभाषेतील हिंदी हा तज्ञांचा रिपोर्टसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच आलेला आहे. हे उद्धवजींनी लक्षात ठेवावे. त्रिभाषा सूत्री आणि हिंदीची अनिवार्यता हा शिक्षण आयोग, शिक्षण तज्ञ आणि शिक्षण मंत्रालयाचा अहवाल १९६८ साली काँग्रेसचे सरकार असतानाचा आहे. ते आज उद्धवजींचे मित्र आहेत. काँग्रेसचे जे नवनवीन अध्यक्ष झालेत त्यांनासुद्धा याचा अभ्यास नसल्याने ते पळवाट काढत आहेत. तसेच राज ठाकरेंच्या पक्षाने हे समजून घ्यावे की, पाचवी, सहावी, सातवीला हिंदी अनिवार्य करण्याचा काँग्रेसच्या निर्णयावर उद्धवजींनी कुठलाही विचार केला नाही. पाचवी, सहावी, सातवीला असलेली हिंदीची अनिवार्यता काढून ऐच्छिक आणि पर्याची भाषा देण्याचा निर्णयही आम्हीच घेतला आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमजाचे बळी आहेत," असेही ते म्हणाले.
संजय राऊतांची तेवढी औकात नाही!
"संजय राऊतांनी अमित शाह यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची औकात नाही. संजय राऊतांचे आका असलेल्या काँग्रेसने त्रिभाषा सूत्री घातली आहे. तुम्ही ज्यांचे पाय चाटता त्या काँग्रेसने हिंदीची अंमलबजावणी केली आहे. तुम्ही ज्यांची तळी उचलता त्या तुमच्या उद्धवजींनी त्रिभाषेत हिंदीचा विचार करण्याचे सूत्र स्विकारले आहे. तुम्ही ज्यांची तळी धरता त्या शरद पवारांनीसुद्धा त्यावेळी याला विरोध केला नाही. त्यामुळे संजय राऊतच मराठी भाषेचे दुश्मन आहेत. बेअक्कलपणाने विधान करणे हा संजय राऊतांचा स्वभाव आहे," अशी टीकाही मंत्री आशिष शेलार यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "मराठी माणसासमोर, मराठी साहित्यिकांसमोर भाजप आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठी सक्तीची असून हिंदी पर्यायी आहे. त्यामुळे जो कुणी यावर राजकारण करेल त्याला आम्ही राजकीय उत्तर देऊ," असा इशाराही त्यांनी दिला.