कथा भ्रमाची (पूर्वार्ध)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |


आपल्याला सर्वसाधारणपणे उत्पत्ती, स्थिती आणि संहार एवढीच विश्वाची ओळख असते. या जगातील दिसणारी, अनुभवाला येणारी प्रत्येक वस्तू विघटनशील असते हे आपण पाहिले. वस्तूचे विघटन होते म्हणजे ती नाश पावते, असे आपण समजतो. परंतु, परब्रह्म अविनाशी असते. ते पूर्वी होते, आता आहे आणि विश्वसंहारानंतरही तसेच राहणार आहे. त्यात काहीही बदल संभवत नाही.

 

अशा अविनाशी शाश्वत परब्रह्माची ओळख संतांनी करून घेतलेली असते. त्याला जाणण्यासाठी विचारांचे मार्गक्रमण करीत असताना ज्या मार्गाने जावे लागते, ज्या वातावरणातून जावे लागते, त्याला ‘भ्रम’ असे म्हणतात. या भ्रमाची संकल्पना नीट समजून घेतल्याशिवाय परब्रह्माचा अनुभव घेता येत नाही, असे संतांचे सांगणे आहे. तो अतींद्रिय अनुभव घेणे हेच खर्‍या अर्थाने मानवी जीवनाचे ध्येय आहे. हे दृश्य जगत विघटनशील असल्याने ते केवळ भासात्मक आहे, तो भ्रम आहे हे ज्ञानी पुरुषांनी जाणलेले असते. आपल्या अंगी असलेल्या विवेकाने या पुरुषांनी भ्रम नाहीसा केलेला असतो. या भ्रमाची संकल्पना नीट समजून सांगण्यासाठी समर्थांनी दासबोधात ‘भ्रम निरूपण’ नावाचा स्वतंत्र समास समाविष्ट केला आहे.  (दशक १०, समास ६)

 

सर्वसाधारणपणे ‘ज्ञान’ आणि ‘अज्ञान’ या दोन कल्पना आपल्याला चांगल्या माहीत असतात. त्यांची व्याख्या तर्कशास्त्रात मोठ्या मजेशीर पद्धतीने केलेली असते. ‘ज्ञानाचा जेथे अभाव असतो ते ‘अज्ञान’ समजावे आणि अज्ञानाचे निराकरण करणे म्हणजे ‘ज्ञान.’ परंतु, शुद्धज्ञान समजण्यासाठी संतांना शरण जावे लागते. तेच आपल्याला विविध दृष्टांतांच्या साहाय्याने शुद्धज्ञानाचा मार्ग दाखवतात. परंतु, समर्थ ‘ज्ञान’ आणि ‘अज्ञान’ या संकल्पनांपर्यंत न थांबता वेगळा विचार करतात. वस्तू आहे तशी न ओळखणे हे अज्ञान आहे. ते एकवेळ परवडले. परंतु, वस्तू जशी नाही तशी ती आहे असे वाटणे हे घात करणारे आहे. याला समर्थांनी ‘विपरित ज्ञान’ अशी संज्ञा दिली आहे. ‘विपरित ज्ञान’ म्हणजे काय हे सोप्या शब्दांत मांडायचे, तर वस्तू मुळात आहे तशी न पाहता आपली कल्पना त्यावर लादून ती वेगळ्या प्रकारे पाहणे आणि विवेक न बाळगता तेच खरे आहे, असे सांगणे याला ‘विपरित ज्ञान’ म्हणता येईल. बरेच वेळा असे दिसून येते की, काही माणसे स्वार्थी हेतूने किंवा ‘माझेच खरे’ या अहंकाराने विपरित ज्ञान हेच खरे ज्ञान आहे असे सांगत सुटतात. अर्थात, असा माणूस त्याच्या विपरित ज्ञानाची खरे ज्ञान म्हणून तरफदारी करू लागला की विवेक त्याच्यापासून दूर गेलेला असतो. अशा विवेकहीन विपरित ज्ञानामुळे भ्रम उत्पन्न होऊन तो वाढत जातो. याची कल्पना या भ्रमिष्ट लोकांना नसते. या जगात भ्रमिष्टांना तोटा नाही. विवेक सांभाळून जो खर्‍या ज्ञानाचा अभ्यास करतो त्याला समर्थांनी ‘उमजलेला’ असे संबोधले आहे. असे उमजलेले फार थोडे असतात. समर्थ म्हणतात,

 

बहुत भ्रमिष्ट मिळाले ।

त्यात उमजल्याचे काय चाले ।

सृष्टीमधें उमजले ।

ऐसे थोडे ॥ (दा.बो. १०.६.६)

 

याचा अर्थ समर्थांच्या मते, सार्वमताला नीट पारखता आले पाहिजे. या उमजल्या पुरुषाचे वर्णन करायचे, तर तो महापुरुष भ्रमापासून वेगळा झालेला असतो. प्रपंचात आणि आध्यात्मिक मेळाव्यात विविध भ्रम माणसाला फसवतात. पण ते भ्रम त्याला सोडवत नाहीत. काही लोक तर या भ्रमांचे भांडवल करून स्वतःचा बडेजाव वाढवीत असतात. अशांतून भोंदू साधू, भोंदू माणसे तयार होतात. भ्रम किती पसरला आहे हे सांगण्यासाठी समर्थ प्रपंचातील, व्यवहारातील अनेक दृष्टांताचा, कल्पनांचा उपयोग करतात. समर्थ म्हणतात,

 

आता भ्रमाचा विचारू ।

अत्यंतचि प्रांजळ करूं ।

दृष्टान्तद्वारें विवरूं ।

श्रोतयांसी ॥

 

स्वामींचे अनुभवविश्व अफाट आहे. त्यांनी १२ वर्षे पायी फिरून सारा हिंदुस्थान उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या मनाने पाहिला आहे. भ्रमाच्या ज्या तर्‍हा त्यांनी या समासात सांगितल्या, त्या त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या असाव्यात. भ्रमाचे अनेक प्रकार त्यांनी या समासात सांगितले आहेत. आपणही अनेक व्यावहारिक भ्रम पाहिलेले असतात, अनुभवलेले असतात. स्वामींनी ते सरळ सांगायला सुरुवात केली. तथापि त्यांचे काही गट करून पाहू म्हणजे ते समजण्यास मदत होईल.

 

. दृष्टिभ्रम : हे दृष्टिभ्रम साधारणपणे आपल्या परिचयाचे असतात. जे प्रत्यक्षात आहे तसे न दिसता आपल्या डोळ्यांना ते वेगळे भासते. वेगवान गाडीतून बाहेर पाहिले तर दूरवरची झाडे उलट दिशेने पळतात असा भास होतो. आकाशात चंद्रबिंबाजवळून मोठे ढग वेगाने जात असतील तर चंद्र वेगाने फिरतोय, असा भास होतो. वस्तूची स्थिती आहे तशी न दिसता वेगळ्या स्थितीत भासणे हा दृष्टिभ्रम. शांत पाणी काच आहे, असे वाटून पाण्यात पडणे हे भ्रमामुळे होते. प्रत्यक्ष सभेपेक्षा आरशात दिसणारे सभेचे प्रतिबिंबच खरे आहे असे वाटणे. हे सारे भ्रम आहेत. अंधुक प्रकाशात वेडीवाकडी पडलेली दोरी एकदम पाहून साप असल्याचा भास होतो हाही भ्रमच. लाकडी ओंडका पाहून ते भूत आहे असे वाटणे हा भ्रम.

 

. ऐकीव गोष्टींवर विश्वास : कोणी काही बोलला, तर ते ऐकून ते सत्य आहे अशी कल्पना करून लोक अस्वस्थ होतात. त्याचा पडताळा न पाहता अविवेकाने ऐकलेली बाब सर्वकाळी, सर्ववेळी खरी आहे असे मानतात, हा भ्रम आहे. बरेच वेळा त्यांना ऐकीव गोष्टींचा घोर लागतो. शकुन-अपशकुनाबद्दल अनेक प्रवाद प्रचलित आहेत. अमूक घडले म्हणजे अपशकून असे ऐकल्यावर लोक तेच मनात घोळत बसतात. कोणी किडमिड्या ज्योतिषाने भविष्यात असे घडणार आहे, असे सांगितल्यावर लोक मनात धास्तावून जातात. हे सारे भ्रमच. विवेकाने, विचाराने अशा भ्रमांचा निरास करता येतो.

 

. रूढ समजुती : समाजातील रूढ समजुतींवर आधारित या भ्रमाचा विस्तार खूप मोठा आहे. माणसाची कल्पनाशक्ती अफाट असते. तथापि स्वामींनी काही भ्रमकल्पना निरूपणासाठी मांडल्या आहेत. त्या सांकेतिकपणे मांडल्या आहेत. (अल्पसंकेते बोलिला । कळावया कारणें) स्वामींच्या काळच्या काही रूढ समजुती आजही समाजात टिकून आहेत. या संदर्भात स्वामींनी सांगितलेली काही उदाहरणे पाहणे उचित ठरेल. समाजात अशी समजूत आहे की, या जन्मी आपण जे दुसर्याला देऊ ते पुढील जन्मी आपल्याला दुपटीने मिळणार आहे. यात स्वार्थी विचार आहे, निरपेक्ष दानाचा विचार नाही. हा एक भ्रम आहे. मेलेली व्यक्ती स्वप्नात आली, तिने स्वप्नात काही मागितले तर तेच सारखे मनात घोळत राहणे, अशा स्वप्नाने अस्वस्थ होणे, हे रूढ समजुतीमुळे घडते. पण हा भ्रम आहे. आणखी एक समज सर्वत्र रूढ आहे तो असा. जीव जन्माला येण्यापूर्वीच ब्रह्मदेव त्या जीवाचे भविष्य त्याच्या कपाळावर लिहून ठेवतो. नंतर मुलाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी सटी किंवा सटवई तेथे येऊन ते भविष्य वाचून जाते. हा समज इतका पक्का आहे की, अनेक घरांतून मुलाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी कागद-लेखणी यांची पूजा करून ते सटवईसाठी नवजात बालकाच्या पाळण्याजवळ ठेवले जाते. त्याला ‘पाचवी पुजणे’ असे म्हणतात. अर्थात, हा सारा भ्रम आहे असे स्वामी सांगतात. अनेक तीर्थयात्रा केल्या, तर पुण्यसंचय वाढून देवदर्शन होते आणि काय पाहिजे ते देवाजवळ मागता येते. पण हासुद्धा भ्रमच आहे. कारण, मनात ‘देव’ कल्पना स्पष्ट नसताना उगीच तीर्थांना जाऊन भटकण्याने कष्ट होतात. पदरी काही पडत नाही. हा कित्येकांचा अनुभव आहे. स्वामींच्या शब्दांत सांगायचे तर -

 

तो अंतर्देव चुकती ।

धावा घेऊन तीर्था जाती ।

प्राणी बापुडे कष्टती ।

देवास नेणता ॥

मग विचारिती अंतःकरणी ।

जेथे तेथे धोंडा-पाणी ।

उगेचि वणवण हिंडोनी ।

काय होते ॥

 

सर्व तीर्थांत धोंडा-पाणी या सामान्य गोष्टी आहेत. त्यापासून समाधान मिळणार नाही, वाया कष्ट मात्र जातील. स्वामींनी या प्रकाराची आणखीही उदाहरणे समासात दिली आहेत. परंतु, येथेच थांबून भ्रमाचे आणखी प्रकार पुढील लेखात पाहू.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@