एकनाथांच्या षष्ठीचं श्रेष्ठत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |



सकल संतांच्या मांदियाळीमध्ये एकनाथ महाराज विशेषत्वाने उठून दिसतात. एकनाथ महाराज म्हटलं की, अत्यंत ज्ञानी, विनम्र, परोपकारी, प्रेमळ, प्रशांत असं रूप समोर येतं. मूळ नक्षत्रावर इ. स. १५३२ मध्ये पैठण क्षेत्री या दिव्य रत्नाने भानुदासांच्या कुळामध्ये जन्म घेतला. खरंतर मूळ नक्षत्र वाईट मानलं जातं. परंतु, एकनाथांचं संपूर्ण आयुष्य सूर्याप्रमाणे तेजस्वी होतं. एक गोष्ट मात्र घडली की, त्यांच्या जन्मानंतर त्यांचे माता-पिता लवकर वारले. आजी-आजोबांवर एकनाथांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आली. रोज स्नानसंध्या, नैवेद्य, वैश्वदेव, भजनपूजन, पुराणकीर्तन आणि अतिथींचा सत्कार नियमाने करणारं हे पवित्र कूळ! या कुळाचे उत्तम संस्कार छोट्या एकनाथांवर झाले. त्यामुळे त्यांचा मूळचा सात्विक पिंड अधिकच सात्विक झाला.

 

भगवंताच्या भक्तीची, त्याच्या दर्शनाची ओढ अनावर झाली. थोर दत्तभक्त असलेल्या सद्गुरूंच्या शोधात एकनाथ निघाले. त्यांना जनार्दनस्वामी भेटले. तेच त्यांचे सद्गुरू. दौलताबादचे मुख्य अधिकारी असलेले, निजामशहाच्या दरबारात विशेष स्थान लाभलेले, प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयांचा स्वरूप साक्षात्कार झालेले जनार्दन स्वामी! मुस्लीम राजवटीमध्ये असूनही ‘दत्तप्रभूंच्या गुरुवारी’ कामकाजाला सुट्टी असणं, हे केवढं वैशिष्ट्य! उत्तम प्रपंच आणि उत्कट परमार्थ यांचा सुरेख संगम जनार्दनस्वामींच्या चरित्रात आढळतो. आपल्या सद्गुरूंची सेवा करणारे नाथ.. सद्गुरूंच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणारे! शूलीभंजन या डोंगरावर तपश्चर्या करणार्‍या नाथांच्या मस्तकावर प्रत्यक्ष शेषाने फणा धरून सावली केली. नाथांनी तीर्थयात्रेची सद्गुरूंची आज्ञा पाळली. शिष्याअंगी अखंड अनुसंधान व निर्लेपता हे गुण प्रगटल्यावर जनार्दनस्वामींनी शिष्याला दत्तदर्शन घडवले.

 

षष्ठी तिथीचं एकनाथांच्या जीवनात फार महत्त्व! याच तिथीला अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजे नाथांचे सद्गुरू जनार्दनस्वामींची जन्मतिथी! याच तिथीला जनार्दनस्वामींना दत्तात्रेयांनी दर्शन देऊन धन्य केले. एकनाथ महाराजांना अमूल्य अशा अनुग्रहाची प्राप्ती षष्ठीलाच झाली. याच तिथीला जनार्दनस्वामींनी देह ठेवला. चार मौल्यवान घटना घडलेली तिथी षष्ठी! दत्तभक्तांच्या दृष्टीने ही तिथी महत्त्वपूर्ण मानली जाते. दौलताबाद शहर दत्तभक्तीमुळे पवित्र होऊन गेलं. नाथांसारखा अंतरंगातील शिष्य लाभला. सद्गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त असे एकनाथ महाराज! सातत्याने आपल्या सद्गुरूंची प्रतिष्ठा वाढविणारं वर्तन करणारे एकनाथ. सद्गुरूंचा आदर्श समोर ठेवून उत्तम प्रपंच आणि उत्कट परमार्थ करणारे एकनाथ आणि त्यांना उत्तम साथ देणार्‍या गिरीजाबाई. ‘वसुधैव कुटुंबकम्‘ या वृत्तीने जगणारं हे दाम्पत्य!

 

सगुणाची उपासना करणार्‍या, आल्यागेलेल्यांना अन्नदान, नित्य नामस्मरण यामुळे घराचे मंदिर झाले. गरिबांचे आधारस्थान झाले. संकटाने ग्रस्त असणार्‍यांचे आशास्थान बनले. नित्य ग्रंथावर निरुपण, रात्री कीर्तन करणार्‍या एकनाथांजवळ भक्तांचा समुदाय तयार होणं स्वाभाविक आहे. नित्य पूजा-पाठ, वाचन-लेखन करून परोपकारार्थ व परमार्थाकरिता काया-वाचा-मने झिजणारे, झटणारे एकनाथ महाराज! भागवतासारखा महान ग्रंथ प्राकृत मराठीमध्ये लिहून सामान्य लोकांवर उपकार करणारे एकनाथ. ‘भावार्थ रामायण’ लिहिणारे एकनाथ. एकनाथांची भक्ती बघून प्रत्यक्ष भगवंत (श्रीकृष्ण) श्रीखंड्याच्या रूपाने सेवा करण्यासाठी आला. भगवंताची ही अवस्था तर सामान्य लोकांची काय अवस्था?

 

जो सद्गुरूंची मनोभावे सेवा करतो, त्यांच्या आज्ञेचं पालन करतो, तो सद्गुरू आणि भगवंताच्या कृपावर्षावात चिंब भिजतो. जो जनतेमध्ये, सृष्टीमध्ये जनार्दनाला बघतो ना, त्याला भगवंत अखंड भेटतो. जो अखंड नामस्मरण, भजन, निरुपण, कीर्तन यामध्ये रममाण होतो ना, तो भगवंताचा लाडका भक्त होऊन भगवंतच त्याच्या सान्निध्यामध्ये संगतीमध्ये येतो. भगवंताला अशा भक्ताशिवाय वैकुंठामध्ये चैन पडत नाही. एकनाथ महाराज व भगवंत यांचं ऐक्य अलौकिक होय.

 

एकनाथ महाराज लिहितात-

ऐसा तूं सर्वांचा हृदयस्थ।

सर्ववंद्यत्त्वे अतिसमर्थ।

जाणसीं हृदयींचा वृत्तांत।

स्वामी कृपावंत दीनांचा॥

एकनाथ महाराज आपल्या गुणांचं, कार्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाहीत तर भगवंताकडे सोपवतात.

तुझिया कृपा तुझे भक्त।

सुखसंपन्न अतिसमर्थ।

संसारी असोनि विरक्त।

हे नवल एथ नव्हे देवा ॥

भगवंताप्रमाणे ते आपले सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने काय प्राप्त होतं, ते सुरेख शब्दांत सांगतात-

जाहलिया सद्गुरू कृपादृष्टी।

साधनें पळतीं उठाउठीं।

ब्रह्मानंदे कोंदे सृष्टी । स्वानंदपुष्टी साधकां॥

 

आनंद, परमानंद, स्वानंद, ब्रह्मानंद अशा चढत्या क्रमाच्या चार आनंदांची प्राप्ती सद्गुरू कृपेमुळे होते. एकनाथांचं संतत्व सर्वांगाने बहरलं. त्या संतत्वाला एकरूपतेची.. ऐक्याची रसदार फळे न आली तर आश्चर्य? शांतीब्रह्म एकनाथांनी षष्ठी अधिकच अधोरेखित केली. त्यांनी याच तिथीला गोदावरीमध्ये आपला देह विसर्जित केला. आपलं कार्य जलसमाधीने सद्गुरूंच्याच तिथीला सद्गुरूचरणी अर्पण केले. सद्गुरूंशी ऐक्य पावलेल्या शिष्योत्तमाचं फाल्गुन वद्य षष्ठीला विशेष स्मरण करणं, हा एक आनंदसोहळा आहे. समस्त शिष्य व भक्त या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन अलौकिक आनंदाची प्राप्ती करून घेऊ शकतात.

- कौमुदी गोडबोले 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@