मुंबई : आदिवासी विकास विभागाचे २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांचे आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार शनिवारी जाहीर झाले. यात महादेव जयराम जोशी उर्फ आप्पा जोशींना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. तलासरी येथील वनवासींच्या कल्याणासाठी व त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
आदिवासी विकास विभागाच्या पुरस्कारांमध्ये ३० जणांना आदिवासी सेवक व नऊ संस्थांना आदिवासी सेवा संस्था पुरस्कार देण्यात आले आहेत. पुरस्कार प्राप्त व्यक्तीला व संस्थेला अनुक्रमे २५ हजार १ रुपये व ५० हजार १ रुपये पुरस्कार म्हणून देण्यात येतात. आदिवासी विकास विभागाने आप्पा जोशी यांना आदिवासी सेवक पुरस्कार देऊन त्यांच्या नि:स्पृह कार्याचा गौरव केला आहे. आप्पा जोशींनी ठाणे परिसरात जल संधारण, कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत, शोषखड्डा असे अनेक प्रयोग राबविले आहेत. यासोबतच त्यांनी साप्ताहिक विवेकची जबादारीही सांभाळली होती. सध्या ते हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या कार्यवाहपदी आहेत.
"या पुरस्कारामुळे वनवासी भागात काम करायचा माझा उत्साह कित्येकपटीने वाढला आहे. शिवाय, माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचादेखील उत्साह वाढला आहे. हा शासनमान्य पुरस्कार असल्यामुळे यापुढे इतरांचेदेखील या कामात सहकार्य वाढेल. या भागांमध्ये 'पाणी आडवा पाणी जिरवा' तसेच वनवासी भागातील शेती यासंदर्भात मी संकल्पना मांडत आलेलो आहे. त्या संकल्पनांना यामुळे चांगली मदत मिळेल. एकूणच गेली ३५ वर्ष मी या भागात काम करत आहे ते काम यापुढे अजून जोमाने करेन एवढा उत्साह आता माझ्यात वाढला आहे." अशा भावना आप्पा जोशी यांनी 'मुंबई तरुण भारत'शी व्यक्त केल्या.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat