
एखादी अंधश्रद्धा समाजामध्ये रुळायला धार्मिक, सांस्कृतिक किंवा मानसिक कारणे असू शकतात (World Snake Day). सापांच्या बाबतीतल्या अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजांपैकी काही उदाहरणांचा शास्त्रीय आणि पर्यावरणीय निकषांवर आढावा घेणे गरजेचे आहे (World Snake Day). सापाला मारले किंवा त्रास दिला, तर तो बदला घेतो, असा एक समज आपल्या समाजात रूढ आहे (World Snake Day). अनेकदा आपल्याला लोकांकडून ऐकायला मिळते की, एक साप मारला गेला होता आणि दुसर्या दिवशी त्याच ठिकाणी परत साप बदला घेण्यासाठी आला. या समाजाची शास्त्रीय बैठक म्हणजे सापांच्या प्रजननाच्या काळात, मादी साप नराला आकर्षित करण्यासाठी आपल्या शरीरातून (फेरोमोन्स) रासायनिक संकेत सोडतात (World Snake Day). या काळात, जर कुठे मादी साप मारला गेला असेल, तर हे फेरोमोन्स त्या परिसरात असू शकतात. त्यामुळे एखादा नर साप मादीला शोधायला तिथे येतो. अशी शक्यता फक्त प्रजननाच्या काळात असू शकते. पर्यावरणीय दृष्टिकोनातून याकडे पहिल्यास या गैरसमजामुळे निष्कारण होणारी सापांची हत्या थांबवण्यास थोडी-फार मदत होऊ शकते. नागमणी हा पूर्णपणे लोकांना ठगवण्यासाठी काही लोकांनी चालवलेला धंदा आहे. कोणताही साप अशा प्रकारचा मणी तयार करू शकत नाही. शास्त्रीयदृष्ट्या याचा विचार केल्यास, असे आढळते की, सापाची कात ही तिच्या खवल्यांच्या आकारामुळे आणि केराटिनच्या द्रव्यामुळे चांगल्या प्रकारे प्रकाशाला परावर्तित करते. बरेचदा साप कात टाकताना आजारी असल्यामुळे किंवा आर्द्रतायुक्त वातावरण कमी असल्यामुळे त्याची कात पूर्णपणे निघत नाही. तिचे तुकडे सापाच्या शरीरावर चिकटून राहतात. अशा तुकड्यांवर जर कोणी अंधारात प्रकाशाचा झोत टाकला, तर तो भाग चमकू शकतो. यामुळेच बहुदा ही नागमणीची कथा सुरू झाली असावी. आपल्या देशात अजूनही सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे किंवा जवळच्या देवळात घेऊन गेले जाते. लोकांचा विश्वास या भोंदू प्रकारावर अजूनही का आहे, याचे कारण खूपच सोपे आणि सरळ आहे. ते कारण म्हणजे अज्ञान. होते काय, जेव्हा दहा लोकांना सर्पदंश होतो, तेव्हा बर्याचशा सापांच्या जाती बिनविषारी असल्यामुळे त्यांपैकी सरासरी पाचजणांना काहीही होणार नसते. उरलेल्या पाचजणांना विषारी साप चावला आहे, तरीपण त्यातील जवळ जवळ अर्ध्याजणांना सापाने चावताना विष सोडलेच नसते. ज्याला ‘ड्राय बाईट’ असेही म्हटले जाते. समजा, उरलेल्या दोघाजणांच्या शरीरात विष गेल्यामुळे त्यांचा प्राण वाचत नाही. अशा वेळी मांत्रिक सांगतो की, त्यांनी खूप पाप केले होते किंवा खूप उशिरा झाला. समाज वाचलेल्या आठजणांना लक्षात ठेवत नाही, उलटपक्षी मेलेल्या दोनजणांना लक्षात ठेवतो आणि हा अंधविश्वास चालत राहतो. सर्पदंश होऊन जर शरीरात विष गेले असेल, तर एकच उपाय म्हणजे जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन प्रतिसर्पविष घेणे. अशा प्रकारचे अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा सापांच्या बाबतीतल्या आपण चांगल्या प्रकारे समजावून दूर करू शकतो.
२०२४ मध्ये केंद्र शासनाने सर्व राज्यांना सर्पदंशाची घटना या ‘नॉटिफिएबल डिसीज’ म्हणून घोषित करण्यासाठी सूचना केली होती. पण महाराष्ट्रात ही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सर्पदंशाविषयी अधिकृत आकडा सरकारी व्यवस्थेतून मिळत नाही. महाराष्ट्राला सर्प संवर्धन आणि प्रतिसर्पविष उत्पादन याचा मोठा वारसा मिळाला आहे. सगळ्यांत जास्त सर्पमित्र हे आपल्या राज्यात आहेत. सर्पदंशमृत्यू कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, प्रतिसर्पविष उत्पादन सगळ्यांत जास्त आपल्याच राज्यात होते. भारतातले सगळ्यांत पहिले प्रतिसर्पविषही १९४५ साली परळच्या ‘हाफकिन संस्थे’त तयार झाले होते. महाराष्ट्र राज्य वनसंवर्धन आणि आरोग्यसंवर्धन दोन्हीमध्ये अग्रेसर आहे, ते मात्र सर्पसंवर्धन आणि सर्पदंशमृत्यू कमी करण्यासाठी आज मागे पडत चालले आहे. फक्त सरकारी पातळीवर नाही, तर आज राज्यात अग्रणी असलेल्या वनसंवर्धन व संशोधन संस्था आणि निसर्गप्रेमी यांनीही हा विषय दुर्लक्षित केला आहे, हीच खरी शोकांतिका आहे.
- केदार भिडे
(लेखक सर्पअभ्यासक असून ते सर्पदंशावर जनजागृती करतात.)
9892599997