कलौ कीर्तन वरिष्ठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
दासबोधातील श्रवणभक्तीचे समर्थकृत वर्णन तसेच श्रवणासंबंधी काही शास्त्रीय माहिती आपण मागील लेखात पाहिली. माणसाने पुष्कळ ऐकले, वाचन केले, अभ्यासले आणि त्यातील सार आत्मसात केले की त्याला वाटू लागते, आपण हे दुसऱ्याला सांगितले पाहिजे. या वृत्तीतून श्रवणानंतर कीर्तन हे स्वाभाविकपणे येते. परमेश्वराची भक्ती करण्याचा हा चांगला मार्ग आहे. स्वामींनी म्हटले आहे की, ‘कलौ कीर्तन वरिष्ठ’ म्हणजे या कलियुगात कीर्तनभक्ती श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे ज्या सज्जनांच्या सभेत भगवंतासाठी गायन चालू असते, तेथे भगवंत उभा असतो असे विष्णूंनी नारदाला सांगितले आहे.
 

नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ।

मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद॥

 

कीर्तन प्रकारात भक्त भगवंताचे गुणगान करीत असतात. भक्तिभावात तल्लीन झालेल्या कीर्तनकाराच्या कीर्तनात भगवंताचा वास असतो. दासबोधातील दशक चार, समास दोन याचे नाव ‘कीर्तन भजन निरूपण’ असे आहे. त्यात कीर्तनभक्तीसंबंधी स्वामींचे विचार सविस्तरपणे पाहायला मिळतात. त्यातील काही विचार सारांशरूपाने पुढे मांडले आहेत. सगुण हरिकथा कशी करावी व त्यासाठी कोणते गुणविशेष कीर्तनकाराच्या ठिकाणी आवश्यक आहेत, याची चर्चा या समासात आहे. कीर्तन करण्यासाठी भगवंताच्या कथांचा ध्यास लागला पाहिजे. कीर्तनातून भगवंताची कीर्ती, प्रताप सर्वत्र गेले पाहिजेत. त्यासाठी सर्वप्रथम खूप पाठांतर करावे, विविध ग्रंथांचा अभ्यास करावा. मुख्य म्हणजे आपल्या आनंदासाठी कीर्तन करायचे आहे. कोणा व्यक्तीला खूश करण्यासाठी कीर्तन नसावे. तसेच यातून चांगली द्रव्यप्राप्ती होईल आणि आपला मानमरातब वाढेल, यासाठी कीर्तन करू नये. कीर्तनात आपल्याला मिळणारा आनंद महत्त्वाचा आहे. भागवत संप्रदायातही मोठे कीर्तन करू नये, असा दंडक आहे. भगवंताला कीर्तन प्रिय आहे, असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचप्रमाणे कीर्तनातील सद्विचार ऐकल्याने श्रोत्यांना आनंद मिळत असतो. यासाठी कीर्तनातून भगवंताचे यश, कीर्ती, प्रताप असा महिमा वर्णन करावा. महिमा वर्णन करताना उत्तमोत्तम शब्दांचा, शब्दपांडित्याचा वापर करावा. याचाच अर्थ भगवंताचा महिमा वर्णन करण्यासाठी आपले वक्तृत्व चांगले असावे. हे झाले कीर्तनातील निवेदन कसे करावे याविषयी मार्गदर्शन. कीर्तन करताना गायनाचा अभ्यास आवश्यक आहे. भगवंताचे यश, कीर्ती, प्रताप गायनातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचे असतील, तर टाळ, मृदुंग इ. संगीत साधनांची गरज असते. त्यांचा अभ्यास हवा. तसेच प्रसंगी भगवद्प्रेमाने धुंद होऊन नृत्यही करायला हरकत नाही. निवेदन, गायन यातून श्रोत्यांचे कान तृप्त झाले पाहिजेत. कीर्तन करीत असताना वक्ता व श्रोता या दोघांनाही कंप, रोमांच, आनंदाश्रू यांचा अनुभव आला पाहिजे. भगवंतासंबंधीचे गायन प्रेमाश्रूंनी भरलेले असावे. यासाठी श्लोक, प्रबंध, अनेक मुद्रा, छंद, वीरश्रीयुक्त भाषण आणि क्वचित प्रसंगी विनोदाचाही वापर करावा.

 

पदें दोहडे श्लोक प्रबंध।

धाटी मुद्रा अनेक छंद।

वीरभाटिंव विनोद।

प्रसंगे करावे॥

(दा. ४.२.१४)

 

मागे एके ठिकाणी स्वामी ‘टवाळा आवडे विनोद’ असे म्हणाले होते. त्या विधानावरून स्वामींवर टीकाकार तुटून पडले. तथापि स्वामींचे हे विधान अधम विनोदाबद्दल होते. कारण, येथे स्वामींनी कीर्तनात विनोदाचा वापर करावा, असे सांगितले आहे. स्वामी विनोदाचे शत्रू होते, ही टीकाकारांनी केलेली ओरड व्यर्थ आहे, हे येथे दिसून येते. कीर्तनकाराला कला अवगत असाव्यात. कीर्तन ही कला असली तरी, कीर्तनकार हा फक्त कलाकार नव्हे. कारण, त्याला कीर्तनातील कथानुसंधानावर लक्ष द्यावे लागते. ताल, मृदुंग, गायन, वीर, हास्य असे रस निर्माण करण्याच्या नादात मुख्य विषयाच्या निवेदनात खंड पडता कामा नये. कीर्तन करताना इतर रसांबरोबर शृंगारिक गद्य-पद्य आले तरी चालेल, पण ते शास्त्राधारे बोलावे, कीर्तनातून भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती, न्याय यांचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी वक्ता अनुभवी असावा. त्याने हे गुण आत्मप्रचितीतून सांगितले पाहिजेत. तरच त्या विचारांची श्रोत्यांवर छाप पडेल. उगीच अघळपघळ बोलून कीर्तनकाराने श्रोत्यांना जेरीस आणू नये. कीर्तनकाराने आपली गुरूपरंपरा लपवून ठेवू नये. काही लोक आपली गुरूपरंपरा सांगताना जातीपातीच्या उच्च-नीचतेवर भर देऊन श्रोत्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे कीर्तनकाराने करू नये. आपली गुरूपरंपरा सांगताना लाजू नये. कीर्तनकाराने ज्ञान, वैराग्य, एकी यांचे रक्षण केले पाहिजे. तसेच चिकित्सक व अभ्यासू वृत्ती सांभाळली पाहिजे. ‘ब्राह्मण्य रक्षावे आदरे’ (दा. ४.२.२०)ही भूमिका ठेवली पाहिजे. या अर्धओवीतील ‘ब्राह्मण’ शब्द नीट न समजल्याने अनेक टीकाकारांनी स्वामींना ब्राह्मणांचा कैवारी ठरवून जातीयवादाचे आरोप केले आहेत. या टीकाकारांना ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण्य’ या शब्दांतील फरक समजला नाही. स्वामींनी ‘ब्राह्मण रक्षावे आदरे’ असे म्हटलेले नाही. वस्तुत: ‘ब्राह्मण’ शब्द सज्जनांच्या ठिकाणी असणारा गुणसमुच्चय दाखवतो. तो गुणसमुच्चय भगवद्गीतेतील १८ व्या अध्यायात आलेल्या ४२ व्या श्लोकात स्पष्ट केला आहे.

 

शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जवमेव च।

ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥

 

शम (मनाचा निग्रह), दम (इंद्रियांचा निग्रह), तप, अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा, क्षमा, सरळपणा तसेच ज्ञान, विज्ञान आणि आस्तिक्यबुद्धी हे ‘ब्राह्मणा’चे स्वभावसिद्ध कर्म आहे. यात जे सांगितले ते ‘ब्राह्मण्य’ आणि त्यांचे रक्षण कुठल्याही काळी समाजाला आवश्यकच आहे, यात संदेह नाही. आद्य शंकराचार्यांनीही वैदिक धर्माची व्याख्या करताना ‘ब्राह्मण्यत्वा’चा उल्लेख केलेला आहे. ‘ब्राह्मणत्वस्य रक्षणेन रक्षित: स्यात् वैदिको धर्म:।’ वैदिक धर्मात ‘ब्राह्मण्यत्वा’चे रक्षण अपेक्षित आहे.

 

कीर्तनकाराने श्रोत्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल, असे बोलू नये. श्रोत्यांचे समाधान भंग पावेल, असे बोलू नये. बोलताना नीती, न्याय, पारमार्थिक साधना यांना कीर्तनकाराने धक्का लावू नये. ही समास ४.२ मधील कीर्तनासंबंधी माहिती सांगून झाली तरी, दशक १४.५ मध्ये पुन्हा कीर्तन व हरिकथा निरूपण हा भाग येतो. या समासात स्वामी सांगतात, कीर्तनकाराने हे लक्षात ठेवावे की, कीर्तन हा काही करमणुकीचा कार्यक्रम नाही. त्यात तारतम्य बाळगावे. एखाद्या देवळात देवाच्या मूर्तीसमोर कीर्तन करायचे असेल, तर ‘सगुणभक्ती’ हा विषय असावा. तेथे संन्यास, वैराग्य या विषयांवर बोलू नये. तसेच समोर सगुण मूर्ती नाही आणि श्रोत्यांमध्ये साधक व अधिकारी व्यक्ती बसलेल्या आहेत, अशावेळी ‘अद्वैत निर्गुणा’चे कीर्तन करावे. परंतु, निर्गुणाचे विवरण करताना सगुण उपासनेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कीर्तन चालू असताना श्रोत्यांमध्ये कोणी श्रीमंत माणूस बसला असेल, तर त्या धनिकाची उगीच स्तुती करू नये. तसेच कीर्तनातून आपल्या प्रतिस्पर्ध्याची निंदा करू नये. नवरसांनी युक्त आणि शृंगारिक वर्णन कीर्तनात करायचे असेल, तर स्त्रियांच्या लावण्याचे, त्यांच्या रुपाचे वर्णन करता कामा नये. स्त्रियांचे रसभरीत वर्णन कीर्तनात केले, तर श्रोत्यांच्या मनात कामविकार जागा होईल. मग अशा कामकारी विकारी मनात ईश्वराचे ध्यान कसे टिकेल? मुळात ज्याला स्त्रीसौंदर्याचे वर्णन करण्यात आनंद आहे, तसेच जो स्त्रीलावण्याच्या भरीस पडला आहे, तो कीर्तनकार स्वत:च ईश्वरतत्त्वापासून दूर झाला आहे, असा कीर्तनकार श्रोत्यांना काय सावरणार? अशा कीर्तनकारांना स्वामींनी पढतमूर्ख म्हटले आहे.

 

वर्णी स्त्रियांचे आवेळ।

नाना नाटके हावभाव।

देवा विसरे जो मानव।

तो येकं पढतमूर्ख॥(दा.२.१०.१९)

 

सवंग लोकप्रियतेसाठी कीर्तनकाराने स्त्रीदेहाचे, स्त्रीसौंदर्याचे वर्णन करू नये. अशाने चित्तवृत्ती चंचल होऊन हरिकथेचा रंग उडून जातो. समर्थांनी ‘चतुर्थमान’ नावाचे प्रकरण लिहिले आहे. त्यात स्वामी सांगतात की, कीर्तनकाराने आपला अभ्यास वाढवला पाहिजे. त्याने ऐहिक व पारमार्थिक दोन्ही अभ्यास केले पाहिजेत. ज्या लोकांना आपण ओळखतो किंवा जे नुकतेच परिचित झालेले आहेत त्या सर्वांना कीर्तनकाराने राजी राखले पाहिजे. त्याने सर्वांशी मृदू भाषेत बोलावे. सामान्य माणसे वागतात तसे इतरांशी कीर्तनकाराने मिळून मिसळून राहावे. स्वतःला मोठ्या योग्यतेचा समजू नये. कीर्तनकार जे ज्ञान सांगतो त्याची त्याला आत्मप्रचिती हवी. प्रत्ययाशिवाय नुसते ऐकीव, शाब्दिक ज्ञान आत्मघातकी असते. अध्यात्माचा अर्थ नीट समजून घेऊन गावे. अर्थ माहीत नसताना नुसते शाब्दिक गाणे म्हणजे, ‘उगेचि भुंकणे खोटे, गधडे भुंकती जसे ।’ पंडितांपुढे बाष्कळ बोलणाऱ्यांची स्थिती अशी असते. स्वामींनी कीर्तनभक्तीची सांगोपांग चर्चा त्यांच्या वाङ्मयात केली आहे. कीर्तनाचा महिमा सांगताना स्वामी म्हणतात,

 

म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा।

कीर्तने संतोषे परमात्मा।

सकळ तीर्थे आणि जगदात्मा । हरिकीर्तनी नसे ॥

(दा. ४.२.३१)

 

- सुरेश जाखडी

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@