रंग 'ति'चा वेगळा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019   
Total Views |
Miss Universe _1 &nb


तुमच्या मते सुंदरतेची व्याख्या काय? असा प्रश्न आपल्याला सहज कुणी विचारला तर एखादे लहान मूलही तेच उत्तर देईल आणि वयोवृद्ध व्यक्तीकडेही त्याच पठडीतले उत्तर तयार असेल. 'सुंदर' म्हणजे दिसायला सुंदर. रंग गोरापान सुबक शरीरयष्टी शोभेल अशी उंची आकर्षक व्यक्तिमत्त्व आदींची मापने मग दिली जातील. 'माणूस मनाने सुंदर असला की तो सुंदर' अशीही बौद्धिक उत्तरे देणारे दिसतील. या सर्व पूर्वग्रहदूषिततेला चपराक देणारा प्रसंग जागतिक पातळीवरील मंचावर नुकताच घडला. इतक्या मोठ्या मंचावर अशी ऐतिहासिक घटना घडली की ज्यामुळे अनेक व्यक्तींना प्रेरणा तर मिळेलच पण समाजातील अनेक घटकांच्या डोळ्यांवरील वर्णभेदाची झापडेही दूर होतील.

 

निमित्त होते अमेरिकेत अटलांटा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मिस युनिव्हर्स २०१९' या सोहळ्याचे. जगभरातील एकूण ९० सुंदरींनी यामध्ये सहभाग घेतला होता. भारतातर्फे वर्तिका सिंह हिचाही सहभाग होता. स्पर्धेची चुरस वाढत होती आणि निर्णायक क्षणी दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने 'मिस युनिव्हर्स २०१९' चा किताब पटकावला. या घोषणेवेळी इतर ८९ स्पर्धक त्यांच्या चाहत्यांचाही भ्रमनिरास झाला असेल हा भाग वेगळा. मात्र या 'मिस युनिव्हर्स' जोजिबिनी टूंजीने सार्‍या जगाची मने जिंकून घेतली.

 

सर्वसामान्यपणे अशा स्पर्धा ज्या ज्या वेळी घेतल्या जातात तेव्हा स्पर्धकांच्या पेहरावापेक्षा त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून त्यांच्या हजरजबाबीपणालाही तितकेच गुण असतात. जोजिबिनी टूंजीलाही असाच एक प्रश्न विचारण्यात आला होता. 'सुंदरतेची व्याख्या काय? त्याचा तुमच्या लेखी अर्थ काय?' त्यावर तिचे उत्तर होते. मी ज्या देशात जन्म घेतला त्या देशात माझ्या रंगानुरुप मला 'सुंदर' म्हटले जात नाही. माझी अशी इच्छा आहे की हा किताब मला मिळावा जेणेकरुन सार्‍या जगाचीच सुंदरतेची व्याख्या बदलेल. माझ्या देशातील अनेकजण मला पाहतील. त्यांना माझ्या हातात या पुरस्काराचे सन्मानचिन्ह पाहून अभिमान वाटेल. ते स्वतःला गौरवान्वित अनुभव करतील




 

 

माझ्यात स्वतःची एक ओळख शोधतील. या उत्तराने जोजिबिनीने अवघं जग जिंकून घेतलं. जोजिबिनीला ज्यावेळी 'मिस युनिव्हर्स'चा मुकुट चढवण्यात आला त्यावेळी तिने सोनेरी गाऊन परिधान केला होता. आपल्या अस्तित्वाची छाप तिने संपूर्ण सोहळ्यावर उमटवली. परिणामी तिच्या विजयानंतर सुंदरतेची व्याख्याच बदलून गेल्याचे जागतिक पातळीवरील प्रतिक्रिया पाहून जाणवले. आपल्या देशातही परिस्थिती फार काही निराळी नाही. केवळ रंगरुपावरुन जोडीदाराची निवड करणार्‍यांची उदाहरणेही आहेतच की. याला अगदी सुशिक्षित वर्गही अपवाद नाही. अनेक लेखकांनी साहित्यिकांनी चित्रपट निर्मात्यांनी असे विषय उत्तमरित्या हाताळले. मात्र समाजाने रंगरुपावरून केली जाणारी भेदाभेदी वृत्ती आजही कायम आहे.

 
 
 



वर्णभेदावरून सुरू झालेल्या आंदोलनांचा लढायांचा भाग वेगळा आणि विषयही निराळा आहे हे समजून घ्यायला हवे. खरं तर समाजात वावरताना रंगाने सावळ्या असणार्‍यांमध्ये तसा एक न्यूनगंड आजही कायम दिसतो. याच न्यूनगंडाला छेद देण्याचे काम जोजिबिनीने केले आणि इतिहास घडला. दक्षिण आफ्रिकेला यापूर्वी दोनदा 'मिस युनिव्हर्स'चा मान मिळाला आहे. मात्र यंदाच्या 'मिस वर्ल्ड २०१९'ने जगाला एक नवी दृष्टी देऊ केली. तिच्यासारख्या अनेक तरुणींना प्रेरणा दिली. या सार्‍या पसार्‍यात सोहळ्यातील समीक्षकांचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे




Miss Universe _2 &nb

 

 


जोजिबिनीने दिलेल्या उत्तरांवर एक नजर टाकल्यास आयुष्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे याची प्रचिती येईल. 'आजच्या पिढीतील तरुणींना काय शिकणे गरजेचे आहे असे तुला वाटते' यावर तिने दिलेले उत्तरही विचार करायला लावणारे आहे. ती म्हणते आजच्या पिढीतील तरुणींनी नेतृत्व गुण शिकणे गरजेचे आहे. सध्याच्या पिढीत ते फार कमी प्रमाणात दिसून येतात. मग ती युवा पिढी असो वा महिला... असे नाही की महिलांना पुढे येण्याची इच्छा नसते. मात्र समाजात त्यांना तशी संधी मिळत नाही. जगात महिला सशक्त आहेत. केवळ त्यांना पुढे येऊ देण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही कसे दिसता यावर केवळ तुमचे कर्तृत्व ठरू शकत नाही. मग ते सिनेसृष्टीतही का असेना तिथेही तुमच्या कर्तृत्वावरच मोल ठरवले जाते. त्यामुळे रंग रुप व्यक्तींबद्दल पूर्वग्रह ठरवणार्‍यांसाठी एक मोठा धडा देत इतिहास घडवणार्‍या 'मिस युनिव्हर्स'चे अभिनंदन!

 
@@AUTHORINFO_V1@@