मुंबई : "लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे आणीबाणी. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय देशावर आणीबाणी लादली. त्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अत्याचारांबाबत काँग्रेसने आजवर एकदाही देशाची माफी मागितलेली नाही. आता तरी काँग्रेसला ती सुबुद्धी सुचेल का?" असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खा. रवीशंकर प्रसाद केला.
मुंबईतील भाजप कार्यालयात बुधवार, दि. २५ जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी भाजप आमदार अमित साटम, मुंबई अध्यक्ष किरीट भन्साळी, भाई गिरकर आणि ओमप्रकाश चौहान हेही उपस्थित होते. २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी लागू केली होती. त्या घटनेच्या पन्नासाव्या वर्षाच्या निमित्ताने देशभर भाजपकडून जनजागृती करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी काँग्रेसवर सवालांचा भडीमार केला.
"मी बिहारचा आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होतो. त्या काळात आम्ही तुरुंगवास भोगला, लाठ्या खाल्ल्या. पण ते सगळे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी होतं," असे सांगताना प्रसाद यांनी त्या काळातील अनेक घटनांचा उल्लेख केला. "आणीबाणीच्या २१ महिन्यांत तब्बल ६० लाख लोकांची सक्तीने नसबंदी करण्यात आली. २५३ पत्रकारांना अटक झाली. ११० लोकांना मिसा कायद्यान्वये कैद करण्यात आले. ५२ परकीय पत्रकारांची मान्यता रद्द करण्यात आली. प्रेस कौन्सिलचे कामकाज थांबवण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली, ८० स्वयंसेवकांची तुरुंगात हत्या करण्यात आली. सत्तेच्या हव्यासापोटी लादण्यात आलेला दडपशाहीचा प्रयोग होता," असा आरोप त्यांनी केला.
आणीबाणीचा विषय निघाला की काँग्रेसला मिरच्या
- काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेल्या ‘भाजप फालतू काम करत आहे’ या विधानावर प्रत्युत्तर देताना प्रसाद म्हणाले, "आमचा काँग्रेसला थेट सवाल आहे, आणीबाणीच्या काळात जे काही घडले, त्या अन्यायासाठी काँग्रेस कधी माफी मागणार? इतकी वर्षं झाली, तरी काँग्रेसने या विषयावर मौन बाळगले आहे. उलट राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी तर आणीबाणीचं जाहीर समर्थन केलं होते. मग काँग्रेसची लोकशाहीवरील निष्ठा कुठे आहे?"
- राहुल गांधींवर टीका करताना प्रसाद म्हणाले, "राहुल सध्या लाल रंगाचे संविधान घेऊन फिरतात, सभा घेतात, पण त्यांच्या पूर्वजांनीच त्या संविधानाची हत्या केली होती. ‘संविधान खतरे में है’ असं म्हणणाऱ्यांनी आधी आणीबाणीचा इतिहास वाचावा. जेव्हा काँग्रेसकडून हा विषय निघतो, तेव्हा त्यांचं अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. कारण लोकांच्या मनात त्या कटू आठवणी अजूनही जिवंत आहेत. त्यामुळे काँग्रेसने आणीबाणीतील अन्यायांबद्दल जाहीर माफी मागावी", अशी मागणी त्यांनी केली.