अन् बिबट्यानेही पाहिला फडणवीसांचा शपथविधी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2019
Total Views |



अन् बिबट्यानेही पाहिला फडणवीसांचा शपथविधी !

 



नगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात शनिवारी रात्री अजबच घटना घडली. येथील पिंपळगाव गावातील जगताप कुटुंबीय टेलिव्हिजन संचावर महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणाच्या बातम्या पाहत असताना चक्क एक बिबट्या त्यांच्या घरात घुसला. कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरलेल्या या बिबट्याला 'माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा'च्या पथकाने पकडले आणि त्याची पुन्हा जंगलात सुखरुप सुटका केली.

 

शनिवारी सायंकाळी साधारण ६ वाजण्याची वेळ. पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावामधील दिलीप जगताप यांच्या घरी काही पाहुणे मंडळी आली होती. त्यामुळे घरात लगबग सुरू होती. टिव्हीवर लागलेल्या बातम्यांमध्ये सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेत असल्याच्या बातम्या दाखवत होते. महाराष्ट्र सुरू असलेले हे सत्तानाट्य पाहण्यात जगताप कुटुंबीय आणि आलेली पाहुणे मंडळी व्यग्र होती. अचानक वाऱ्याचा वेगासारखा एक कुत्रा घरात शिरला आणि त्याने आतल्या खोलीच्या दिशेने धुम ठोकली. त्यामागून घरात शिरलेल्या एका प्राण्याने मात्र, जगताप कुटुंबीय आणि पाहुणे मंडळींचा थरकाप उडला. कुत्र्याच्या पाठलाग करत एक बिबट्या घरात शिरला होता. प्रसंगावधान राखत दिलीप जगताप यांनी कुटुंबीयांनी घराबाहेर काढले. प्रसंगी कुत्राही घराबाहेर पडला आणि दिलीप यांनी घराची दारे लावून घेतली.



 

 

ही बातमी गावात वाऱ्यासाऱखी पसरल्यावर अहमदनगर वन विभागाला संपर्क साधण्यात आला. नगरच्या वन विभागाने बिबट्या बचाव कार्यात पारंगत असलेल्या 'माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा'च्या पथकाशी संपर्क साधला. माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे पथक साधारण रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गावात पोहोचल्याची माहिती पथकाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली. घराजवळ पोहोचल्यावर सर्वप्रथम लपून बसलेल्या बिबट्याच्या शोध घेण्यात आला. माळ्यावर लपलेल्या बिबट्याला हेरल्यानंतर त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, त्याने दुसऱ्या खोलीत पलायन केले. त्यानंतर खिडकीमधून बिबट्याच्या वेध घेऊन त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्याचे पशुवैद्यक डॉ.. देशमुख यांनी सांगितले. हा बिबट्य़ा चार वर्षांचा नर होता. पकडल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्याचे आरोग्यास कोणताही धोका निर्माण न झाल्याने आणि केवळ भक्षाचा पाठलग करत असताना घरात शिरल्याने त्याची पाठवणी पुन्हा जंगलात करण्यात आली. परंतु, बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देत असताना टिव्हीवर सुरू असलेला महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा थरार पाहताना आम्हीच आश्चर्यचकित झाल्याचे, देशमुख म्हणाले. हे बचाव कार्य माणिकडोह बिबट बचाव केंद्र टीम, जुन्नर गावकरी रेस्क्यु टीम व वनविभाग टाकलीधोकेश्वर यांनी संयुक्तरित्या केले.

@@AUTHORINFO_V1@@