सोसता झळा उष्णतेच्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019   
Total Views |



हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीसंदर्भात रोज काहीतरी नवनवीन निष्कर्ष समोर येताना दिसतात. पण, दुर्दैवाने हे निष्कर्ष सकारात्मक नसून मानवी चिंतेत अधिकाधिक भर घालणारेच म्हणावे लागतील. अमेरिकेतील ‘नॅशनल ओशनिक आणि अ‍ॅटमॉसफिअरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ अर्थात ‘एनओएए’ या संस्थेने जागतिक तापमानाविषयी केलेल्या संशोधनात यंदाचे वर्ष हे आजवरचे दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकाचेसर्वाधिक उष्ण वर्ष’ ठरू शकते, असे जाहीर केले आहे.

साधारण १८८० पासून जागतिक तापमानाची शास्त्रीय नोंद ठेवण्यास प्रारंभ झाला. तेव्हापासून आजतागायत जागतिक तापमानामध्ये सातत्याने वाढ नोंदवण्यात आली. एकीकडे औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणाची पातळी वाढत गेली, तर वृक्षतोडीमुळे कार्बन उत्सर्जनानेही उसळी घेतली. परिणामी, जागतिक तापमान वाढीचे संकट आज संपूर्ण विश्वावर घोंगावत असून त्याचे दृश्य परिणामही अधिक प्रकर्षाने गेल्या काही काळात जाणवू लागले आहेत.

तापमानाचा चढता पारा पाहता, यंदाचे वर्ष हे आजवरच्या पहिल्या पाच सर्वाधिक उष्ण वर्षांच्या यादीत समाविष्ट झाले असून, पहिल्या तीनच्या यादीतही ते गणले जाण्याची ८५ टक्के शक्यता ‘एनओएए’ने वर्तविली आहे. ‘एनओएए’च्या नोंदीनुसार, जमिनीवरचे आणि समुद्राचे तापमान १.७६ डिग्री इतके नोंदवण्यात आले. विसाव्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा निश्चितच हे तापमान अधिक आहे. आजवरचा सर्वाधिक उष्ण ऑक्टोबर महिना हा २०१६ साली नोंदवण्यात आला होता. त्याचबरोबर उत्तर ध्रुवावरील अर्थात आर्क्टिक खंडाचे तापमान हे जगाच्या तुलनेत दुपटीने वाढत असल्याची नोंदही ‘एनओएए’च्या शास्त्रज्ञांनी केली आहे. त्याचबरोबर प्रशांत महासागरापासून ते अरबी समुद्रापर्यंत तापमानात वाढ झाली असून फक्त पश्चिम अमेरिकेच्या खडकाळ क्षेत्रात तुलनेने कमी तापमान आढळून आले. यामागचे कारण म्हणजे समुद्र मोठ्या प्रमाणात वातावरणातील अधिकची उष्णता शोषून घेतो. हरितगृह वायूंच्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या उत्सर्जनामुळे जागतिक तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

कोळसा, इंधनाचे ज्वलन ही हरितगृह वायूच्या पातळीत प्रचंड मोठी वाढ होण्यामागची प्रमुख कारणे. त्यामुळे विकसित देशांबरोबरच विकसनशील देशही याच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कसे कमी करता येईल, यासाठी आज प्रयत्नशील दिसतात. परंतु, वारंवार चर्चा आणि उपाययोजना करूनही हरितगृह वायूंचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यातच यंदाच्या वर्षी ब्राझीलमधील ‘अ‍ॅमेझॉन’च्या जंगलात पेटलेले भीषण वणवे, ऑस्ट्रेलियामध्येही वणव्याने उद्ध्वस्त झालेली वृक्षसंपदा यामुळे केवळ त्या देशांचीच नाही, तर संपूर्ण जगाची नैसर्गिक कवचाची हानी झाली. कारण, आज एखादा देश जरी पर्यावरण आणि हवामान बदलांबाबत गांभीर्याने विचारयोजना करत असेल, तर त्या एकट्या देशाचे प्रयत्न पुरेसे नाहीत. या समस्येने राष्ट्रीय नाही, तर वैश्विक स्वरूप कधीच धारण केले आहे. परंतु, या हवामान बदलाचे मूळ मात्र अगदी स्थानिक पातळीवरही दिसून येते, हे सत्य नाकारता येणार नाही.

जागतिक हवामान बदलांबाबत गेल्या दोन-तीन दशकांपासून सर्वाधिक चर्चा रंगल्या, परिषदा, संमेलनांचेही आयोजन झाले. तरीही काही देशांनी त्यांच्या कार्बन पाऊलखुणा कमी करण्याकडे फारसा रस दाखवला नाही. यामध्ये दोन्ही विकसित आणि विकसनशील देशांचाही समावेश आहेच. त्यामुळे दररोज हवामान बदल, तापमान वाढ याच्याशी निगडित समोर येणारी माहिती, आकडेवारी हा एकप्रकारे संपूर्ण मानवजातीसाठी एक गर्भित इशाराच म्हणावा लागेल. कारण, या तापमान वाढीचे परिणाम कोणा एका देशाला किंवा फक्त किनारी देशांनाच सहन करावे लागतील, असे नसून त्याची झळ सर्वांनाच घेऊन बुडेल, हे विसरता नये.

पर्यावरणविषयक कायदे-कानून, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छ इंधनाचा वापर याकडे आता चर्चांच्या चष्म्यांतून बघण्याची वेळ कधीच निघून गेली आहे. आता फक्त आणि फक्त जलद कृतीचीच गरज आहे. कृती वैयक्तिक आणि सरकारी पातळीवरही. तापमान वाढीच्या या संकटावर जर वेळीच जगाने एकत्र येऊन तोंड दिले नाही, तर जागतिक तापमानातील ही वाढ संपूर्ण वसुंधरेलाच एका तप्त गोळ्यात परिवर्तित केल्याशिवाय राहणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@