ईशान्य भारतामधून सापाच्या नव्या प्रजातीचा उलगडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019   
Total Views |
 
 

 'बीएनएचएस'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांच्या नावे सापाचे नामकरण

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी ईशान्य भारतातील पर्वतरागांमधून सापाच्या नव्या प्रजातीच्या शोध लावला आहे. या नव्या प्रजातीचे नामकरण 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे (बीएनएचएस) संचालक आणि प्रसिद्ध सागरी जीवशास्त्रज्ञ डाॅ. दिपक आपटे यांच्या नावे 'ट्रकिशीयम आपटेई' असे करण्यात आले आहे. ही प्रजात 'ट्रकिशीयम' पोटजातीमधील असून जगभरात या पोटजातीमध्ये सात प्रजाती आढळून येतात.

 
 
 ( डाॅ. दिपक आपटे )
 
 
 

'द रेप्टाईल डाटाबेस' यांच्या हवाल्यानुसार सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जैवविविधतेत भारत जगामध्ये पाचव्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. भारतात सरपटणाऱ्या प्रजातींची संख्या ६८९ असल्याचा अंदाज आहे. मात्र, यामध्ये दिवसागणिक भर पडत आहे. देशासह महाराष्ट्रात उभयसृपांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांची फळी तयार झाली आहे. या फळीमधील तीन संशोधकांनी अरुणाचल प्रदेशच्या जंगलामधून सापाच्या 'ट्रकिशीयम' पोटजातीमधील नव्या प्रजातीचा उलगडा केला आहे. 'बीएनएचएस'चे संवर्धन अधिकारी हर्षल भोसले, बंगळूर येथील 'नॅशनल सेन्टर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स'चे शास्त्रज्ञ झिशान मिर्झा आणि पुण्यातील फग्युसन महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक गौरांग गोवांडे यांनी नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. आज प्रसिद्ध झालेल्या 'काॅमटस रेन्डस बायोलाॅजीज्' या संशोधन पत्रिकेत हे शोधवृत्त प्रकाशित झाले.

 



 
 
 

 

२०११ मध्ये संशोधक हर्षल भोसले अरुण प्रदेशातील ताले व्हॅली वन्यजीव अभयारण्यात गेले असताना त्यांना ही नवी प्रजात आढळून आली होती. यंदा जून महिन्यात हे तिन्ही संशोधक सर्वेक्षणासाठी गेले असताना त्यांना ही प्रजात पुन्हा दिसून आली. त्यानंतर तीन महिने या प्रजातीवर संशोधन केल्याची माहिती हर्षल यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. या संशोधनाकरिता डाॅ. दिपक आपटे यांनी पाठबळ दिल्यामुळे या प्रजातीला 'ट्रकिशन आपटेई' असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रजात जमिनीखाली राहत असून ती २९३ ते २९९ मिमी. लांब आहे. जमिनीखालीच राहत असल्याने ती फारशी दिसण्यात येत नाही. त्यामुळे या पोटजातीमधील सापांवर अभ्यास झालेला नाही.

 
 

 
 
 
 

संशोधकांनी या प्रजातीची चाचणी 'गुणसूत्र' (डीएनए) आणि आकारशास्त्राच्या आधारे केली आहे. 'ट्रकिशीयम आपटेई' या प्रजातीच्या पोटाकडील खवल्यांची संख्या साधारणपणे 'ट्रकिशीयम' पोटजातीमधील सापांच्या खवल्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही प्रजात नवी असण्याकरिता हा मापदंड महत्त्वाचा ठरल्याचे हर्षल यांनी सांगितले. शिवाय नव्या प्रजातीच्या गुणसूत्र चाचणीकरिता लंडनच्या 'नॅचरल हिस्ट्री संग्रहालय' आणि 'बीेएनएचएस'च्या संग्रहातील नमुने तपासण्यात आले. या संशोधनाकरिता शास्त्रज्ञांना श्रीपाद हळबे आणि 'ब्रीहद भारतीय समाज ट्रस्ट'चेे आर्थिक पाठबळ मिळाले.


@@AUTHORINFO_V1@@