कोट्यधीशाची विस्मयकारक चित्तरकथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




अमेरिकेतल्या अटलांटामधल्या इमोरी विद्यापीठातल्या हार्वे क्लेहर या अभ्यासकाने डेव्हिड कारच्या मृत्यूनंतर आज
40 वर्षांनी त्याच्याबद्दलची माहिती अभ्यासून मांडली आहे.



दि
. ५ मार्च, १९४६ या दिवशी अमेरिकेत मिसुरी प्रांतातल्या फुल्टन या ठिकाणी केलेल्या भाषणात विन्स्टन चर्चिलने सोव्हिएत रशियन राजवटीचा ‘लोखंडी पडदा’- ‘आयर्न कर्टन’ असा उल्लेख केला आणि तो शब्द एकदम जगभर पसरला. खुद्द रशियन भूमीत आणि रशियाने व्यापलेल्या पूर्व युरोपिय देशांमध्ये नक्की काय चाललंय, हे बाहेरच्या जगाला अजिबात कळू नये म्हणून साम्यवादी सोव्हिएत राजवटीने केलेला पक्का बंदोबस्त म्हणजेच ‘लोखंडी पडदा.’



हा
‘लोखंडी पडदा’ गुपचूप बाजूला सारून आत प्रवेश करून स्वत:चं उखळ पांढरं करून घेणारे बहाद्दर होतेच. डेव्हिड कार हे त्यातले एक ठळक नाव. १९८० साली मॉस्कोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार, हे १९७२ सालीच ठरलं. त्याची तयारी म्हणून मॉस्को शहराच्या परिसरात असंख्य नवीन बांधकाम प्रकल्प सुरू झाले. त्यातला एक फार मोठा प्रकल्प म्हणजे परदेशी पाहुण्यांसाठी एक टोलेजंग पंचतारांकित हॉटेल उभं करणं. सोव्हिएत राजवटीच्या इतिहासात प्रथमच एका परदेशी कंपनीला म्हणजे फ्रान्सच्या ‘लाझार्ड फ्रिअर्स’ या कंपनीला हे काम मिळाले. मॉस्को शहरातल्या मीरा अ‍ॅव्हेन्यू या परिसरात १ लाख, ६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर ‘कॉसमॉस हॉटेल’ हे २५ मजल्यांचं अतिभव्य हॉटेल उभं राहिलं. त्याच्यामध्ये १७७७ अतिआलिशान स्वीट्स (पक्षी : खोल्या) होते. या प्रकल्पाचा पडद्यामागचा खरा सूत्रधार होता डेव्हिड कार. एक कोट्यधीश अमेरिकन उद्योजक.



दि
. १७ जुलै, १९७९ या दिवशी अनेक प्रमुख सोव्हिएत आणि फ्रेंच नेत्यांच्या उपस्थितीत ‘कॉसमॉस हॉटेल’चं उद्घाटन होणार हे नक्की झालं.ही सगळी सूत्रं मॉस्कोत बसून स्वत: डेव्हिडच हलवत होता. पण, जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. म्हणून तो पॅरिसला गेला आणि अचानक ८ जुलै, १९७९च्या फ्रेंच वृत्तपत्रांमध्ये त्याच्या मृत्यूची बातमी आली.उच्च राजनैतिक क्षेत्र, उच्च व्यावसायिक क्षेत्र, उच्च लष्करी क्षेत्र, हॉलिवूड आणि दूरदर्शन अशा अनेक क्षेत्रांमधल्या मुरब्बी माहीतगार लोकांच्या भुवया उंचावल्या. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू? शक्यच नाही. नक्कीच खून! पण कुणी पाडला? सीआयए? केजीबी? मोसाद? की आंतरराष्ट्रीय माफिया?



यापैकी कुणीही असण्याची शक्यता होती
. कारण, त्याचे सगळ्यांशीच संबंध होते. सगळ्यांनाच तो हवासाही होता आणि नकोसाही होता. माहीतगार लोकांनी आपापल्या सूत्रांकडून काय माहिती मिळवायची असेल, ती मिळवलीच असेल, सर्वसामान्य लोकांना काय समजलं? तर त्याच्या अफाट स्थावर जंगम मालमत्तेसाठी त्याच्या तीन माजी म्हणजे घटस्फोटित बायका, एक आजी (पक्षी : वर्तमान) बायको म्हणजेच कायदेशीर भाषेत मयत इसमाची विधवा आणि त्यांच्यापासून झालेली पाच पोरं यांनी परस्परांवर लावलेले दावे. पुढचं तब्बल एक दशकभर त्याच्या मालमत्तेची मोजदाद आणि विल्हेवाट असा कार्यक्रम चालू होता. अमेरिका आणि युरोपातल्या अनेक देशांतल्या न्यायालयीन कर्मचार्यांना काम मिळालं. सर्वसामान्य लोकांना अशी लफडी-कुलंगडी, भानगडी चघळण्यात प्रचंड रस असतो. कालांतराने विषय मागे पडतो. तसंच झालं. १९८० साली मॉस्को ऑलिम्पिक पार पडलं. अमेरिकेने टाकलेल्या बहिष्काराने ते गाजलं, पण ‘कॉसमॉस हॉटेल’चं मात्र सगळ्याच परदेशी पाहुण्यांनी भरभरून कौतुक केलं. आजही ते हॉटेल मॉस्कोतलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. बस्स्! विषय संपला!

सर्वसामान्य लोक ‘जेम्स बॉण्ड’ किंवा तत्सम हेरगिरीचे चित्रपट चवीने पाहतात. बॉण्डच्या अत्याधुनिक मोटारी, थरारक पाठलाग, अत्याधुनिक शस्त्रास्त्र, फटाकड्या पोरी, खलनायकाच्या साम्राज्याचा अखेरीस होणारा प्रचंड विध्वंस वगैरे आपण दोन-अडीच तास करमणूक म्हणून बघतो. प्रत्यक्षात हेरगिरीचं हे जग किती निर्घृण, स्वार्थी, गलिच्छ, संयमाचा अंत पाहणारं आहे, याचा आपल्याला पत्ताही नसतो. उच्च राजनैतिक आणि लष्करी पातळीवरच्या हेरगिरीबद्दलची अधिकृत माहिती मिळायला ३०-४० वर्षं उलटावी लागतात. एवढ्या दीर्घ कालानंतर अधिकृत सरकारी कागदपत्रं ‘खुली’ (डी-क्लासिफाय) होतात. मग अभ्यासक त्यातून माहिती शोधतात.

अमेरिकेतल्या अटलांटामधल्या इमोरी विद्यापीठातल्या हार्वे क्लेहर या अभ्यासकाने डेव्हिड कारच्या मृत्यूनंतर आज ४० वर्षांनी त्याच्याबद्दलची माहिती अभ्यासून मांडली आहे. डेव्हिड कार हा मूळचा न्यूयॉर्कचा. १९३०च्या दशकात तो अमेरिकेतल्या कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आला आणि पत्रकार बनला. १९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर तो अमेरिकन सरकारच्या ‘युद्धवार्ता’ खात्यात शिरला. साम्यवादी पत्रकार कसे महत्त्वाच्या जागी बरोबर घुसतात पाहा. पण, अमेरिकन सरकार म्हणजे नेहरु सरकार नव्हतं. खासदार जोसेफ मॅकार्थी याने त्याला व्यवस्थित बाहेरचा रस्ता दाखवला. मग डेव्हिड ‘पब्लिक रिलेशन्स’ या क्षेत्रात शिरला. सगळ्याच देशांतले साम्यवादी कसे ‘गोडबोले’ किंवा ‘बोलबच्चन’ असतात पाहा. त्या जोरावर डेव्हिडने ‘फेअरबँक्स सिडने’ या मोठ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदापर्यंत मजल मारली. ही कंपनी जगभरच्या अनेक देशांना शस्त्रास्त्रं पुरवत होती. अमेरिकन भूमीवर हा व्यवसाय पूर्णपणे कायदेशीर होता.

पण, पुढे डेव्हिडला या कंपनीतून बाहेर पडावं लागलं. मग तो न्यूयॉर्कच्या प्रख्यात नाट्यव्यवसायात म्हणजे ‘ब्रॉडवे’कडे वळला. तिथून साहजिकच दूरदर्शनच्या असंख्य खाजगी वाहिन्या आणि हॉलिवूडची विशाल सिनेसृष्टी आलीच. १९६०च्या दशकातल्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचा आणि टिव्ही शोजमध्ये तो सहनिर्माता होता. अनेक नव्या नट्यांना त्याने प्रथम संधी दिली. आता नव्या नट्यांना कशी संधी मिळते, हे आपल्याला माहितीच आहे. तशी संधी देत असताना डेव्हिड एका नटीशी लग्न ठरवून बसला. इतक्यात त्याची एका प्रौढ, अतिधनाढ्य फ्रेंच महिलेशी ओळख झाली. डेव्हिडने नटीबरोबरचं लग्न मोडलं, हॉलिवूडला रामराम ठोकला आणि त्या फ्रेंच बाईशी लग्न करून पॅरिसला स्थायिक झाला. आता त्याची गुळचट जीभ फ्रान्स, ब्रिटन आणि युरोपात संधानं बांधू लागली. एकीकडे त्याची ब्रिटिश हॉटेल उद्योजक बॅरन चार्ल्स फोर्ट याच्याशी मैत्री झाली; तर दुसरीकडे ग्रीक कोट्यधीश अ‍ॅरिस्टॉटल ओनॅसिस हाही त्याचा खास मित्र बनला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी जॅकी केनेडी हिने याच अ‍ॅरिस्टॉटल ओनॅसिसशी पुनर्विवाह केला होता.

१९७०च्या दशकात आर्मंड हॅमर याने डेव्हिड कारला बरोबर घेऊन मॉस्कोची वारी केली. आर्मंड हॅमर हा ‘ऑक्सिडेंटल पेट्रोलियम’ किंवा ‘ऑक्झी’ या अतिप्रख्यात आणि अतिश्रीमंत अमेरिकन कंपनीचा प्रमुख होता. आता खरं पाहता १९६०-७०च्या दशकात रशिया-अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध ऐन भरात होतं. मग अमेरिकेच्या सर्वोच्च तेल उत्पादक कंपनीचा प्रमुख अधिकृतपणे रशियात कसा काय गेला? याचं कारण धंदा! तेलाच्या धंद्याची गरज दोघांनाही होती. गंमत म्हणजे आर्मंड हॅमर आणि डेव्हिड कार दोघेही मूळचे रशियन ज्यू होते. तुम्हाला काय वाटतं, अमेरिकेच्या ‘एफबीआय’ आणि ‘सीआयए’ या सर्वशक्तिमान हेरखात्यांना हॅमर आणि कार यांचे उद्योग कळत नव्हते? छेः! उलट ते त्यांना माहिती पुरवत होते आणि त्यांच्याकडून माहिती मिळतही होती. अगदी हेच रशियाच्या ‘एनकेव्हीडी’ आणि ‘केजीबी’ या गुप्तवार्ता खात्यांबद्दल तसंच इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तवार्ता खात्याबद्दलची म्हणता येईल.

तेही हेच करत होते. आर्मंड हॅमरने डेव्हिड कारची ओळख जेर्मन ग्विशिआनी या सोव्हिएत व्यापार खात्यातल्या उच्च अधिकार्‍याशी करून दिली. ग्विशिआनी हा सोव्हिएत पंतप्रधान अ‍ॅलेक्सी कोसिजिन यांचा जावई होता आणि सगळेच सोव्हिएत अधिकारी आणि नेते अत्यंत भ्रष्ट होते. मग काय! डेव्हिड कारच्या व्यापारी कल्पनांना नवनवे पंख फुटले. त्याच्या संपर्कातून मॉस्कोत ऑलिम्पिक स्पर्धांसाठी ‘कॉसमॉस’ हे टोलेजंग हॉटेल उभारण्याचं काम ‘लाझार्ड’ या फ्रेंच कंपनीला मिळालं. ‘मिशा अस्वल’ हे मॉस्को ऑलिम्पिकचं बोधचिन्ह अमेरिकेत वापरण्याचे हक्क डेव्हिडने मिळवले. ऑलिम्पिक स्मृती म्हणून रशियन टांकसाळ जी विशेष नाणी पाडणार होती, त्याच्या विक्रीचे हक्क डेव्हिडने मिळवले. हे चालू असतानाच युगांडाचा इदी अमीन आणि लीबियाचा मुहम्मद गद्दाफी यांना शस्त्रास्त्र पुरवण्याचा उद्योगही चालूच होता. जगभर पसरलेल्या असंख्य खर्‍या-खोट्या कंपन्या, कॉर्पोरेशन्स, ट्रस्ट्स आणि हस्तक यांच्यामार्फत हे सगळे व्यवहार चालू होते. कुठे कायदेशीर, तर कुठे बेकायदेशीर आणि अफाट संपत्ती जमवत असतानाच संवेदनशील अशा राजकीय, औद्योगिक, व्यावसायिक, लष्करी माहितीची पुरवापुरवीही चालूच होती.

पण, कुठेतरी काहीतरी चुकलं. तब्बेत ठीक नाही म्हणून मॉस्कोहून पॅरिसला परतलेल्या डेव्हिडला समजलं की, आपली ३० वर्षं वयाची चौथी बायको न्यूयॉर्कला गेली आहे. तिच्याशी त्याचं फोनवर काहीतरी जबरदस्त गरमागरम संभाषण झालं आणि भडकलेल्या डेव्हिडने आपल्या सचिवाला दुसर्या दिवशीचं न्यूयॉर्कचं विमान तिकीट काढायला सांगितलं. पण, दुसर्‍या सकाळी तो जीवंत राहिला नाही. त्याने वेगळ्या कंपनीचं विमान पकडलं, असं म्हटलं पाहिजे.आज ४० वर्षांनंतर अधिकृत कागदपत्रं त्याच्याबद्दल सरळच सांगतात की, तो ‘एनकेव्हीडी’ आणि ‘केजीबी’ या रशियन गुप्तवार्ता खात्याचा माणूस होता. पण, अमेरिकन ‘एफबीआय’ आणि ‘सीआयए’ने ही त्याला वापरला, हे मात्र तो सांगत नाहीत. असंच असतं हेरांचं काळोखी विश्व!

@@AUTHORINFO_V1@@