युधिष्ठिराचे आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |


 
"तुला एकदा आम्ही सामोपचाराने विचारलं होतं की, आम्हाला पाच गावं दे. आपण हे शांततेने मिटवून टाकू. पण, तुला तेव्हा दुराभिमान होता. तू निरोप धाडलास की, सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन मी पांडवांना देणार नाही आणि आता तुला एवढं शहाणपण, हे औदार्य कसं सुचलं? तुझं मन थार्‍यावर आहे का? आता तर तुला लढूनच संपलं पाहिजे! इतकं सगळं घडल्यावर तुला मी जीवंत सोडू कसा! बाहेर ये व युद्धाला तयार हो!" 
 


दुर्योधनाचा शोध घेत घेत पांडव द्वैपायन सरोवरापर्यंत पोहोचले. युधिष्ठिर म्हणाला, "कृष्णा, हे पाहा, दुर्योधनाने आपल्या शक्तीने सरोवराचे पाणी निश्चल करून ठेवले आहे. या सरोवराच्या खोल तळाशी जाऊन तो तिथे लपून बसला. मी त्याला इथून पळू जाऊ देणार नाही. तो इथून जीवंत जाऊ शकत नाही. आज त्याच्या मदतीला इंद्र जरी आला तरी मी त्याला त्याच्या पणजोबांची भेट घ्यायला स्वर्गात पाठवीन. युधिष्ठिर क्रोधाने पेटून बोलत होता. कृष्ण म्हणाला, "दुर्योधनाच्या पापांचे प्रायश्चित म्हणून तू त्यास ठार कर!" युधिष्ठिर त्या सरोवराच्या काठी उभा राहिला आणि दुर्योधनाला म्हणाला, "दुर्योधना, तुझ्या वागण्याची परिसीमा झाली आहे. तुझ्यामुळे सारे क्षत्रिय मृत्युमुखी पडले आणि तू स्वत:ला वाचण्यासाठी या सरोवरात दडी मारून बसतोस? बाहेर ये व लढायला तयार हो. तुझा स्वाभिमान, आत्मसन्मान कुठे लोपला? तू क्षत्रिय आहेस. क्षात्रधर्म पाळ. बाहेर ये आणि आमच्याशी युद्ध कर. मारला गेलास तर स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर या पृथ्वीवर राज्य करशील." यावर दुर्योधन म्हणाला, "युधिष्ठिर, तू अर्थशून्य बडबड करतो आहेस. मी इथे घाबरून लपलो नाही. केवळ माझ्या तप्त शरीराला काही काळ गारवा मिळावा म्हणून मी इथे येऊन बसलो आहे. माझा प्रिय शकुनी मामा मारला गेला व माझे भाऊ पण मला सोडून स्वर्गवासी झाले, म्हणून माझं मन बधिर झालं आहे. माझा घोडा मला रणभूमीतून बाहेर घेऊन आला व त्याने पण प्राण सोडला. त्याचा मृतदेह तसाच टाकून मी भटकत इथे आलो. मला हे सरोवर दिसलं आणि मला वाटले याच्या तळाशी तरी मला हवी असलेली शांती मिळेल. मी घाबरून या सरोवरात लपलेलो नाही! माझी विश्रांती पूर्ण झाली की, मी सरोवराच्या बाहेर येऊन तुझ्याशी नक्की युद्ध करेन, याची खात्री बाळग!"

 

युधिष्ठिराला हे ऐकून आनंद झाला. दुर्योधन भ्याड अथवा भेकड नाही, हे त्याला कळले. दुर्योधन पुढे म्हणाला,"मला आता जगण्याची इच्छाच उरली नाही. कुरुंची सारी जमीन तू घेऊन टाक. आता ती ओसाडच झाली आहे. ती मी तुला देणगी म्हणून देतो." त्याचे हे असले बोल ऐकून युधिष्ठिराला खूप राग आला. तो ओरडून म्हणाला, "अरे जिच्यावर आता तुझा हक्कच नाही आहे, ती जमीन तू मला देणगी देणार? तुझ्या उद्धटपणाची कमाल आहे. मी खरा क्षत्रिय आहे. मी तुझ्याकडून देणगी वा दान मागत नाही. तू देणगी दिली तरी ती मला नकोय. तुझा संपूर्ण पराभव करून व तुला नष्ट करूनच मी हे राज्य मिळवेन. तुला एकदा आम्ही सामोपचाराने विचारलं होतं की, आम्हाला पाच गावं दे. आपण हे शांततेने मिटवून टाकू. पण, तुला तेव्हा दुराभिमान होता. तू निरोप धाडलास की, सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन मी पांडवांना देणार नाही आणि आता तुला एवढं शहाणपण, हे औदार्य कसं सुचलं? तुझं मन थार्‍यावर आहे का? आता तर तुला लढूनच संपलं पाहिजे! इतकं सगळं घडल्यावर तुला मी जीवंत सोडू कसा! बाहेर ये व युद्धाला तयार हो!" युधिष्ठिराचे हे आव्हान दुर्योधनाच्या जिव्हारी लागले. तो सरोवरातून बाहेर आला. समुद्राच्या तळातून जणू काही सूर्यच उगवला, असा दुर्योधन तेजःपुंज दिसत होता. आपल्या बलदंड भावाकडे पाहून युधिष्ठिर सुखावला व म्हणाला, "माझा भाऊ भेकड नाही, शूरवीर आहे, हे कळून मला आनंद झाला आहे. तुझं हे वागणं क्षात्रधर्माला धरून आहे. आम्ही सर्व तुझ्या एकट्यावरती हल्ला करणार नाही. तू तुझ्या आवडीचे आयुध घेऊन एकावेळी आमच्यापैकी कुणाही एकाशी लढू शकतोस. तू जिंकलास, तर तूच या पृथ्वीच्या स्वामी राहशील." खरंतर अशी सवलत युधिष्ठिराने त्याला द्यायला नको होती, पण त्याचा जुना स्वभाव उचंबळून आला. यावर दुर्योधन म्हणाला, "मला तुझे कौतुक वाटते. माझं आवडीचं शस्त्र म्हणजे ही गदा आहे, जिच्यावर मी जीवापाड प्रेम केले. मी या गदेनेच तुमचा पराभव करेन. तुमच्यापैकी कोणाशीही लढायला मी तयार आहे. एकामागोमाग एक मी तुम्हा सर्वांना ठार करीन, याची मला खात्री आहे."

  

- सुरेश कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@