एक होता पाद्री, नाव त्याचं दिमित्री!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



आपल्या प्रवचनांना जमणाऱ्या नि आपल्याला पाठिंबा देणाऱ्या आपल्या चाहत्यांनाही फादर दिमित्रीने मुर्खात काढलं आणि साम्यवादाशिवाय रशियाला आणि जगालाही तरणोपाय नाही, असं ठामपणे सांगितलं.


१९१७ साली रशियात साम्यवादी क्रांती झाली. युरोप खंडातल्या देशांना क्रांती ही नवी गोष्ट नव्हती. इंग्लड आणि फ्रान्स या देशांनी तर क्रांती करून आपल्या खुद्द म्हणजे राजे-राण्यांना ठार मारलं होतं. रशियन क्रांतीतला नवा, वेगळा भाग म्हणजे तिचं तत्त्वज्ञान. कार्ल मार्क्स नावाच्या एकाविचारवंताने मांडलेल्या साम्यवाद किंवा कष्टकऱ्यांचं, श्रमिकांचं शोषणमुक्त राज्य अशा संकल्पनेवर ही क्रांती आधारलेली होती. झारशाहीला कंटाळलेल्या पहिल्या महायुद्धात संपूर्ण पराभवाच्या काठावर उभ्या असलेल्या रशियन जनतेने साम्यवादी क्रांतिकारकांना पाठिंबा दिला. व्लादिमीर लेनिन याच्या नेतृत्वाखाली साम्यवादी सरकार आलं आणि अल्पावधीच रशियन जनतेचा भ्रमनिरास झाला. स्वतःला श्रमिकांचे नेते म्हणवणारे हे साम्यवादी, झार सम्राटापेक्षाही जास्त जुलमी आणि झोटिंग होते. आपला अंमल बसवण्यासाठी त्यांनी जबरदस्त दडपशाही सुरू केली. साम्यवादी क्रांती ज्यांच्यासाठी म्हणून करण्यात आली ते शेतकरी आणि कामगार हेच या दडपशाहीत भरडले गेले. १९१७ ते १९२४ हा लेनिनचा कार्यकाळ. पृथ्वीवर साम्यवादी स्वर्ग अवतीर्ण झाला आहे, अशी जाहिरात केल्या जाणाऱ्या या सोव्हिएत रशियात लेनिनच्या कारकिर्दीत किमान पाच लाख लोकांना ठार मारण्यात आलं. हा आकडा सोव्हिएत रशिया संदर्भात विश्वसनीय ग्रंथ लिहिणाऱ्या रॉबर्ट काँक्वेस्ट या अभ्यासकाने दिला आहे. १९२४ साली लेनिन संशयास्पद स्थितीत मेला आणि जोसेफ स्टालिन हा सत्ताधारी झाला. त्याने मुळी माणसांचा खाटिकखानाच उघडला. रशिया हा एक अवाढव्य देश आहे. त्याची लोकसंख्याही विशाल आहे. एवढा मोठा जनसमूह तुमच्या भलत्या-सलत्या गोष्टी मान्य करेल, हे अशक्य असतं. स्टालिनने यावर जालिम आणि अंतिम उपाय शोधून काढला. किडे-मुंग्या माराव्यात, तशी त्याने माणसं मारली. चंगेझखान, तैमूरलंग आणि नादिरशहा यांनी माणसांच्या मुंडक्यांचे मनोरे रचले. पण, त्यांनी ज्यांची मुंडकी छाटली ते निदान त्यांचे शत्रू तरी होते. स्टालिनने आपल्याच माणसांना ठार मारलं. किती? पाचशे, हजार, दहा हजार? दुसऱ्या महायुद्ध काळात एका बैठकीत स्टालिनने स्वतःच्या तोंडाने चर्चिलला आकडा सांगितला होता. तो होता दोन कोटी! पुढे स्टालिन १९५३ पर्यंत जीवंत होता आणि त्याचा खाटिकखाना चालूच होता. यावरून आपण फक्त कल्पना करायची की, १९२४ ते १९५३ या आपल्या कार्यकाळात स्टालिनने केवळ आपल्याला विरोध करतात म्हणून किती माणसं ठार मारली असतील?

 

स्टालिनच्या मृत्यूनंतर तुलनेने छोटी अशी निकिता क्रुश्चेव्ह याची दहा वर्षांची कारकिर्द झाली आणि मग लिओनिद ब्रेझनेव्ह हा सत्ताधारी झाला. क्रुश्चेव्हच्या कारकिर्दीतच सोव्हिएत सत्ताधारी वर्गाने विरोधकांना ठार मारण्याऐवजी 'नीट माणसाळवण्याचा' एक नवाच मार्ग शोधला होता. ब्रेझेनेव्हने तो मार्ग अधिकच प्रशस्त केला. विरोधकांना एकदम मारूनच टाकलं की, फार बोंबाबोंब होते. त्यामुळे ठार मारण्यापेक्षा त्यांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचं. मग त्यासाठी नवऱ्याने बायकोवर, बायकोने नवऱ्यावर, मुलांनी आईबापांवर, भावाने बहिणीवर, बहिणीने भावावर, मुलांनी शिक्षक-प्राध्यापकांवर, नोकरांनी अधिकाऱ्यांवर, थोडक्यात, प्रत्येकाने आजूबाजूच्या प्रत्येकावर नीट 'लक्ष' ठेवायचं. प्रत्येकाच्या वागणुकीबद्दल ब्रेझनेव्हच्या गुप्तचरांना ठराविक कालावधीत अहवाल देत राहायचं. साम्यवादी राजवटीविरुद्ध जरा कुणी अक्षर उच्चारलं तरी त्याची खबर जायची. मग त्या व्यक्तीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर जबरदस्त दडपण आणण्यात येत असे. नोकरीतून काढून टाकणे, जगण्याचे साधन नष्ट करणे इथपासून अटक आणि हद्दपारी इथपर्यंत कोणत्याही उपायाचा अवलंब करण्यात येत असे. उपजीविकेचं साधन नाहीसं करणं या पहिल्या उपायानेच बहुसंख्य विरोधक नामोहरम व्हायचे. पण, काही बहाद्दर असे असायचेच की, जे सगळ्या उपायांना पचवून उभे राहायचे. मग त्यांच्यासाठी सोव्हिएत सत्ताधाऱ्यांनी एक अतिशय सौम्य दिसणारा, पण अत्यंत जहरी असा उपाय काढला. त्याचंच नाव 'मनोविच्छेद!' म्हणजेच 'ब्रेन वॉशिंग!'

 

१९५४ साली उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम या देशांमध्ये यादवी युद्ध पेटलं. ते १९६४ पर्यंत चालू होतं. उत्तर व्हिएतनामला सोव्हिएत संघाचा पाठिंबा होता, तर दक्षिण व्हिएतनामला अमेरिकेचा पाठिंबा होता. या युद्धात कैद झालेल्या अनेक अमेरिकन सैनिकांवर उत्तर व्हिएतनामी साम्यवाद्यांनी म्हणजेच सोव्हिएत शास्त्रज्ञांनी 'मनोविच्छेद' तंत्राचे प्रयोग केले आणि त्यांची सुटका केली. कैदेतून परतलेले हे सैनिक कट्टर साम्यवादी बनले होते. ते साम्यवादी व्यवस्थेची भरमसाठ तारिफ करीत होते आणि लोकशाही राज्यव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था यांच्यावर कडाडून टीका करीत होते. अमेरिकन सैनिकी अधिकारी प्रथम चक्रावलेच, पण त्यांनी तातडीने हे प्रकरण शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचवलं. अमेरिकन मनोवैज्ञानिकांनी केलेल्या तपासातून उघडकीला आलं की, इव्हान पावलोव्ह नावाच्या रशियन मानसशास्त्रज्ञाने केलेल्या मनोविज्ञान संशोधनावरून सोव्हिएत शास्त्रज्ञांनी हे भयानक तंत्र विकसित केलं आहे. या तंत्रामध्ये कैद्याला मारहाण करणं, उपाशी ठेवणं इत्यादी कोणताही शारीरिक छळ करण्यात येत नाही. किंबहुना त्याच्या शरीराला स्पर्शही केला जात नाही. सगळा हल्ला असतो, तो त्याच्या मनावर. हा हल्लाही अतिशय सफाईदार, गोड, मोहक असा असतो. त्या हल्ल्याने कैद्याच्या श्रद्धा, त्याची जीवनमूल्ये, त्याची विचारप्रणाली यावरच आघात होतो आणि कैदी ती मूल्ये, त्या श्रद्धा सोडून सूचना देणाऱ्याने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या मानू लागतो. बस्स. काम झालं. विरोधक त्याचा विचार विसरून तुमच्या विचारालाच खरं मानायला लागला की संपला कारभार! मराठीतले ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कै. द. पां. खांबेटे यांनी या विषयावर 'मनोविच्छेद' नावाचंएक स्वतंत्र पुस्तकच मराठीत आणलेलं आहे. शास्त्रीय मनोविश्लेषण करणारं आणि तरीही अत्यंत थरारक असं हे पुस्तक आहे. पण कुणाला फारशी या पुस्तकांची आठवण नाही, नसायचीच! कारण, त्यात 'चघळायला' काहीच नाही.

 

असो, तर या 'मनोविच्छेदा'च्या चक्रात सापडून पार उलटापालटा होऊन गेलेला सोव्हिएत राजवटीचा एक विरोधक म्हणजेच फादर दिमित्री दुडको. पश्चिम युरोपात 'रोमन कॅथॉलिक' आणि 'प्रोटेस्टंट' हे दोन प्रमुख ख्रिश्चन पंथ आहेत. तसाच रशियासह संपूर्ण पूर्व युरोपात ग्रीक ऑर्थोडॉक्सहा प्रमुख ख्रिश्चन पंथ आहे. साम्यवादी हे धर्माला अफूची गोळी मानतात. त्यामुळे लेनिन-स्टालिनच्या कारकिर्दीत रशियातल्या इस्लाम, ख्रिश्चन आणि थोड्या प्रमाणात बौद्ध या सर्वच संप्रदायांची पार मुस्कटदाबी करण्यात आली. अनेक दर्गे-मशिदी, चर्चेस(चर्च) आणि मठ सरळ जमीनदोस्त करण्यात आले, पण म्हणून कोणताच संपद्राय संपला नाही. क्रुश्चेव्ह यांच्या कारकिर्दीत जरा मोकळीक मिळताच ग्रीक ऑर्थोडॉक्स पंथाने डोकं वर काढलं. पाद्री रविवारी सकाळी बायबल वाचून प्रवचन देऊ लागले नि लोक दबकत-दबकत ती ऐकायला जमू लागले. बे्रझनेव्ह यांच्या काळातल्या सोव्हिएत हेरखात्याने म्हणजे 'केजीबी'ने मुळी या ऑर्थोडॉक्स पाद्रींपैकीच अनेकांना आपले हस्तक बनवले. हे पाद्री बित्तंबातमी तर द्यायचेच, पण बायबलवर प्रवचन देताना येशूचे शब्द आणि 'केजीबी'च्या वरिष्ठांना हवे असलेले शब्द यांचे झकास मिश्रण करायचे, देवही खूश नि सैतानही खूश! पण दिमित्री दुडको हा वेगळा नमुना होता. तो बायबलचा अभ्यासक तर होताच, पण उत्तम प्रभावी वक्ता होता, अवतीभवतीच्या समाजाच्या स्थितीचं आणि त्या स्थितीला मुख्य कारण असणाऱ्या पाशवी साम्यवादी राजवटीचं त्याचं निरीक्षण फार सूक्ष्म होतं. या राजवटीमुळे, आपलामहान परंपरा असलेला रशिया, दिवसेंदिवस अधिकाधिक पोकळ, दरिद्री, ढोंगी, भ्रष्ट आणि दारुडा होत चालला आहे, हे तो तळमळून लोकांना सांगू लागला. फादर दिमित्रीची लोकप्रियता हळूहळूवाढू लागली. त्याचा असा खास चाहता वर्ग निर्माण झाला. त्याच्या प्रवचनांना गर्दी वाढू लागली. वेगवेगळ्या ठिकाणच्या चर्चेसमधून त्याला प्रवचनांची बोलावणी येऊ लागली.

 

साहजिकच स्थानिक 'केजीबी' अधिकाऱ्याकडून त्याला बोलावणं आलं. प्रथम नुसती तंबी देण्यात आली. पण, दिमित्रीने ती उडवून लावली. मग दंडाचा प्रयोग सुरू झाला. दिमित्रीला हद्दपारकरण्यात आलं. पण दिमित्री आपल्या अमोघ वाणीने जाईल तिथे साम्यवादी सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करू लागला. तो १९७७ चा काळ होता. रशिया-अमेरिका शीतयुद्ध कळसाला पोहोचलं होतं. कसा कोण जाणे, पण 'न्यूयॉर्क टाईम्स'चा मॉस्कोतला वार्ताहर दिमित्रीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला. सोव्हिएत समाजाच्या दारुण स्थितीबद्दलची दिमित्रीची भलीथोरली मुलाखत पश्चिमेत सर्वत्र वाजत-गाजत प्रसिद्ध झाली. ब्रेझनेव्ह राजवटीने दिमित्रीला ताबडतोब अटक केली. साम-दाम-दंड संपून आता भेद प्रयोगाला सुरुवात झाली. ही गोष्ट जानेवारी १९८०ची. व्लदिमीर सोरोकीन नावाच्या अत्यंत हुशारमनोविच्छेदकाच्या ताब्यात दिमित्रीला देण्यात आलं. फक्त सहा महिने गेले. मग एक दिवस, रशियन दूरचित्रवाणीवर दिमित्री दुडकोची मुलाखत असल्याची खूप जाहिरात करण्यात आली. मुलाखतीत दिमित्रीने आपली भूमिका पूर्णपणे बदलली. त्याने पश्चिमी देश, तेथील लोकशाही, भांडवलशाही, चर्चची धार्मिक व्यवस्था या सर्वांवर कडाडून टीका केली. इतकंच कशाला, त्यावेळी आपल्या प्रवचनांना जमणाऱ्या नि आपल्याला पाठिंबा देणाऱ्या आपल्या चाहत्यांनाही त्याने मुर्खात काढलं आणि साम्यवादाशिवाय रशियाला आणि जगालाही तरणोपाय नाही, असं ठामपणे सांगितलं. फादर दिमित्री दुडकोचा खास 'मनोविच्छेद' करावा तरी लागला. ब्रिटिश तर साम्यवाद्यांपेक्षा हुशार. त्यांनी मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीच लागू करून टाकली. एकट्या-दुकट्याचा मनोविच्छेद करीत बसण्यापेक्षा संपूर्ण हिंदू समाजाचाच 'होलसेल'मनोविच्छेद! पुन्हा ते एकदाच नव्हे, तर वर्षानुवर्षं! शतकानुशतकं!!

@@AUTHORINFO_V1@@