वन्यजीवांचा रक्षणकर्ता !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019   
Total Views |



गेल्या आठवड्यात राज्यातून मुंगुसाच्या केसांपासून तयार केलेले ३० हजार पेन्टिंग ब्रश ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सिंहाचा वाटा असलेल्या आदित्य पाटील याच्याविषयी...

 
 
मुंबई ( अक्षय मांडवकर ) - वन्यजीव गुन्ह्यांचा मागमूस घेऊन त्याची उकल करणे म्हणजे सहजसोपी गोष्ट नव्हे. तस्करांच्या जाळ्यातून वन्यजीवांची सुटका करण्यासाठी प्रचंड हिंमतीची गरज लागते. कारण, मानवी गुन्ह्यांप्रमाणेच या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जीवाला धोका असतो. मात्र, अशा परिस्थितीतही ठाण्यातील एक मुलगा तस्करांच्या तावडीतून वन्यजीवांची मुक्कता करण्याकरिता झटतोय. ’वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन’ (डब्ल्यूडब्ल्यूए) या आपल्या प्राणिप्रेमी संस्थेच्यावतीने वन्यजीव गुन्ह्यांची उकल करतोय. आजवर त्याने वन विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने वन्यजीव तस्करीसंदर्भात २३ धाडी टाकल्या आहेत. यामाध्यमातून विविध भारतीय पक्षी, मगरीची पिल्ले आणि प्राण्यांना सुखरुप वाचवले आहे. नुकताच त्याने केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि वन विभागाच्या मदतीने राज्यात मुंगुसाच्या केसांपासून तयार केलेल्या पेन्टिंग ब्रशचा छडा लावला. त्याद्वारे मुंगुसाच्या केसांचे ३० हजार ब्रश ताब्यात घेण्यात आले. असा हा तरुण वन्यजीवांचा रक्षणकर्ता म्हणजे आदित्य पाटील.
 
 

 
 

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हटले जाते. आदित्यच्या बाबतीतदेखील असेच काहीसे घडले. त्याचा जन्म दि. २४ ऑगस्ट, १९९४ साली ठाण्यात झाला. येऊर जंगलाच्या पायथ्याशी त्याचे बालपण गेले. त्यामुळे निसर्ग आणि वन्यजीवांशी त्याची आपसूकच जवळीक होत गेली. लहानपणी आदित्य पिंजर्‍यामधला बंदिस्त पक्षी दिसल्यास तो उडवून लावत असे. या कामासाठी त्याला घरच्यांकडून दट्टा मिळायचा. मात्र, आदित्यला त्याची जाण नव्हती. परंतु, अशा नकळत घडलेल्या गोष्टींमुळेच त्याच्यामध्ये वन्यजीवांची आवड हळूहळू रुजत गेली. शालेय जीवनात आदित्य साप पकडणे, त्यांचा बचाव करणे, त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे हे काम शिकला. जखमी अवस्थेत सापडणार्‍या प्राण्यांना घरी आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे कामही तो आवडीने करत असे. आदित्यच्या या हौसेला घरच्यांनीही त्यावेळी पाठिंबा दिला. कारण, तोपर्यंत त्यांना आदित्यमध्ये रुजत असलेल्या वन्यजीवप्रेमाचा उलगडा झाला नव्हता.

 

 
 
 
शालेय जीवनात बहरत गेलेली वन्यजीवप्रेमाची आवड पुढे त्याअनुषंगाने शिक्षण घेण्याच्या दृष्टीने आदित्यमध्ये रुजली नाही. त्यावेळी त्याच्या ओळखीमध्ये वन्यजीवसदंर्भात शिक्षण घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे त्याने विज्ञान शाखेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे अभियांत्रिकी शिक्षणाकडे मोर्चा वळवला. मात्र, त्यादरम्यान वन्यजीवप्रेमाची आवड त्याला शांत बसू देत नव्हती. वन्यजीव संवर्धन आणि बचाव (रेस्क्यू) संदर्भात काहीतरी काम करण्याची ऊर्मी त्याच्यामध्ये होतीच. त्यासाठी २०१२ मध्ये त्याने प्राणिप्रेमी संस्था स्थापन करून तिची नोंदणी करण्याचा निश्चय केला. २०१३ साली ’वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन’ (डब्ल्यूडब्ल्यूए) या नावाने संस्था सुरू झाली. सुरुवातीच्या काळात ’डब्ल्यूडब्ल्यूए’चे कार्य केवळ वन्यजीव बचावापुरतेच मर्यादित होते. संस्थेला उभे करून समाजाबरोबरच वन विभागाचा विश्वास निर्माण करण्यासाठी आदित्यला बरेच कष्ट करावे लागले. संस्था नवखी असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने आदित्यने वन विभागाशी समन्वय साधला. ज्यामुळे संस्थेची ओळख निर्माण होण्यास मदत झाली.
 
 

 
 
 

वन्यजीव बचावाबरोबरच आदित्यने वन्यजीव प्रबोधनाकडेही लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये ’डब्ल्यूडब्लूए’चा कार्यविस्तार पुण्यामध्येही झाला. वन्यजीव बचाव आणि जनजागृतीचे काम जोमाने सुरू असताना आदित्यला वन्यजीव गुन्ह्यांच्या उलगड्याची निकड जाणवली. त्यामुळे त्याने संस्थेअंतर्गत २०१५ मध्ये वन्यजीव गुन्हेविषयक काम करणारा चमू तयार केला. वन्यजीव संरक्षण कायद्याचा अभ्यास करून त्यामधल्या कायदेशीर बाबी समजून घेतल्या आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. वन्यजीव गुन्ह्यांची उकल करणे म्हणजे त्याविषयी प्रथम गुप्त माहिती मिळवणे. ती माहिती मिळविण्यासाठी हेर, खबरी असणे आवश्यक. त्यामुळे आदित्यने त्याअनुषंगाने आपला जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली. २०१५ साली वन विभागाच्या मदतीने त्याने ठाण्यातील एका दुकानातून ३० भारतीय ‘मुनिया’ पक्षी जप्त केले. पुढे महाराष्ट्राबाहेर आपले लक्ष त्याने केंद्रीत केले. शिवाय ठाण्या-मुंबईतून कासवांची तस्करी उघडकीस आणली. या संपूर्ण कारवाईदरम्यान त्याला वन्यजीवांची खरेदी करणार्‍या ग्राहकांचा या विषयाबाबतील अजाणतेपणा लक्षात आला. त्यामुळे आदित्यने वन्यजीवांची खरेदी करणार्‍या ग्राहकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली. याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत केरळ आणि काही महिन्यांपूर्वी सांगली-कोल्हापूरमधील पुरात अडकलेल्या वन्यजीवांचे बचावकार्य हाती घेतले. आदित्य सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. वनसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्याला वन विभागात रुजू व्हायचे आहे. पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा !

@@AUTHORINFO_V1@@